ठाण्यातील भाजपा नगरसेवक नारायण पवार यांना खंडणीप्रकरणी अटक करण्यात आली आहे. कासारवडवली पोलिसांनी ही कारवाई केली आहे. त्यांना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. ज्यानंतर त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
खंडणी वसुलीचे हे प्रकरण २०१५ मधले आहे. या प्रकरणी नारायण पवारांसह एकूण चार जणांविरोधात गुन्हा दाखल आहे. या आरोपींनी संगनमत करुन जमिनींची कागदपत्रं तयार केली. त्या आधारे ठाणे महापालिके अर्ज करुन बिल्डरकडे तीन कोटींची खंडणी मागितली असा आरोप नारायण पवार यांच्यावर आहे. त्यांनी तीन लाख रुपये स्वीकारले आणि उर्वरित रकमेसाठी तगादा लावला, त्रास दिला असा आरोप तक्रारदाराने केला आहे. नारायण पवार हे प्रकरण घडलं तेव्हा काँग्रेसचे नगरसेवक होते. आता त्यांनी भाजपात प्रवेश केला. सध्या ते ठाणे महापालिकेत भाजपाचे गटनेते आहेत.
या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून त्यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र तिथे त्यांना दिलासा मिळाला नाही. त्यांनी अटकपूर्व जामीन मिळावा म्हणून ठाणे न्यायालयात अर्जही केला होता. मात्र हा अर्ज न्यायालयाने फेटाळून लावला. त्यानंतर नारायण पवार फरार झाले होते. मात्र सोमवारी त्यांनी शरणागती पत्करली. त्यानंतर लगेचच त्यांना अटक करण्यात आली अशी माहिती एका पोलीस अधिकाऱ्याने दिली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 10, 2020 9:44 pm