ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या अंगणात औषधी वनस्पतींचे उद्यान
ठाणे : ठाणे महापालिकेच्या वतीने ज्ञानसाधना महाविद्यालयास परिसरातील उद्यानाच्या संगोपनाची जबाबदारी महाविद्यालयावर देण्यात आली असून या प्रायोगिक उपक्रमास शुक्रवारी सुरुवात करण्यात येणार आहे. ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या ३५ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून या उद्यानाचा लोकार्पण सोहळा आयोजन करण्यात आला आहे. या उद्यानाला ‘नक्षत्र’ आणि फुलपाखरू उद्यान अशी नावे देण्यात आली आहेत. या कार्यक्रमाला ठाण्याचे सह पोलीस आयुक्त व्ही. व्ही. लक्ष्मीनारायण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. या उद्यानाचे उद्घाटन महापौर संजय मोरे यांच्या हस्ते होणार आहे. स्थायी समिती सभापती नरेश म्हस्के, महाविद्यालयाचे अध्यक्ष सतीश प्रधान, प्राचार्य डॉ. सी. डी. मराठे आदी या वेळी उपस्थित राहणार आहेत. उद्यानाची जोपासना करण्यासाठी महाविद्यालयातील वनस्पती विभागातर्फे उद्यान कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. येथील उद्यानामध्ये काही भागांत औषधी वनस्पती, तसेच औषधी प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. तसेच ठाणेशहर परिसरातील शाळांच्या मुलांना लहानशी विज्ञान सहल घडविण्यात येईल अशा प्रकारचे उद्यान भविष्यात इथे तयार करण्यात येणार आहे.
विद्यार्थिनींसाठी मोफत संगणकीय प्रशिक्षण
सध्याच्या स्पर्धात्मक युगात युवकांना स्वत:चे स्थान निर्माण करायचे असेल तर संगणकीय ज्ञान असणे अनिवार्य झाले आहे, परंतु समाजातील आर्थिकदृष्टय़ा कमजोर वर्गातील मुलांना अशी संधी क्वचितच उपलब्ध होते. भारतात होऊ घातलेल्या डिजिटल क्रांतीचे फायदे समाजातील अशा घटकांतील विशेषत: मुलींपर्यंत विनामूल्य पोहचावेत या उद्देशाने ठाण्यातील शेठ नानाजीभाई खिमजीभाई ठाणावाला महाविद्यालयामध्ये केंद्र सरकारच्या डिजिटल इंडिया आणि ए-साक्षरता या उपक्रमांतर्गत एक आगळावेगळा संगणक प्रशिक्षण कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमाची संकल्पना आणि रूपरेशा प्रा. आरती सामंत यांची असून त्यांना संस्थेचे अध्यक्ष नानजीभाई खिमजीभाई ठक्कर आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एम. कारखेले,  प्रा. अपर्णा ठाकूर यांचे मार्गदर्शन लाभले.
