ठाणे जिल्ह्य़ातील विविध शहरे एकमेकांना मुख्य रस्ते किंवा महामार्गाच्या माध्यमातून जोडण्यात आलेली आहेत. त्यामुळे एखाद्या शहरात वाहतूक कोंडी झाली तर त्याचे परिणाम बाजूच्या शहरांमध्ये जाणवतात. त्याचा प्रत्यय नुकताच मुंबई-नाशिक महामार्गावरील साकेत खाडी पुलाच्या कामामुळे ठाणेकरांना आला आहे. तसेच सध्या विविध शहरांत उड्डाणपुलांची कामे सुरू आहेत. ही कामे पावसाळ्यातही सुरू राहणार असून या काळात वाहनांचा वेग आधीच कमी असतो. यामुळे शहरामध्ये वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील वाहतूक कोंडी भेदण्याचे मोठे आव्हान ठाणे वाहतूक पोलिसांपुढे आहे.

ठाणे, भिवंडी, कल्याण आणि जिल्ह्य़ातील ग्रामीण भागांना मुंबई-नाशिक महामार्गाद्वारे जोडण्यात आले आहेत. याशिवाय, या शहरांमध्ये कल्याण आणि भिवंडी शहरांमध्ये जाण्यासाठी अन्य पर्यायी मार्गही उपलब्ध आहेत. परंतु पर्यायी मार्गाच्या तुलनेत मुंबई-नाशिक महामार्गाचा वापर वाहनचालक सर्वाधिक करतात. या मार्गावरील साकेत खाडी पुलाच्या दुरुस्तीचे काम गेल्या आठवडय़ात हाती घेण्यात आले असून या कामामुळे महामार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. असे असले तरी सुरुवातीचे दोन दिवस ठाणे, कळवा, मुंब्रा, भिवंडी, कल्याण, डोंबिवली ही शहरे वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडली. एका पुलाच्या कामामुळे एकाच वेळी पाच ते सहा शहरांतील वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे दिसून आले. कोलमडलेली वाहतूक व्यवस्था पुन्हा पूर्ववत करताना वाहतूक पोलिसांना अक्षरश: घाम फुटला होता. २५ अधिकारी आणि २०० कर्मचारी असा भला मोठा फौजफाटा वाहतूक पोलिसांनी तैनात केला होता. तेव्हा कुठे शहरातील वाहतूक व्यवस्था दोन दिवसांनंतर पुन्हा सुरळीत झाली. असे असतानाच डोंबिवलीच्या स्फोटानंतर रसायन वाहतुकीसाठी वाहतूक पोलिसांना कॉरिडोअर करावा लागला. आधीच वाहतूक पोलिसांच्या ताफ्यात कमी कर्मचारी असल्यामुळे त्यांना साकेत पुलाचा काही ताफा या कामासाठी नेमावा लागला. त्यामुळे पोलिसांची अक्षरश: भंबेरी उडाली असतानाही त्यांनी वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवली. असे असले तरी या पुलाचे काम अजूनही सुरू असल्यामुळे वाहतूक पोलिसांना डोळ्यात तेल घालून जागता पाहरा द्यावा लागतो आहे. एकंदरीतच साकेत खाडी पुलाच्या कामाच्या निमित्ताने शहरांमधील दळणवळण व्यवस्था किती अपुरी आहे, हे यावरून स्पष्ट होते. त्यामुळे या व्यवस्थेत आता आणखी सुधारणा करण्याची गरज निर्माण झाली आहे.
उड्डाणपुलांची कामे..
ठाणे शहर वाहतूक कोंडीमुक्त व्हावे म्हणून शहरात तीन ठिकाणी उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. नौपाडा, अल्मेडा आणि मीनाताई ठाकरे चौक अशा तीन ठिकाणी हे उड्डाणपूल उभारण्यात येत आहेत; परंतु या भागातील रस्ते अरुंद असतानाही तिथे उड्डाणपूल उभारले जात आहेत. त्यामुळे या भागातील कोंडी सुटण्याऐवजी त्यात आणखी भर पडेल का, हे येत्या काळातच स्पष्ट होईल. तसेच ठाणे आणि कळवा या दोन शहरांना जोडण्यासाठी नवीन खाडी पूल उभारणीचे काम साकेत आणि कळवा परिसरात सुरू आहे. त्याचप्रमाणे मुंबई-नाशिक महामार्गावर माणकोली आणि रांजनोली या मुख्य जंक्शनवरही उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. खारेगाव टोल नाक्यापासून सोनाळे गावापर्यंत हा उड्डाणपूल उभारला गेला पाहिजे होता आणि मानकोली तसेच रांजनोली भागात भिवंडी व कल्याण शहरात जाण्यासाठी पुलावर मार्गिका तयार करायला हव्या होत्या, असे वाहतूक तज्ज्ञांचे मत आहे. असे असले तरी मानकोली आणि रांजनोली या भागात उभारण्यात येत असलेला उड्डाणपूल वाहतुकीच्या दृष्टिकोनातून किती फायदेशीर ठरेल, हे पुलाच्या कामानंतरच स्पष्ट होऊ शकेल. याशिवाय, ठाणे आणि नवी मुंबई या शहरांना जोडणाऱ्या ठाणे-बेलापूर मार्गावरही तीन उड्डाणपूल उभारणीचे काम सुरू आहे. एकंदरीतच या सर्व उड्डाणपुलांची कामे पावसाळ्यातही सुरूच राहणार असल्यामुळे शहरांमधील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्याचे आव्हान वाहतूक पोलिसांना पेलवावे लागणार आहे.
