ठाण्यातील भाजप नगरसेवकांची महापौरांकडे मागणी

ठाणे : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जाणारे ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्यासाठी लवकर विशेष सभा बोलविण्याची मागणी भाजपच्या नगरसेवकांनी सोमवारी महापौरांकडे केली आहे.

काही दिवसांपासुन शिवसेना आणि आयुक्त जयस्वाल यांच्यात संघर्ष सुरू असून आता भाजपनेही जयस्वाल यांच्याविरोधात अविश्वास ठराव आणण्याची मागणी केली आहे. विशेष म्हणजे, यापूर्वीही भाजपच्या स्थानिक नेत्यांसह नगरसेवकांनी आयुक्त जयस्वाल यांच्याविरोधात आघाडी उघडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, त्यास वरिष्ठ पातळीवरून फारसा प्रतिसाद मिळाला नव्हता.

ठाणे महापालिकेची नुकतीच सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेत प्रशासनाने काही वादग्रस्त प्रस्ताव मांडले होते. हे प्रस्ताव नगरसेवकांनी फेटाळून लावले.  या कारणावरून आयुक्त संजीव जयस्वाल आणि नगरसेवक यांच्यात संघर्ष सुरू आहे. महापालिकेतील भाजपचे गटनेते नारायण पवार आणि मिलिंद पाटणकर यांनी सोमवारी महापौर शिंदे यांची भेट घेऊन त्यांना एक पत्र दिले.