05 April 2020

News Flash

ठाण्यातील हवा प्रदुषण घटले!

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

|| नीलेश पानमंद

‘करोना’मुळे वाहनांची संख्या रोडावली; शहरातील हवेचा निर्देशांक ६० टक्क्यांपर्यंत

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रामधील हवा अत्यंत प्रदुषित असल्याची बाब हवा गुणवत्ता मापन उपकरणाद्वारे समोर येत असतानाच, गेल्या काही दिवसांत ‘करोना’च्या पार्श्वभूमीवर शहरात वाहनांची संख्या रोडावल्याने हवा प्रदुषणातही मोठी घट झाल्याची बाब पुढे आली आहे. सध्या शहराचा हवा गुणवत्ता निर्देशांक ६० टक्क्य़ांच्या आसपास असून यापूर्वी तो १०० टक्क्यांपेक्षा जास्त होता. त्यानुसार हवा प्रदुषणात घट झाल्याचे दिसून येत असले तरी हवा गुणवत्ता निर्देशांकानुसार शहरात आजही हवा प्रदुषित असल्याचे चित्र आहे.

ठाणे महापालिका क्षेत्राचे गेल्या काही वर्षांत मोठय़ा प्रमाणात नागरीकरण झाले असून त्याचबरोबर शहरात वाहनांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. याशिवाय, शहरात विविध नागरी प्रकल्प आणि गृह संकुले उभारणीची कामे सुरू आहेत. यामुळे गेल्या काही वर्षांपासून शहरात हवा प्रदुषण वाढले असून त्यामध्ये धुळीकणाचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे सातत्याने समोर येत आहे. शहरातील प्रदुषण कमी करण्यासाठी महापालिकेच्या प्रदुषण नियंत्रण विभागाकडून विविध उपाययोजना केल्या जात असून त्याचबरोबर शहरात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्यामध्ये शहरातील हवा अत्यंत प्रदुषित असल्याची बाब वारंवार समोर येत असून दोन दिवसांपूर्वीपर्यंत हीच स्थिती कायम होती. मात्र, गेल्या काही दिवसांत हवा प्रदुषणात मोठी घट झाली असून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक १०० टक्क्य़ांवरून ७० टक्क्य़ांवर आला होता. रविवारी लागू केलेली जनता संचारबंदी आणि त्यानंतर लागू झालेला जमावबंदीचा आदेश यामुळे शहरात वाहनांच्या संख्येत आणखी घट झाली असून शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक आता ६० टक्क्य़ांपर्यंत आला आहे.

 

नौपाडा, कोपरी, पोखरण परिसरातील हवेचा गुणवत्ता निर्देशांक सुधारला

ठाणे शहरातील तीन हात नाका, कोपरी आणि नौपाडा प्रभाग समिती कार्यालय परिसर या रहिवासी क्षेत्रात, तर रेप्टाकोस कंपनी या औद्य्ोगिक क्षेत्रात हवा गुणवत्ता मापन उपकरणे बसविण्यात आली आहेत. त्याद्वारे शहरातील हवेचे निरीक्षण आणि मापन दररोज केले जात असून त्याचा अहवाल महापालिका प्रदुषण विभागाला दररोज प्राप्त होतो. या अहवालानुसार सर्वाधिक वर्दळीचे ठिकाण असलेल्या तीन हात नाका परिसरात हवेचा गुणवत्ता निर्देशांक १५२ टक्क्य़ांपेक्षा जास्त होता. मात्र, गेल्या दोन दिवसात येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक आता ६४ टक्क्य़ांच्या आसपास आहे. त्यामुळे येथील हवा प्रदुषणाच्या निर्देशांकात ८८ टक्क्य़ांनी घट झाली आहे. तर नौपाडा, कोपरी आणि पोखरण परिसरात हवेचा गुणवत्ता गुणवत्ता निर्देशांक ८० ते ९० टक्के इतका होता. मात्र, गेल्या दोन दिवसात येथील हवेचा गुणवत्ता निर्देशांक ५० ते ६० टक्क्य़ांच्या आसपास आहे. त्यामुळे येथील हवा प्रदुषणात ३० टक्क्यांनी घट झाल्याचे चित्र आहे.

धुळीकणाच्या प्रमाणात घट

ठाणे शहरामध्ये सल्फर डाय ऑक्साईडचे प्रमाण यापुर्वी २२ ते २९ मायक्रो ग्रॅम परक्युबिक मीटर इतके होते. मात्र, आता २० मायक्रोग्रॅम परक्युबिक मीटर इतके आहे. नायट्रोजन ऑक्साइडचे प्रमाण ३५ मायक्रोग्रॅम परक्युबीक मिटर इतके होते. मात्र, आता ३१ मायक्रो ग्रॅम परक्युबीक मिटर इतके आहे. तर शहरात यापूर्वी धुळीकणाचे प्रमाण १७० ते ३०८ मायक्रोग्रॅम परक्युबिक मीटर इतके होते. त्यामध्ये आता घट होऊन त्याचे प्रमाण ११३ मायक्रो ग्रॅम परक्युबिक मीटर आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 25, 2020 12:14 am

Web Title: thane air pollution decreased akp 94
Next Stories
1 करोनामुळे नात्यांची जवळीक वाढली!
2 दुकानांत मास्कशिवाय प्रवेश नाही
3 कल्याण-डोंबिवलीत ३१ जणांवर गुन्हे
Just Now!
X