करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याने संपूर्ण ठाणे शहरात टाळेबंदी लागू होणार असल्याच्या वृत्ताने दोन दिवस संभ्रमाचे वातावरण होते. मात्र, रुग्ण वाढत असलेल्या संवेदनशील भागांमध्येच टाळेबंदी करण्यात येईल, असे महापालिका प्रशासनाने रविवारी स्पष्ट केले आहे. पण, हे निर्बंध कधीपासून लागू होणार याची तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली असून यामुळे करोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी संपूर्ण ठाण्यात पुन्हा टाळेबंदी लागू केली जाण्याची चर्चा दोन दिवसांपासून सुरू आहे. या पार्श्वभूमीवर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांनी रविवारी एका व्हिडीओ संदेशाद्वारे भूमिका स्पष्ट केली. बाळकुम, कोलशेत, ढोकाळी, राम मारुतीनगर, मानपाडा, घोडबंदरचा काही भाग, कोपरी, नौपाडा, वागळे इस्टेट, किसननगर, शांतीनगर, पडवळनगर, वारलीपाडा, रामनगर, सीपी तलाव, इंदिरानगर, सावरकर, लोकमान्यनगर, कळवा, मुंब्रा आणि कौसा या परिसरांतील संवेदनशील भागांत टाळेबंदी लागू केली जाणार आहे, असे ते म्हणाले.


मात्र, निर्बंधांबाबतचा अंतिम निर्णय महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा, जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांच्या बैठकीत घेतला जाणार आहे. दरम्यान, ठाणे जिल्हायात रुग्णसंख्या वाढत असल्याने यापूर्वीच भिवंडी आणि अंबरनाथ शहरांत पूर्ण टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. उल्हासनगर आणि बदलापूरमध्येही काही भागांत टाळेबंदीचा विचार सुरू असून जिल्ह्यातील प्रमुख शहरांची वाटचाल संपूर्ण टाळेबंदीच्या दिशेने सुरू झाली आहे.