‘व्हॉट्सअ‍ॅप’वर कवितांची मैफील
ठाणे :  केवळ चर्चा करण्याऐवजी विधायक कार्य करून एका व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपने व्हॉट्सअ‍ॅपचा चांगल्या कामासाठीही उपयोग होऊ  शकतो, हे सिद्ध केले आहे.गोवेली कॉलेजमधील कार्यक्रमानिमित्त भेट झालेल्या अरुण सुरोशी यांनी हरेंद्र सोष्टे यांच्यासोबत काव्यकट्टा नावाचा व्हॉट्सअ‍ॅप समूह सुरू केला. त्यात अरुण आणि हरेंद्र यांच्या दोघांच्या मित्रांचा समावेश नंतर करण्यात आला. त्यातील अनेक जण एकमेकांना प्रत्यक्ष ओळखत नव्हते. मात्र कविता आणि त्यातील रसिकता या गोष्टींमुळे त्यांना एकत्र जोडून ठेवले. त्यांनी आपल्या कवितासादरीकरणासाठी एकत्र येण्याचे ठरवले आणि काव्यकट्टा नावाने त्यांनी आपला पहिलावहिला कार्यक्रम रसिकांच्या प्रचंड प्रतिसादात सादर केला. गोवेली येथील जीवनदीप शैक्षणिक संस्था पोई संचालित गोवेली महाविद्यालयाच्या वतीने मराठी भाषा आणि साहित्य यांच्या संवर्धनासाठी, समृद्धतेसाठी गेल्या पाच वर्षांपासून चालू असलेल्या ‘मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन व सृजन या भित्तिपत्रकाच्या प्रकाशन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. जीवनदीप शैक्षणिक संस्थेचे संस्थापक रवींद्र घोडविंदे आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. के. बी. कोरे यांच्या हस्ते या कार्यक्रमाचे उद्घाटन झाले. या कार्यक्रमाचे औचित्य साधून व्हॉट्सअ‍ॅपवरील अनिल सुरोशी यांच्या ‘काव्य कट्टा’ या ग्रुपवरील सात कवींना आमंत्रित करण्यात आले होते. यात सहभागी झालेल्या कवींनी आपल्या रचना सादर करून महाविद्यालयातील रसिक विद्यार्थ्यांसह शिक्षकांची मने जिंकली.
‘सुसंवाद हाच यशाचा मंत्र!’
ठाणे : व्यावसायिक जीवनात विद्यार्थ्यांना यशस्वी व्हायचे असेल तर सुसंवाद हाच यशाचा मंत्र असल्याचे मत रिलायन्सचे मनुष्यबळ विकास विभागाचे प्रसाद टोकेकर यांनी व्यक्त केले. जोशी-बेडेकर महाविद्यालयातील स्टुडंट फोरम, स्कॉलर अ‍ॅकॅडमी आणि समुपदेशन विभाग (कॉऊन्सिलिंग सेल) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘संवाद कौशल्याची मूलतत्त्वे’ या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. या वेळी व्यासपीठावर न्यू लॉ कॉलेजचे प्राचार्य एन. एम. राजाध्यक्ष, जोशी – बेडेकर कॉलेजच्या प्राचाया डॉ. शकुंतला सिंग, डॉ. सुचित्रा नाईक आदी उपस्थित होते. पदव्या मिळविणारे अनेक तरुण आपल्या अवतीभोवती असतात. पण स्वत:मध्ये असलेली गुणवत्ता योग्य शब्दांत मांडू शकणारे फार कमी युवक भेटतात. सुसंवाद साधण्यात ते कमी पडतात. संवाद हा प्राणवायूसारखा आहे, असेही त्यांनी सांगितले.
शिबिराच्या माध्यमातून नेतृत्वविकासाचे धडे
ठाणे : विद्या प्रसारक मंडळाच्या वा. ना. बांदोडकर महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे नेतृत्वविकास या एका विशेष शिबिराचे आयोजन केले होते. विद्यार्थ्यांमधील नेतृत्वक्षमता वाढवण्यासाठी या कार्यक्रमात विशेष भर दिला होता. अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी, अंधश्रद्धा निर्मूलन, बुद्धिमत्ता चाचणी आणि आवाज मुद्रण अशा विषयांवर व्याख्याने या वेळी आयोजित केली होती. ‘जागो ग्राहक जागो’ या उपक्रमाचे प्रमुख गजानन पाटील यांनी अन्नपदार्थातील भेसळ कशी ओळखावी याबद्दल सोप्या भाषेत मार्गदर्शन केले. अंधश्रद्धा निर्मूलन समिती ठाणे जिल्ह्य़ाच्या वंदना शिंदे यांनी वाढत्या जादूटोण्याच्या प्रकरणांना कसा आळा घालता येईल, त्याचप्रमाणे हातचलाखीचा वापर करून लोक आपल्याला कसे फसवतात याची प्रात्यक्षिकातून माहिती करून दिली. शिबिराच्या दुसऱ्या दिवशी ब्रेन इंटलिजेंट टेस्ट या संस्थेचे प्रमुख भावेश धनेचा यांनी नेतृत्वकौशल्य कसे विकसित करावे, तसेच एखाद्या ठिकाणी नेतृत्व कसे करावे याबाबतीत मार्गदर्शन केले.  किरण पारिया आणि वरिष्ठ स्वयंसेवक यांनी शिबिराचे आयोजन केले होते.सातत्यपूर्ण तयारीने यश नक्की मिळेल!
