दिवाळीच्या दिवसांत ठाण्यातील हवा अतिप्रदूषित; नियम मोडून फटाक्यांचा रात्रभर दणदणाट

सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजवण्यासाठी ठरवून दिलेली वेळ धुडकावून लावत ठाणे शहरात नागरिकांनी रात्रभर दणदणाट केला. दरवर्षीच्या तुलनेत फटाक्यांच्या आतषबाजीचे प्रमाण कमी झाले असले तरी, या आतषबाजीमुळे शहरातील हवेतील प्रदूषकांची टक्केवारी अतिप्रदूषित प्रमाणावरून (७५ टक्के) १०४ टक्क्यांवर गेली. फटाक्यांच्या दणदणाटामुळे ध्वनिप्रदूषणाच्या पातळीनेही वरचे टोक गाठल्याचे दिसून आले.

दिवाळीतील फटाक्यांच्या दणदणाटामुळे होणारे हवा आणि ध्वनिप्रदूषण लक्षात घेऊन सर्वोच्च न्यायालयाने रात्री आठ ते दहा या वेळेतच फटाके वाजवण्याची परवानगी दिली होती. याची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश स्थानिक प्रशासकीय यंत्रणांना देण्यात आले होते. मात्र, न्यायालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून ठाणेकरांनी मध्यरात्रीनंतरही फटाक्यांचा दणदणाट केल्याचे दिसून आले. लक्ष्मीपूजन ते भाऊबीज या कालावधीत रात्री एक वाजेपर्यंत शहरातील अंतर्गत परिसर तसेच हिरानंदानी मेडोज, पाचपाखाडी परिसरात आवाजाची पातळी १०० ते ११० डेसिबलपर्यंत पोहचली होती. पाडव्याच्या दिवशी गोखले रस्ता, राम मारुती रस्ता, पाचपाखाडी येथील व्यापाऱ्यांनी रस्त्यावर रात्री उशिरापर्यंत फटाके वाजवल्याने मोठय़ा प्रमाणात ध्वनिप्रदूषण झाले होते.

महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून शहरातील हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मापन केले जाते. या निरीक्षणामधून दिवाळी आधी शहरात हवेची गुणवत्ता मर्यादा ७६ टक्क्य़ांपर्यंत असताना दिवाळीच्या काळात मात्र ती १०४ टक्क्य़ांपर्यंत पोहचून हवा अतिप्रदूषित झाल्याचे उघड झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत यंदा धुळीकणांच्या प्रमाणात घट झाल्याचा दावा पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मनीषा प्रधान यांनी केला. ‘गेल्यावर्षी धुळीकणांचे प्रमाण ३११ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते तर यंदा २१८ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी धुळीकणाचे प्रमाण सर्वाधिक म्हणजेच २५५ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके होते. तर सल्फर डायऑक्साइडचे प्रमाण २८ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर तर नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण ७२ मायक्रोग्रॅम प्रति क्युबिक मीटर इतके आढळून आले आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेतच हवा प्रदूषणात घट झाली आहे,’ असे त्या म्हणाल्या.

२२ जणांवर गुन्हे

सर्वोच्च न्यायालयाने घातलेले र्निबध मोडीत काढून फटाके वाजवल्याबद्दल ठाण्यात २२ जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले. चितळसर पोलिसांचे पथक परिसरात रात्रीच्या वेळेस गस्त घालीत होते. या गस्तीदरम्यान जय भवानीनगर परिसरात २२ वर्षीय तरुण रात्री एक वाजता फटाके फोडताना आढळून आला. त्याच्याविरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. कापुरबावडी पोलीस ठाण्यातही अशाच प्रकारचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३३ (यू) १३१ प्रमाणे मानपाडा पोलिसांनी ८, विष्णूनगर पोलिसांनी सहा आणि वर्तकनगर पोलिसांनी पाच व्यक्तींवर गुन्हे दाखल केले आहेत. या गुन्ह्य़ात लगेच अटकेची तरतूद नसून संबंधितांना नोटिसा देऊन अटकेची कारवाई करण्यात येते. त्यामुळे संबंधितांना तशा प्रकारच्या नोटिसा दिल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वायुप्रदूषण कुठे, किती?

* पालिकेच्या प्रदूषण नियंत्रण विभागाकडून शहरातील चार ठिकाणी हवेच्या गुणवत्तेचे निरीक्षण आणि मापन केले जाते. त्यामध्ये तीन हात नाका, कोपरी प्रभाग कार्यालय, नौपाडय़ातील शाहू मार्केट, रेप्टाकोस कंपनी परिसर या भागांचा समावेश आहे.

* दिवाळीपूर्वी तीन हात नाका भागात हवेतील प्रदूषकांची सरासरी १२८ टक्के इतकी होती. तर दिवाळीच्या काळात प्रदूषकांची सरासरी १५५ टक्क्य़ांपर्यंत पोहचून येथील हवा आणखी अतिप्रदूषित झाली.

* कोपरी भागातील हवेतील प्रदूषकांची सरासरी ५६ टक्क्य़ांहून १११ टक्क्य़ांपर्यंत पोहचली आहे.

* नौपाडा भागातील हवेतील प्रदूषकांची सरासरी ६० टक्क्य़ांहून ७८ टक्क्य़ांपर्यंत पोहचली आहे.

* रेप्टाकोस भागातील हवेतील प्रदूषकांची सरासरी ६० टक्क्य़ांहून ७४ टक्क्य़ांपर्यंत पोहचली आहे.