कोपरी चिंचोळा मार्ग..
मुंबई-नाशिक महामार्ग चार पदरी असला तरी ठाण्यातील कोपरी पुलाजवळ तो दोन पदरी आहे. महामार्गावरील चार पदरी मार्गिकेवरून वाहने वेगाने येतात, पण कोपरी पुलाजवळील चिंचोळ्या मार्गाजवळ (बॉटल नेक) त्यांचा वेग मंदावतो. चार पदरी मार्गिकेवरील वाहनांना दोन पदरी मार्गावरून जावे लागत असल्यामुळे वाहनांच्या रांगा लागतात. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने ही समस्या जाणवू लागली असून त्यामुळे मुंबई-ठाणे शहरांत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होऊ लागली आहे. या कोंडीवर तात्पुरता उपाय म्हणून वाहतूक पोलिसांनी कोपरी पुलावरील अतिरिक्त मार्गिकेचा पर्याय काढला आहे. परंतु हा पर्याय कायमस्वरूपी उपाय ठरू शकत नाही. या पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्यात येणार असून ते पावसाळ्यात करणे शक्य नाही. त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत ठेवण्यासाठी वाहतूक पोलिसांना पुलावरील वाहतुकीवर अधिक लक्ष द्यावे लागणार आहे. त्याचप्रमाणे घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद महामार्गावरही कोंडी होऊ लागली असून त्याकडेही पोलिसांना लक्ष द्यावे लागणार आहे.
अवजड वाहतुकीचा भार..
भिवंडी शहरात मोठय़ा प्रमाणात गोदामे असून विविध नामांकित कंपन्यांचा माल साठवून ठेवला जातो. त्यामुळे गोदामांमधून मालाची वाहतूक करणाऱ्या वाहनांचा आकडाही मोठा आहे. शीळ फाटा, मुंब्रा, खारेगाव यामार्गे किंवा शीळ फाटा, डोंबिवली आणि कल्याण या मार्गे ही वाहने भिवंडीत प्रवेश करतात. ठाणे शहरात दिवसभर अवजड वाहतुकीस बंदी असते. मात्र रात्री आठनंतर या वाहनांना शहरातून वाहतूक करण्यास मुभा देण्यात येते. त्यामुळे मुंबई-नाशिक महामार्गे किंवा कळवा- साकेत मार्गे घोडबंदरकडे जाणाऱ्या वाहनांचा आकडा मोठा असतो. सकाळ आणि दुपारच्या वेळेत ही वाहने शहराबाहेरून गुजरात किंवा मुंबईच्या दिशेने सोडण्यात येतात. त्यामुळे या वाहनांचा भार जिल्ह्य़ातील अन्य शहरांवर पडताना दिसून येत आहे.
त्यामुळेच कोंडीत आणखी भर पडते..
एखाद्या कामामुळे किंवा काही कारणास्तव शहरातील वाहतूक मार्गात बदल केले जातात. हे बदल तात्पुरते असतात आणि नागरिकांच्या सोयीसाठी असतात. नागरिकांना कोंडीत अडकून पडावे लागू नये आणि त्यांचा प्रवास सुसह्य़ व्हावा, याचा विचार करूनच हे बदल केले जातात. अनेकदा वाहतूक बदलातील पर्यायी मार्गामुळे नागरिकांना द्राविडी प्राणायाम करावे लागते. त्यामुळे अनेक जण वाहतूक बदल स्वीकारण्यास तयार होत नाहीत. तीन ते चार तास कोंडीत अडकून पडण्याऐवजी पर्यायी मार्गाने त्याहून कमी वेळेत इच्छीत स्थळी पोहोचता येईल, याचा विचार चालक करताना दिसून येत नाही. तसेच कोंडीत अडकल्यानंतर वाहनचालक विरुद्ध दिशेने वाहन चालविण्याचा प्रयत्न करतात आणि त्यामुळे वाहतूक कोंडीत आणखी भर पडते. याचा प्रत्यय वाहतूक पोलिसांना साकेत खाडी पुलाच्या कामादरम्यान आला. त्यामुळे वाहनचालकांची ही मानसिकता बदलणे गरजेचे आहे, असे वाहतूक पोलिसांचे म्हणणे आहे.

नीलेश पानमंद