किशोर कोकणे

येऊरसारखा निसर्गरम्य आणि वन्यजीवसंपदा असलेला परिसर म्हणून ओळख पावलेले ठाणे शहर गेल्या काही महिन्यांपासून वन्य प्राण्यांच्या तस्करीमुळे कुप्रसिद्ध होऊ लागले आहे. भिवंडी, नवी मुंबई, मुंबई, नाशिक तसेच मुंबई-अहमदाबाद महामार्गालगतच्या परिसरातील तस्करांनी प्राण्यांच्या तस्करीसाठी आपला मोर्चा ठाण्याकडे वळवल्याचे स्थानिक पोलिसांच्या तपासातून समोर येत आहे.

काही दिवसांपूर्वीच ठाणे पोलिसांच्या खंडणीविरोधी पथकाने वाघ, बिबटय़ा, मगरीचे कातडे आणि हस्तिदंत विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला माजिवडा येथून अटक केली होती. त्यानंतर पाच दिवसांनी पुन्हा एकदा गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचने वागळे इस्टेट येथील कामगारनगर परिसरात बिबटय़ाच्या कातडय़ाच्या विक्रीसाठी आलेल्या दोघांना अटक केली. राज्यातील ग्रामीण भागातून हे तस्कर मुंबईच्या दिशेने येत असून यात सर्वाधिक समावेश रायगड भागातील तस्करांचा आहे.

मुंबईमध्ये तस्करांचे जाळे मोठय़ा प्रमाणात असून या तस्करीतून पैसाही रग्गड मिळत असल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले. तसेच ठाणे शहर हे पळ काढण्यासाठी अत्यंत सुरक्षित असल्याचे तस्कर मानत आहेत. त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये या तस्करांचे केंद्रबिंदू ठाणे शहर ठरत आहे. निवडणुकांच्या हंगामात ठाणे शहरातून वन्य प्राण्यांच्या कातडय़ांची तस्करी मोठय़ा प्रमाणावर वाढल्याचे सूत्रांनी सांगितले. पोलिसांनी मे महिन्यात केलेल्या कारवाईत तीन वेळा अशा पद्धतीच्या तस्करांना जेरेबंद केले. जानेवारी महिन्यातही अशीच एक टोळी पोलिसांनी गजाआड केली होती.

ठाणे, बदलापूर, भिवंडी या शहरांच्या आसपास मोठय़ा प्रमाणावर जंगले असून या ठिकाणी प्राण्यांची शिकार करून तस्करीचे प्रकार वाढीस लागल्याचे सूत्रांनी सांगितले. या प्रकारांना अटकाव घालण्यासाठी वन विभागाकडून सातत्याने प्रयत्न सुरू असल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केला. ठाणे शहरातून नाशिक, मुंबई-अहमदाबाद तसेच माळशेजमार्गे नगर, औरंगाबाद, पुण्याच्या दिशेने पळ काढणे सोयीचे ठरत असल्याने तस्करांचा वावर या ठिकाणी वाढला आहे, असा दावा वन विभागातील वरिष्ठ अधिकारी करीत आहेत. पोलिसांच्या चौकशीतही हाच मुद्दा पुढे आल्याचे सूत्रांनी सांगितले.

वन्य प्राणी तस्करांवरील कारवाई

२०१९

* २१ मे – वागळे इस्टेट येथील कामगार नगरमध्ये दोन तस्करांकडून बिबटय़ाचे कातडे जप्त

*  १६ मे- माजिवडा येथे एका तस्कराकडून वाघ, बिबटय़ा, मगरीचे कातडे आणि दोन हस्तिदंत जप्त

*  ७ मे- कळवा येथे जिवंत मांडुळ, साप तस्करी करणारे दोन जण अटक

*  ८ जानेवारी- डायघर येथे एका तस्कराकडून जिवंत खवले मांजर जप्त

२०१८

*  २८ नोव्हेंबर- हरणांची शिंगे आणि कातडी तस्करी करणाऱ्या तिघांना कौसा येथून अटक

*  ११ ऑक्टोबर- बाळकुम येथे जिवंत खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या एकाला अटक

*  ३ ऑक्टोबर- व्हेल माशाच्या उलटीची (अंबरग्रीस) आणि जिवंत खवले मांजर विक्रीसाठी आलेल्या तिघांना अटक

ठाणे शहरातून तस्करांना इतर कोणत्याही ठिकाणी जाता येते. त्यामुळे तस्कर ठाणे शहरात येतात. गेल्या काही महिन्यांपासून वनविभागाने अनेक तस्करांना अटक केली आहे. तसेच ठाणे पोलिसांचीही आम्हाला मदत मिळत आहे. त्यामुळे तस्करांचे जाळे मोडून काढण्यात आम्हाला यश येत आहे.

-जितेंद्र रामगावकर, उपवनसंरक्षक, ठाणे वन विभाग.