News Flash

वाहनतळाच्या कामासाठी ठाणे रेल्वे स्थानक छपराविना

फलाटावरील प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसत येथे लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे.

ठाणे रेल्वे स्थानकाच्या फलाटावरील छत वाहनतळाच्या कामासाठी हटवण्यात आले आहे.  (छायाचित्र : गणेश जाधव)

उन्हाच्या वाढत्या कडाक्यात प्रवासी मात्र घामाघूम; पावसाळय़ापर्यंत छत पूर्ववत करण्याचा दावा

ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या प्रवाशांच्या दुचाकींसाठी वाहनतळ तयार करण्याचे काम सुरू असून त्यासाठी फलाट क्रमांक एकवरील छताचे पत्रे हटवण्यात आले आहेत. एकीकडे उन्हाच्या झळा दिवसेंदिवस तीव्र होत असताना फलाटावरील छतच गायब झाल्याने येथील प्रवाशांच्या अंगाची मात्र लाही लाही होऊ लागली आहे. या भागातील पादचारी पुलाच्या खांबांचे काम पूर्ण झाले असून वाहनतळाच्या खांबांचे काम सुरू आहे. हे काम पुढील आठवडय़ात संपल्यानंतर परिस्थिती पूर्ववत होईल, असे रेल्वे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.

ठाणे रेल्वे स्थानकात येणाऱ्या दुचाकी वाहनांना पार्किंगसाठी विस्तृत जागा नसल्याने रेल्वे प्रशासनाने दुचाकींसाठी वाहनतळ उभारण्याचे निश्चित केले. केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी या उपक्रमाचे दादर स्थानकातून भूमिपूजन पूर्ण केले होते. मात्र याठिकाणी असलेल्या झाडांमुळे वाहनतळाचे काम सुरुवातीपासून रखडून पडले होते. ही झाडे हटवण्यात आल्यानंतर आता प्रत्यक्ष कामास सुरुवात झाली आहे. याच भागामध्ये रेल्वेच्या पादचारी पुलाचेही काम सुरू आहे. या दोन्ही कामांसाठी फलाटांवरील छप्पर हटवण्यात आले आहे. त्यामुळे फलाटावरील प्रवाशांना उन्हाच्या झळा सोसत येथे लोकलची प्रतीक्षा करावी लागत आहे.

दरम्यान, येत्या आठवडय़ाभरात वाहनतळाच्या खांबाचे काम पूर्ण केले जाणार असून त्यामुळे प्रवाशांना किमान सावली उपलब्ध होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तर ‘वाहनतळाचे काम येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस पूर्ण होण्याची शक्यता असून येत्या पावसाळ्यापूर्वी रेल्वे फलाटावरील छप्पर टाकण्याचे काम पूर्ण केले जाईल,’ असा दावा रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ सूत्रांनी केला.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 10, 2016 2:06 am

Web Title: thane car parking issue
टॅग : Thane
Next Stories
1 उड्डाणपुलांच्या कामांमुळे वाहतूक कोंडीत भर
2 शास्त्रोक्त कचरा विल्हेवाट प्रकल्पाला विरोध
3 जिल्हा परिषदेच्या शाळेतील मुलींना ‘त्या’ दिवसांत दिलासा
Just Now!
X