साहाय्यक विक्रीकर आयुक्त पंकज मोरे यांचे मार्गदर्शन
कल्याण : प्रतिकूल परिस्थितीचे अवडंबर माजवण्याऐवजी सातत्यपूर्ण तयारी केल्यास यश नक्की प्राप्त होते, असे मत साहाय्यक विक्रीकर आयुक्त पंकज मोरे यांनी व्यक्त केले. उल्हासनगरच्या आर. के. तलरेजा महाविद्यालयाच्या व्यवसाय आणि स्पर्धापरीक्षा मार्गदर्शन केंद्राच्या उद्घाटन कार्यक्रमात ते बोलत होते. साहाय्यक विक्रीकर आयुक्त पंकज मोरे या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. आयुष्यातील सर्व परीक्षा अगदी मुलाखतसुद्धा मराठी भाषेतच दिल्याचे मोरे या वेळी म्हणाले. इंग्रजीचे ज्ञान आवश्यक असून भाषा ही जीवनातील मोठी समस्या नाही, असे ते म्हणाले. स्पर्धा परीक्षांच्या पूर्वतयारीतील मनोरंजक किस्से, मुलाखतीदरम्यान घडलेल्या गमतीजमती सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना व्यक्तिमत्त्वविकासाचे महत्त्व पटवून दिले. विद्यार्थ्यांशी प्रश्नोत्तरातून संवाद साधत त्यांनी विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन केले.
शुद्धलेखन आग्रहाचा नव्हे सवयीचा भाग बनावा!
शुद्धलेखनतज्ज्ञ अरुण फडके यांचे प्रतिपादन
ठाणे : मराठी भाषेची भीती घालवायची असेल तर शुद्धलेखन हा आग्रह न राहता तो सवयीचा भाग बनला पाहिजे, असे मत शुद्धलेखन व भाषातज्ज्ञ अरुण फडके यांनी व्यक्त केले. जोशी-बेडेकर कला वाणिज्य महाविद्यालयातील मराठी भाषा विभागातर्फे दैनंदिन भाषाव्यवहार आणि मराठी शुद्धलेखन कार्यशाळेत ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.दोन दिवसीय कार्यशाळेत अरुण फडके यांनी विद्यार्थ्यांना शुद्धलेखन नियमांची ओळख करून दिली. विद्यार्थ्यांच्या शंकांचे निरसन अरुण फडके यांनी आपल्या मार्गदर्शनातून केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रा. डॉ. शकुंतला सिंग होत्या. मराठी विभाग प्रमुख प्रा. अनिल भाबड, ग्रंथपाल नारायण बारसे या वेळी कार्यक्रमास उपस्थित होते. चारशेहून अधिक विद्यार्थी सहभागी झालेल्या या कार्यशाळेत बांदोडकर महाविद्यालय, बेडेकर विद्यामंदिर व जोशी बेडेकर महाविद्यालयातील प्राध्यापक, माजी विद्यार्थी, शिक्षकेतर कर्मचारीही सहभागी झाले होते. भाग्यश्री चोगले आणि श्रुती शिंदे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर प्रा. महेश पाटील यांनी उपस्थितांचे आभार मानले.
