संजीव जयस्वाल आयुक्त, ठाणे महापालिका

tv13ए का बाजूला घनदाट जंगलाने व्यापलेले येऊर आणि दुसऱ्या बाजूला निसर्गरम्य खाडी. निसर्गाची अशी अनमोल देणगी ठाणे शहराला लाभली आहे. तलावांमुळे या शहराला स्वत:ची अशी वेगळी ओळख प्राप्त झाली आहे. सामाजिक, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक पाऊ लखुणा या शहराने जतन केल्या आहेत. पण तरीही लोकांसाठी रात्री झोपण्यासाठी परत येण्याचे शहर यासाठीच ठाणे ओळखले जायचे. गेले अनेक वर्षे ठाण्याची ओळख मुंबईला लागून असलेले ‘डॉरमेटरी सिटी’ अशीच बनू लागली होती. मुंबई महानगर प्रदेशात या शहराचे स्वतचे असे महत्त्व असून ठाण्याचा नियोजनबद्ध विकास झाल्याखेरीज महानगर क्षेत्राच्या नियोजनाला अर्थ उरणार नाही. त्यामुळे मेट्रो, जल वाहतूक अशा ठोस वाहतूक प्रकल्पांना एकीकडे वेग दिला जात असताना ठाण्यालगत घोडबंदरच्या धर्तीवर नियोजित उपनगरांच्या विकासाचे आव्हान येत्या काळात पेलावे लागणार आहे.

गेल्या काही वर्षांत येथील नियोजन प्राधिकरणाने सातत्यपूर्ण प्रयत्न करून ठाण्याची ‘डॉरमेटरी सिटी’ ही ओळख पुसली जाईल, यासाठी प्रयत्न केले आहेत. पायाभूत सुविधांच्या बाबतीत हे शहर आता समृद्धीच्या मार्गावर वाटचाल करायला लागले आहे. त्यामुळे नव्याने वास्तव्यासाठी ठाण्याला आता अग्रक्रम मिळू लागला आहे. ज्या गतीने ठाणे शहराचा विकास होत आहे तसेच पायाभूत सुविधा निर्माण होत आहेत, ते पाहिल्यास मुंबईनंतर विकासाचे एक मोठे केंद्र म्हणून या परिसराचा उल्लेख करावा लागेल. किंबहुना मुंबई महानगर क्षेत्राचा विकासाचा केंद्रिबदू आगामी काळात ठाणे हाच राहाणार आहे. त्यामुळे पायाभूत सुविधांच्या सक्षमीकरणासाठी महपालिकेच्यावतीने अनेक योजना राबविण्यात येत आहेत. प्रत्येक क्षेत्रात या योजना राबवून त्या क्षेत्राचे सक्षमीकरण करण्याला आमचे प्राधान्य आहे. घनकचरा व्यवस्थापन, रस्ते बांधणी, पाणी पुरवठय़ाचे नियोजन, मलनि:सारण योजना, सक्षमीकरणासाठी शेकडो कोटी रुपयांच्या विकास योजना आखण्यात आल्या आहेत. या सर्व क्षेत्रात सद्य:स्थितीत जे सव्‍‌र्हिस लेव्हल बेंचमार्क निश्चित करण्यात आले आहेत त्यापेक्षाही कितीतरी पट वरचढ ठराव्यात अशा योजना आम्ही राबवीत आहोत. एकीकडे रुंद रस्ते, पायाभूत सुविधांचा विकास करत असताना शहराची कार्यक्षमता वाढवावी यासाठी काही पर्यायी स्रोतांचा विचार केला जात आहे. ऊर्जा कार्यक्षमता वाढावी यासाठी आम्ही अपारंपरिक ऊर्जा स्रोतांचा जास्तीत जास्त वापर करण्यावर भर दिला आहे. सौर ऊर्जेचा वापर करण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्याची प्रक्रिया आम्ही सुरू केली आहे. पायाभूत सुविधांचा विकास करताना आरोग्य, शिक्षण यांसारख्या मूलभूत क्षेत्रातही दर्जेदार सेवा देण्यासाठी विविध योजना राबविण्यात येत आहेत. महापालिका शाळांमधील मुलांना दर्जेदार शिक्षण मिळावे यासाठी ई-लर्निग, व्हर्च्यूअल क्लासरूम यांसारख्या महत्त्वाच्या योजना विविध संस्थांच्या सहकार्याने राबविण्यात येत आहेत. आरोग्य व्यवस्थापनासाठी संकरा नेत्रालय, टाटा कॅन्सर रुग्णालय, महापालिकांच्या आरोग्य केंद्रांमध्ये विशेष सुविधा पुरविण्यावर भर देण्यात येत आहे.

