आचारसंहितेपूर्वी थाटामाटात उद्घाटनाचा घाट

ठाणे : ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी उभारण्यात आलेले नौपाडा आणि गोल्डन डाइज नाका परिसरातील दोन्ही उड्डाणपुलांची कामे पूर्ण झाली आहेत. मात्र या पुलांचे थाटामाटात उद्घाटन करण्याचा पालिकेतील सत्ताधारी शिवसेनेचा बेत असून लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी तो सोहळा घेण्याचे घाटत आहे. परिणामी पूल तयार होऊनही तेथून वाहतूक सुरू होऊ शकलेली नाही.

ठाणे शहरातील अंतर्गत वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी महापालिकेने मुंबई महानगर विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून तीन उड्डाणपुलांची उभारणी केली आहे. अल्मेडा चौक, संत नामदेव चौक आणि मीनाताई ठाकरे चौक या तीन ठिकाणी हे उड्डाणपूल उभारले आहेत. त्यापैकी अल्मेडा चौकातील उड्डाणपूल काही महिन्यांपूर्वीच वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे, तर नौपाडय़ातील संत नामदेव चौक आणि ठाकरे चौकातील उड्डाणपुलांची कामे सुरू होती. या दोन्ही उड्डाणपुलांच्या कामाची महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त राजेंद्र अहिवर यांनी १५ दिवसांपूर्वी पाहणी केली होती. त्या वेळेस नौपाडय़ातील उड्डाणपुलाच्या रंगरंगोटीची कामे आठ दिवसांत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते, तर मीनाताई ठाकरे चौकातील एलबीएस पुलावरील डांबरीकरणाचे काम २५ फेब्रुवारीपर्यंत पूर्ण करण्याचे आदेश त्यांनी दिले होते. या आदेशानुसार दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाली आहेत.

या संदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण पापळकर यांच्याशी संपर्क साधला असता, दोन्ही पुलांची कामे पूर्ण झाली असल्यामुळे ते केव्हाही वाहतुकीसाठी खुले होतील, असे त्यांनी सांगितले. ठाकरे चौकातील उड्डाणपुलावरील एलबीएस मार्गिका वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर याच पुलावरील राबोडी के-व्हिलाच्या दिशेने जाणाऱ्या मार्गिकेच्या काँक्रीटीकरणाचे काम लवकर पूर्ण करून ती मार्गिकाही खुली करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

आचारसंहितेपूर्वी उड्डाणपूल आणि मलनि:सारण प्रकल्पाचे एकत्रित उद्घाटन करण्याची योजना आखली जात आहे. मलनि:सारण प्रकल्पांचे उद्घाटन करणे शक्य झाले नाही तर पूल वाहतुकीसाठी खुले केले जातील.

– राजेंद्र अहिवर, अतिरिक्त आयुक्त