ठाणे, कळवा आणि मुंब्रा परिसरातील धोकादायक इमारतींचा प्रश्न गुंतागुंतीचा बनला असून एखादी इमारत कोसळणार नाही याची हमी मला देता येणार नाही, अशी स्पष्ट कबुली ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी मंगळवारी दिली. नौपाडा येथील कृष्ण निवास इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर नगरसेवकांनी उपस्थित केलेल्या वेगवेगळ्या प्रश्नांना उत्तर देताना ते बोलत होते. ‘आयुक्त म्हणून मी कुठेतरी कमी पडतो आहे हे जरी खरे असले, तरी तुम्हीदेखील ज्येष्ठ आणि अनुभवी आहात. त्यामुळे इमारत कोसळून दुर्घटना होऊ नये यासाठी प्रशासनाने नेमके काय करायला हवे, हे तुम्ही सुचवायला हरकत नाही,’ असा टोलाही त्यांनी या वेळी लगावला.
नौपाडा येथील कृष्णा निवास इमारत दुर्घटनेच्या पाश्र्वभूमीवर सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत चर्चेदरम्यान सर्वपक्षीय नगरसेवकांनी महापालिका प्रशासनावर जोरदार टीका केली होती. मुंब्रा येथील लकी कम्पाऊंड इमारत दुर्घटनेनंतर नगरसेवकांनी वेगवेगळ्या सूचना केल्या होत्या. त्या वेळी काही ठरावही झाले होते, मात्र या ठरावांची अंमलबजावणी झाली नाही, असा सूरही नगरसेवकांनी लावला होता. या सर्व मुद्दय़ांचे आयुक्तांनी स्पष्टीकरण दिले.
‘प्रशासन आणि लोकप्रतिनिधी ही वेगळी चाके नाहीत. त्यामुळे प्रशासन काही वेगळा निर्णय घेणार आहे, असा अर्थ कुणीही काढू नये. एक इमारत कोसळली तर काय होऊ शकेल, याचे चित्रण काही नगरसेवकांनी मांडले खरे, मात्र १९९५ पासून सातत्याने अशा इमारती कोसळत आहेत. हे असे का होत आहे याचा विचार सर्वानी करायला हवा,’ असे आयुक्तांनी या वेळी सांगितले. ‘अशा इमारती कोसळतात त्या वेळी नेमके काय करायला हवे, असा प्रश्न मलाही पडतो. मात्र ठाणे महापालिकेत मी सहा महिन्यांपासून आहे, तुम्ही सर्व ज्येष्ठ आहात. अशा घटना घडू नयेत यासाठी आपणही एखादा पर्याय सुचवा,’ असे सांगत त्यांनी चेंडू नगरसेवकांच्या कोर्टात भिरकावला.