सध्याच्या जागेवर ‘टाऊन सेंटर’ उभारण्याचा पालिकेचा विचार; राज्य सरकारकडे प्रस्ताव पाठवणार

ठाणे, कळवा आणि साकेत परिसरातील नागरी वसाहतींपासून जेमतेम १०० ते १५० मीटरच्या परिघात असलेल्या ऐतिहासिक ठाणे मध्यवर्ती कारागृहाचे अन्यत्र स्थलांतर व्हावे, यासाठी ठाणे महापालिकेने जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत. ठाण्याच्या सेंट्रल मैदानाला लागूनच असलेल्या कारागृहाच्या विस्तीर्ण जमिनीवर ठाणेकरांच्या विरंगुळ्याच्या सुविधा असलेले ‘टाऊन सेंटर’ उभारण्याचा पालिकेचा विचार आहे. तर, ठाणे कारागृह घोडबंदरला स्थलांतरित करण्याची तयारी महापालिकेने दर्शवली आहे. याबाबतचा प्रस्ताव पालिकेकडून राज्य सरकारला पाठवण्यात येणार आहे, अशी माहिती ठाणे महापालिकेचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिली.

महाराष्ट्रातील बहुतांश प्रमुख तुरुंग ब्रिटिशकालीन असून ते बांधले तेव्हा लोकवस्तीपासून दूर होते. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहाला यापुर्वीच पुरातन वास्तूचा दर्जा मिळाला असून भौगोलिकदृष्टय़ा शहरातील महत्त्वाचा असा परिसर या कारागृहाने वेढला गेला आहे. शहरीकरणाच्या वाढत्या रेटय़ामुळे ठाण्याचे मध्यवर्ती तुरुंग शहराच्या मध्यभागी आले आहेत. या तुरुंगाभोवती लोकवस्ती नसावी या उद्देशाने ४ जानेवारी, १९६४ साली राज्य सरकारने एक परिपत्रक काढले होते. त्यानुसार तुरुंगाच्या तटभिंतीपासून १८२.८८ मीटर अंतरावरील जागा बिगरशेतीसाठी देऊ  नये, असे स्पष्ट करण्यात आले. जुलै, २००८ रोजी यासंबंधी नवा अध्यादेश काढण्यात आला आणि मध्यवर्ती कारागृहाभोवती १५० मीटर अंतरावर कोणतेही बांधकाम करता येणार नाही, असे ठरविण्यात आले. ठाण्याच्या मध्यवर्ती कारागृहापासून साधारणत: १०० मीटर अंतरावर पोलीस दलाच्या वसाहती आहेत. तसेच लगतच राबोडीतल्या शेकडो झोपडय़ा आहेत. या सर्व बांधकामांचा पुनर्विकास शासनाच्या १५० मीटरच्या बंधनामुळे अडचणीत येण्याची भीती होती. या मुद्दा विधि मंडळात गाजल्यानंतर १५० मीटरची अट रद्द करून ती ५०० मीटर करण्यात आली असली तरी कारागृहाचे असे ‘मध्यवर्ती’ ठिकाणी असणे शहराच्या नियोजनात अडथळा ठरू लागल्याचे स्थानिक नियोजन प्राधिकरणाचे मत बनले आहे.

शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेला २८ एकर क्षेत्रफळाचा विस्तीर्ण भूखंड मध्यवर्ती कारागृहाच्या बंधनातून मुक्त करण्याच्या हालचालींना पुन्हा एकदा वेग आला असून या ठिकाणी नागरिकांच्या सुविधांसाठी एखादे टाऊन सेंटर उभारता येईल का याची चाचपणी महापालिका प्रशासनाने सुरू केली आहे. नागरी वस्तीपासून हाकेच्या अंतरावर असलेले हे कारगृह स्थलांतरित केले जावे, अशा स्वरूपाची मागणी शिवसेनेचे तत्कालीन आमदार एकनाथ शिंदे यांनी यापूर्वी विधिमंडळात केली होती. या मागणीचा आधार घेत बुधवारी आयोजित करण्यात आलेल्या सर्वसाधारण सभेत शिवसेना नगरसेवक नरेश म्हस्के यांच्याकडून हा ठराव मांडण्यात येणार आहे, अशी माहिती महापालिकेतील सूत्रांनी दिली.

मध्यवर्ती कारागृहात मोठय़ा संख्येने कैदी असून या ठिकाणी अत्यंत संवेदनशील अशा अंडा सेलची व्यवस्था आहे. हे लक्षात घेऊन घोडबंदर भागात कारागृहासाठी वेगळी जागा उपलब्ध करून देण्याची महापालिकेची तयारी आहे, असे आयुक्त जयस्वाल यांनी सांगितले. तळोजा येथे सद्य:स्थितीत असलेल्या कारागृहाचे विस्तारीकरण करण्याची सरकारची तयारी असल्यास त्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यास महापालिका तयार आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले. शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेली मोठी जागा उपलब्ध झाल्यास ठाणेकरांना विरंगुळ्याचे एखादे मोठे ठिकाण विकसित केले जाऊ शकते, असेही जयस्वाल यांनी स्पष्ट केले.