राबोडीतील ओमसूर्या इमारतीतील ५७ कुटुंबांचे शाळेत स्थलांतर

ठाणे येथील राबोडी-२ भागातील शिवाजीनगरमधील तीन मजली इमारत सोमवारी रात्री खचली. या घटनेनंतर सुरक्षेचा उपाय म्हणून ५७ कुटुंबांना इमारतीबाहेर काढण्यात आले असून या सर्वाचे परिसरातील शाळेमध्ये तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतर करण्यात आले आहे.

राबोडी- २ येथील शिवाजीनगरमध्ये ओमसूर्या नावाची तीन मजली इमारत आहे. या इमारतीचे बांधकाम १९९३ पूर्वी करण्यात आले आहे.

इमारतीत ५७ कुटुंबे राहतात. सोमवारी रात्री इमारतीच्या खांबाला तडा गेला आणि इमारतीचा काही भाग खचू लागला. ही बाब रहिवाशांना कळताच त्यांनी इमारतीबाहेर धाव घेतली. ठाणे आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही विभागांनी सुरक्षेचा उपाय म्हणून परिसरातील शाळेत या सर्व कुटुंबांना तात्पुरत्या स्वरूपात स्थलांतरित केले.

मंगळवारी सकाळी इमारतीच्या बांधकामाची तज्ज्ञांमार्फत पाहणी करण्याचे काम सुरू होते. या पाहणीनंतरच ही इमारत रहिवास वापरासाठी योग्य आहे की नाही, हे ठरविले जाणार आहे. दरम्यान, मंगळवार दुपारनंतर काही कुटुंबांना एमएमआरडीएच्या भाडेतत्त्वावरील घरांमध्ये स्थलांतरित करण्यात आले.