ठाणे जिल्ह्याच्या मुरबाड तालुक्यातील भाजपाचे नगरसेवक नितीन तेलवणे यांना पोलिसांनी अटक केली आहे. महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी त्यांना अटक झाली आहे. एका महिला नगरसेविकेच्या घरात घुसून तिचा विनयभंग केल्याचा आरोप लावण्यात आला आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी गुरूवारी यासंदर्भात माहिती दिली.

“मुरबाडचे नगरसेवक नितीन तेलवणे यांनी मध्यरात्री (काल रात्री) जवळपास १२ वाजून ४० मिनिटांच्या सुमारास घरात घुसून नगरसेवक असलेल्या महिलेचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला”, अशी माहिती देशमुख यांनी दिली. याप्रकरणी तेलवणे यांच्यावर आयपीसी कलम 452 (बळजबरी घरात प्रवेश), 354 (विनयभंग), 354 अ (लैंगिक छळ) आणि 506 (धमकावणे) अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे, असंही देशमुख यांनी सांगितलं.

राज्याच्या राजकारणात एकीकडे धनंजय मुंडेंवर झालेले आरोप आणि त्यानंतर अलिकडेच पूजा चव्हाण प्रकरणात संजय राठोड यांचा राजीनामा घेण्यात आलेला असताना, आता घरात घुसून महिला नगरसेविकेचा विनयभंग केल्याप्रकरणी भाजपाच्या नगरसेवकाला अटक करण्यात आली आहे. नितीन तेलवणे हे मुरबाडचे नगरसेवक आहेत.