प्रकल्पाचे काम दोन टप्प्यांऐवजी एकाच टप्प्यात

गुजरातमधील साबरमती आणि सिंगापूरमधील मरीन-बे चौपाटी या दोन मोठय़ा प्रकल्पांच्या धर्तीवर आखण्यात आलेल्या कळवा, पारसिकनगर येथील चौपाटी उभारणीचे काम अधिक वेगाने व्हावे यासाठी दोन टप्प्यांत काढण्यात आलेली कामाची निविदा रद्द करण्यात आली असून एकाच टप्प्यात हे काम केले जाणार आहे. दोन वेगवेगळ्या ठेकेदारांमार्फत हे काम केले गेल्यास चौपाटी उभारणीच्या प्रक्रियेत विलंब होऊ शकतो, असे महापालिका प्रशासनाचे मत बनले आहे. त्यामुळे ७० कोटी रुपयांची एक निविदा काढण्याचा निर्णय अभियांत्रिकी विभागाने घेतला असून आयुक्त संजीव जयस्वाल यांनी त्यास हिरवा कंदील दाखविला आहे.

ठाण्यातील मुंब्रा बाह्य़वळण मार्ग ते खारेगाव टोल नाका या रस्त्यालगत असलेल्या खाडीकिनारी भागात चौपाटी उभारण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची आखणी करण्यात आली असून त्यासाठी महिनाभरापूर्वी येथील अतिक्रमण हटविण्याची मोठी मोहीम राबविण्यात आली होती. तत्कालीन जिल्हाधिकारी अश्विनी जोशी यांच्या संकल्पनेतून या चौपाटीचा आराखडा पुढे आला होता. मात्र, नंतरच्या काळात जिल्हाधिकारी प्रशासनाने चौपाटीच्या जागेवरील अतिक्रमण काढण्यात दिरंगाई दाखविल्याने महापालिका प्रशासनाने हा विडा उचलला. या ठिकाणी चौपाटी उभारण्याचा प्रकल्पही आता महापालिकेमार्फत राबविला जाणार असून त्यासाठी तब्बल ७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

पारसिकनगर चौपाटीचा विकास करताना दोन टप्प्यांत हे काम करण्याचा आराखडा अभियांत्रिकी विभागाने तयार केला होता. त्यानुसार २८ कोटी रुपयांच्या दोन वेगवेगळ्या निविदा काढण्यात येणार होत्या. साडेतीन किलोमीटर अंतराची चौपाटी विकसित करताना चौपाटीचा विकास आणि विविध खेळांच्या उभारणीसाठी आवश्यक कामे वेगवेगळ्या ठेकेदारांमार्फत केली जाणार होती. मात्र, ही प्रक्रिया वेळकाढूपणाची ठरण्याची शक्यता असल्याने एकाच ठेकेदारामार्फत एकत्रित काम करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. निविदा प्रक्रिया पूर्ण होताच डिसेंबर महिन्यापर्यंत चौपाटी उभी राहावी असा महापालिकेचा प्रयत्न आहे. त्यामुळे या कामाचा वेग वाढावा आणि निधीवाटपातही सुसूत्रता यावी यासाठी जुने कंत्राट रद्द करण्यात आले आहे, असे जयस्वाल यांनी स्पष्ट केले.

ठाण्याची चौपाटी..

  • साडेतीन किलोमीटपर्यंतच्या खाडीकिनारी भागात पारसिक चौपाटी विकसित केली जाणार आहे.
  • या भागात भविष्यात कोणताही प्रकल्प उभारता यावा, यासाठी चौपाटीच्या दोन्ही बाजूचा काही परिसर मोकळा सोडला जाणार आहे.
  • चौपाटी विकसित करताना मनोरंजन, चौपाटी आणि विविध खेळ असे झोन तयार करण्यात येणार आहेत.
  • विसर्जन घाट, पार्किंग झोन, स्वच्छतागृह, स्केटिंग एरिया, आऊटडोअर स्पोर्टस्, जॉगिंग ट्रॅक, शिल्पसारखे पदपथ, थीम पार्क, बोटिंग, अ‍ॅम्पी थिएटर, खाद्यपदार्थ विक्रीची दुकाने, मनोरंजन पार्क, मोठा आकाशपाळणा अशा प्रकारे चौपाटी विकसित केली जाणार आहे.
  • खाडीकिनारी भागाची सफर करण्यासाठी त्या ठिकाणी तरंगती मार्गिका करण्यात येणार आहे.