पर्यावरणस्नेही ‘शुभ गणेशा’
ठाणे : ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यलायाच्या सॅक(स्टुडंट अ‍ॅक्टिव्हिटी सेंटर)तर्फे पर्यावरणस्नेही गणेशमूर्ती बनविण्याची कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. त्यामध्ये दोनशेहून अधिक विद्यर्थानी सहभाग घेतला होता. या कार्यशाळेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेल्या गणेशमूर्तीचे प्रदर्शन महाविद्यालयाच्या जनकवी पी. सावळाराम सभागृहात मंगळवारी मांडण्यात आले होते. महाविद्यालयाचे सचिव कमलेश प्रधान यांच्या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी प्रचार्य डॉ. सी. डी. मराठे, प्रदर्शन समितीमधील प्रा. नैना राठोड, प्रा. मनीषा राजपूत आणि प्रा. पितळे उपस्थित होते. यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणस्नेही करण्याचा ध्यास ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या विद्यर्थानी घेतला आहे. पर्यावरण रक्षणाचा मंत्र लक्षात घेऊन कागदाचा लगदा व शाडूच्या मातीपासून तयार केलेल्या विविध आकारांच्या गणेशमूर्ती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या होत्या. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या एकाही मूर्तीला रंग देण्यात आला नव्हता. येथील मूर्तीमध्ये कोणत्याही प्रकारे साम्य नव्हते, तरीदेखील त्या एकसारख्या वाटत होत्या. यावरून असे स्पष्ट होते की, जरी आपण विविध जातींचे धर्माचे असलो तरी, आपण एक आहोत असा संदेश या प्रदर्शनातून देण्यात आला.
व्यावसाय क्षेत्रात व्यवस्थापनाच्या भूमिकेचे महत्त्व
ठाणे : व्यवसायामध्ये उपयोगात येणाऱ्या साधनसामग्रीचे आणि व्यक्तीचे नियंत्रण करणारी व पूर्वनियोजित उद्दिष्टे साध्य करण्यासाठी योजलेली तंत्रशुद्ध यंत्रणा म्हणजे व्यवस्थापन. उत्पादन घटकांना संघटित व दिग्दर्शित करून त्यांच्यापासून संपत्ती निर्माण करण्याचे काम व्यवस्थापनाचे असते. अशा प्रकारच्या विविध विषयांवरील मार्गदर्शन डॉ. वा. ना. बेडेकर महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे विद्यार्थाना देण्यात आले. व्यवस्थापनाच्या विद्यर्थासाठी विशेष पायाभूत अभ्यासक्रमाची माहितीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमामध्ये विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजय बेडेकर, महाविद्यालयाचे संचालक डॉ. गुरुप्रसाद मूर्ती आणि व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. नितीन जोशी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील अनुभवी प्राध्यापक व विविध विषयांचे सखोल ज्ञान असलेल्या अभिवक्त्यांनी विद्यार्थाना मागदर्शन केले. तसेच या कार्यक्रमामध्ये योग आणि व्यक्तिमत्त्वविकास तसेच व्यवस्थापनकौशल्याची गरज या विषयी माहिती देण्यात आली. व्यवसायिक क्षेत्रातील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांनी व्यावसायिक क्षेत्रात उत्तम व्यवस्थापनाच्या भूमिकेचे महत्त्व, प्राथमिक अर्थव्यवस्था आकडेवारीच्या उपयोगितेसंबंधी संवादकौशल्य व उद्दिष्ट निश्चित करण्याबाबत तसेच ते गाठण्याबाबत मार्गदर्शन करून विद्यार्थाना प्रोत्साहन देण्यात आले. त्याचप्रमाणे आर्थिक व्यवस्थापनकौशल्य, व्यवसायिक क्षेत्रातील वाटचालीसंबंधी आणि व्यवस्थापकीय अभ्याक्रमातील पुढील संधीविषयी माहिती व मार्गदर्शन यामध्ये देण्यात आले.