आव्हाने कायम

अर्थात नागरी कामे करताना अनेक आव्हानांचा सामना करावाच लागतो. बऱ्याचदा ही आव्हाने राजकीय स्वरूपाची असतात. लोकांशी निगडित कामे करायची झाल्यास त्याला विरोध होतोच. उदाहरणच द्यायचे झाले तर मलनि:सारण प्रकल्पाचे देता येईल. मलनि:सारण प्रकल्प एखाद्या विभागात राबवायचा निर्णय घेतला तर लगेच त्या विभागातील लोकांचा त्या प्रकल्पाला विरोध सुरू होतो. विकास आराखडा राबवायचा निर्णय घेतला तर त्यालाही लगेच विरोध होतो आणि घनकचरा प्रकल्प तर कोणालाच नको असतो. एखाद्या विभागात घनकचरा प्रकल्प उभा करायचा म्हटले तरी नागरिकांचा विरोध होतो. विशेष म्हणजे या विरोधाचे नेतृत्व राजकीय स्वरूपाचे असल्याने त्यातून मार्ग काढताना अनेक अडचणी निर्माण होतात. विरोधाच्या या दुसऱ्या बाजूवर अंकुश कसा ठेवायचा हा मोठाच प्रश्न आहे.

निधी तुटवडय़ाला खासगीकरणाचा पर्याय

एखाद्या शहरामध्ये मूलभूत सुविधा काय असाव्यात याचा शहर विकास आराखडा तयार केलेला असतो.  त्या आराखडय़ानुसार काम करण्यासाठी मोठय़ा प्रमाणात निधीची आवश्यकता असते. कारण सर्वच प्रकल्प हे खासगी लोकसहभागातून मार्गी लागत नसतात. मोठय़ा प्रकल्पांसाठी मोठय़ा प्रमाणात भांडवल उभे करावे लागते. खाडी किनारा सुशोभीकरण प्रकल्प, जलवाहतूक प्रकल्प, वॉटर फ्रन्ट डेव्हलपमेंट यांसारखे प्रकल्प ठाणेच नव्हे आसपासच्या शहरांसाठी निर्णायक ठरू शकणार आहे. या नव्या पर्यायांचा विचार करणे आता क्रमप्राप्त आहे. या प्रकल्पांमळे या शहराचा चेहरा मोहरा बदलणार आहे. पण यासारखे भव्य-दिव्य प्रकल्प राबविताना उत्पन्नाच्या मर्यादाही जाणवतात. त्यामुळे इच्छा असूनही असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प राबविताना केवळ  निधीच्या मर्यादेमुळे अडचणी निर्माण होतात ही वस्तुस्थती आहे. नव्या शहराच्या वाढीच्या नियोजन हे आणखी एक नवे आव्हान आहे. या आव्हानाचा मुकाबला करण्यासाठी अनेक पातळ्यावर कालबद्ध नियोजन करण्याची गरज आहे. सर्वप्रथम अस्तित्वातील जमिनीचा वापर कसा करता येईल याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अस्तित्वातील जमिनी मोकळी करून त्याचे नियोजन करणे महत्वाचे आहे. याशिवाय खासगीकरणाच्या माध्यमातून या प्रकल्पांना वेग मिळवून द्यावा लागेल.

क्लस्टर ही काळाची गरज

नव्या शहराच्या वाढीचे नियोजन करण्यासाठी क्लस्टर योजना राबविणे अनिवार्य आहे. तरच प्राप्त जागेचा पुरेपूर उपयोग करता येणार आहे ही गोष्ट ध्यानात ठेवून त्याप्रमाणे त्याचे नियोजन करण्याची आवश्यकता आहे. सद्य:स्थितीत ठाणेच नव्हे तर सर्वच प्रमुख शहरांचा हॉरिझोन्टल विकास करण्यावर भर आहे. आता विकासाचे हे मॉडेल बदलण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. हॉरीझोन्टल विकासाचा ताळमेळ साधत आता व्हर्टिकल विकास करण्यावर भर देण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अर्थात विकासाचा हा ताळमेळ साधताना उपलब्ध सुविधांवर त्याचा ताण पडणार नाही याचीही काळजी घेण्याची गरज आहे.  मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण क्षेत्रातील ठाण्यालगत असलेल्या मीरा-भाईंदर, वसई विरार, उल्हासनगर, भिवंडी या शहरांचे विस्तारीकरणही झपाटय़ाने होत आहे. अशा परिस्थितीत नवीन ठाण्याचे कालबद्ध नियोजन करणे आता काळाची गरज आहे.

संजीव जयस्वाल आयुक्त, ठाणे महापालिका

 (शब्दांकन : जयेश सामंत)