केवळ सातवी- आठवी इयत्तांनाच लाभ

ठाणे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना येत्या तीन महिन्यांत टॅब देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. त्यामुळे नव्या शैक्षणिक वर्षांत विद्यार्थ्यांच्या पाठीवरील दप्तराचे ओझे कमी होण्याची चिन्हे आहेत. सत्ताधारी शिवसेनेने आखलेल्या या योजनेस सर्वसाधारण सभेने मान्यता देऊनही प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी होत नव्हती. त्यामुळे शिवसेना नगरसेवकांमध्ये नाराजी व्यक्त होत होती. अखेर प्रशासनाने टॅब योजनांची प्रक्रिया पूर्ण करण्यास सुरुवात केली आहे. पहिल्या टप्प्यात आता सातवी ते आठवीच्या अशा दोन इयत्तांमधील विद्यार्थ्यांनाच टॅब मिळणार आहेत.
सत्तेतील मोठा भाऊ असलेल्या मित्रपक्ष भाजपचा राज्यातील विद्यार्थ्यांना टॅब देण्याच्या प्रस्तावास सकारात्मक प्रतिसाद लाभत नसल्याची शिवसेना नेत्यांची तक्रार आहे. त्यामुळे सत्ता असलेल्या महापालिकांमध्ये विद्यार्थ्यांना टॅब देण्याची योजना शिवसेनेने राबविण्यास सुरू केली आहे. ठाणे महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मध्यंतरी महापालिका शाळांमधील पाचवी ते दहावी इयत्तेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचा प्रस्ताव शिवसेनेने मंजूर करून घेतला. यानुसार सुमारे १३ हजार विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे निश्चित करण्यात आले. या प्रस्तावास सर्वसाधारण सभेने अंतिम मान्यता देऊनही प्रशासनाकडून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी हालचाल होत नव्हती. त्यामुळे शिवसेनेची योजना प्रत्यक्षात उतरण्यास अडथळा निर्माण होत असल्याची टीका काही ज्येष्ठ नगरसेवक करू लागले होते. याप्रकरणी शिवसेनेचे काही नगरसेवक आक्रमक होऊ लागताच अखेर प्रशासनाने येत्या तीन महिन्यांत ही योजना अमलात आणण्याचा निर्णय घेतला आहे.

नववी-दहावीच्या विद्यार्थ्यांना टॅब नाही?
सर्वसाधारण सभेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या प्रस्तावानुसार पाचवी ते दहावीपर्यंतच्या सर्वच विद्यार्थ्यांना टॅब देण्याचे निश्चित करण्यात आले होते. परंतु पहिल्या टप्प्यात आता सातवी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहेत तर पाचवी आणि सहावीच्या विद्यार्थ्यांना पुढच्या टप्प्यात टॅब देण्यात येणार आहेत. उर्वरित नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी शिक्षण विभागाकडून वेगळी योजना आखली जात असल्याने त्यांना टॅब योजनेतून वगळण्याचा विचार प्रशासन स्तरावर सुरू आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.