वीसपैकी सात प्रवेशद्वारे बंद करणार; अन्य प्रवेशद्वारांवर नवीन सुरक्षा यंत्रणा; आत-बाहेर जाण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था

मध्य रेल्वेवरील सर्वाधिक गर्दीचे स्थानक असलेल्या ठाणे स्थानकाची सुरक्षाव्यवस्था भक्कम करण्यासाठी रेल्वे प्रशासनाने अखेर पावले उचलली आहेत. याची सुरुवात स्थानकातील प्रवेशद्वारांपासूनच करण्यात येणार असून सध्या असलेल्या २० प्रवेशमार्गापैकी सात मार्ग बंद करण्याची रेल्वे सुरक्षा दलाची योजना आहे. याखेरीज स्थानकात आत व बाहेर ये-जा करण्यासाठी स्वतंत्र प्रवेशद्वारे, प्रत्येक प्रवेशद्वारांवर तपासणीसाठी सुरक्षारक्षक व उपकरणे तैनात करण्यात येणार आहेत. येत्या दोन महिन्यांत याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू होईल. उपनगरीय रेल्वे प्रवाशांच्या संख्येत गेल्या काही वर्षांत मोठी वाढ होत असून त्यामुळे प्रवास करणेही जिकिरीचे झाले आहे. वाढलेल्या प्रवासी संख्येमुळे रेल्वे स्थानकांतील सुविधा व सुरक्षा व्यवस्थेवरही

ताण पडत असून त्यामुळे संपूर्ण नियोजनही बिघडले आहे. ठाणे स्थानकाचीही तीच परिस्थिती झाली आहे. २०१७-१८ मध्ये ठाणे स्थानकातून दर दिवशी २ लाख ६२ हजार ४०९ प्रवासी प्रवास करत होते. हीच संख्या आता जवळपास तीन लाखांपर्यंत पोहोचली आहे. या स्थानकात दहा फलाट असून मध्य रेल्वे मुख्य मार्ग व ठाणे-वाशी-पनवेल ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल गाडय़ा सुटतात. त्यामुळे पडणारा ताण पाहता सुरक्षा व्यवस्था मजबूत होणे गरजेचे असल्याचे सुरक्षा दल अधिकारी सांगतात.

ठाणे स्थानकात २० अधिकृत व अनधिकृत प्रवेशद्वार असून यामधून प्रवाशांची मोठय़ा प्रमाणात ये-जा सुरू असते. सध्या रेल्वे सुरक्षा दल व लोहमार्ग पोलीसांचे मनुष्यबळ, स्थानकातील प्रवासी संख्या, प्रवेशद्वार पाहता सुरक्षा व्यवस्थेचे तीनतेराच वाजलेले दिसतात. त्यामुळे चोख सुरक्षा व्यवस्थेबरोबरच प्रवाशांनाही शिस्त लागावी यासाठी २० पैकी सात प्रवेशद्वार बंद करतानाच उर्वरित सुरू राहणाऱ्या प्रवेशद्वारांवर मेट्रो स्थानक पद्धतीने सुरक्षेचे नियोजन केले जाणार आहे. आतापर्यंत सुरक्षा दलाने ४ प्रवेशद्वार बंद केले आहेत. उर्वरित १३ प्रवेशद्वारांवर आत व बाहेर जाण्याचे मार्ग स्वतंत्र केले  जातील. त्यातूनच प्रवाशांना प्रवेश करता येईल व बाहेर पडता येणार आहे.

सरकते दरवाजे

ठाणे स्थानकाच्या प्रवेशद्वारावर ‘रोलर गेट’ म्हणजेच सरकता दरवाजा बसवण्यात येणार आहे. सातपैकी चार प्रवेशद्वारांवर अशी दारे बसवून ते मार्ग बंद करण्यात येतील. याशिवाय सीसीटीव्ही कॅमेरा, डोअर मेटल डिटेक्टर, श्वानपथक  बॅगेज स्कॅनर मशिनसह अन्य सुरक्षा यंत्रणा वाढवण्यात येईल.

अन्य स्थानकांतही व्यवस्था

मध्य रेल्वे सुरक्षा दलाने गर्दीचे स्थानक असलेल्या सीएसएमटी, दादर, कुर्ला, लोकमान्य टिळक टर्मिनस, ठाणे, कल्याण स्थानकात चोख सुरक्षा व्यवस्थेसाठी प्रस्ताव तयार केला आहे. प्रथम ठाणे स्थानकानंतर कुर्ला व सीएसएमटीतील सुरक्षा व्यवस्थेत बदल केले जातील.

एप्रिल २०२० नवीन सुरक्षा पद्धत?

या मार्गांवर प्रवासी व त्यांचे सामान तपासणीसाठी सुरक्षा रक्षक ‘मेटल डिटेक्टर’सह तैनात असतील. तर बॅगेज स्कॅनर मशीनही ठेवले जाणार आहे. येत्या एक ते दोन महिन्यात ही सर्व यंत्रणा आणून त्याचा प्रयोग केला जाईल व प्रवाशांचा प्रतिसाद पाहता एप्रिल २०२० पासून नवीन सुरक्षा पद्धत कायम केली जाणार आहे.

मध्य रेल्वेवरील ठाणेसह आणखी पाच स्थानकांत सुरक्षा व्यवस्थेत बदल करण्याचा निर्णय घेतला असून टप्प्याटप्यात काही बदल केले जात आहेत. लवकरच ठाणे स्थानकात मेट्रो स्थानक पद्धतीने सुरक्षाविषयक मोठे बदल दिसतील. या स्थानकातील सुरक्षेसाठी आणखी ६० अतिरिक्त मनुष्यबळाचीही गरज आहे. – अशरफ के.के (वरिष्ठ विभागीय सुरक्षा आयुक्त, रेल्वे सुरक्षा दल, मध्य रेल्वे)