News Flash

ठाण्यात शुकशुकाट : बंदमध्ये सहभागी नसतानाही शहरातील गजबज कमी;

राठा क्रांती मोर्चाच्या ठाणे समितीनेही बुधवारी पत्रकार परिषद घेत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते.

(संग्रहित छायाचित्र)

दुपापर्यंत अनेक भागांत दुकाने, वाहतूक बंद

मराठा क्रांती मोर्चा समितीने पुकारलेल्या महाराष्ट्र बंदमधून ठाणे शहराला वगळण्यात आले असतानाही गुरुवारी संपूर्ण शहरात ‘अघोषित’ बंद पाळला गेला. गेल्या महिन्यात मराठा आंदोलनादरम्यान झालेल्या हिंसाचाराच्या पाश्वभूमी नागरिकांनी घराबाहेर पडणे टाळले तसेच वाहनांची वाहतूकही नसल्यामुळे दुपापर्यंत ठाण्यातील अनेक रस्त्यांवर शुकशुकाट होता. आंदोलन अचानक उसळण्याच्या भीतीने मुख्य शहरासह घोडबंदरमधील अनेक भागांत मॉल तसेच दुकाने बंद ठेवण्यात आली होती. दुपारनंतर मात्र, सर्व व्यवहार सुरळीत सुरू झाले.

मराठा क्रांती मोर्चाने बुधवारी महाराष्ट्र बंदची घोषणा करताना त्यातून ठाण्यासह नवी मुंबई आणि अन्य काही शहरांना वगळल्याची घोषणा केली होती. मराठा क्रांती मोर्चाच्या ठाणे समितीनेही बुधवारी पत्रकार परिषद घेत बंदमध्ये सहभागी होणार नसल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरीही गुरुवारी ठाण्यात बंदचा ताण दिसून आला. २५ जुलै रोजी झालेल्या मराठा आंदोलनादरम्यान ठाण्यात अनेक ठिकाणी हिंसाचार झाला होता. वाहनांची मोडतोड, महामार्गावरील ‘रास्ता रोको’, दगडफेक अशा घटनांमुळे ठाणेकरांना त्या दिवशी प्रचंड हाल सोसावे लागले. याचा धसका घेत गुरुवारी बंद नसतानाही ठाणेकरांनी दैनंदिन व्यवहार गुंडाळून ठेवले.

ठाणे शहरातील मुंबई-नाशिक तर घोडबंदर भागातील मुंबई-अहमदाबाद या दोन्ही महामार्गावरून सकाळच्या वेळेत अनेक नोकरदार खासगी वाहनातून मुंबईच्या दिशेने प्रवास करतात. या वाहनांची संख्या मोठी असल्यामुळे सकाळच्या वेळेत दोन्ही महामार्गावर वाहतूक कोंडी होते. सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत ही कोंडी असते.

मात्र, गुरुवारी सकाळी अनेक नोकरदारांनी कामावर जाणे टाळल्याने त्यांची वाहने रस्त्यावर आली नाहीत. त्यामुळे रस्त्यावर केवळ टीएमटी, रिक्षा आणि दुचाकी वाहनांची वाहतूक सुरू होती. नोकरदार वर्गाच्या वाहनांची संख्या घटल्यामुळे रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती. माजिवाडा नाका येथून ठाणे स्थानकाच्या दिशेने जाणाऱ्या मीनाताई ठाकरे चौकातील मार्गावर दररोज प्रचंड वाहतूक कोंडी असते. या मार्गावर उड्डाण पूल उभारणीचे काम सुरू असल्यामुळे ही कोंडी होते. या कोंडीमुळे माजिवाडा ते मीनाताई ठाकरे चौक या पाच मिनिटांच्या अंतरासाठी २० मिनिटांपेक्षा जास्त अवधी लागतो. परंतु गुरुवारी या मार्गावरही वाहनांची संख्या कमी असल्यामुळे वाहतूक विनाअडथळा सुरू होती. एरवी वाहतुकीमुळे गजबजणारे अल्मेडा चौक, हरिनिवास, गोखले रोड, तलावपाळी या भागांतील रस्त्यांवरील वाहतूक सुरळीतपणे सुरू होती.

निषेध आणि श्रद्धांजली

ठाणे शहरातील जिल्हाधिकारी कार्यालय, कळवानाका, कोपरी अष्टविनायक चौक, वर्तकनगर नाका, वागळे इस्टेट प्रभाग समिती कार्यालयजवळ आणि सूरज वॉटर पार्क या सहा ठिकाणी सकाळी तोंडाला काळ्या पट्टय़ा बांधून मराठा क्रांती मोर्चाने राज्य सरकारचा निषेध केला. या आंदोलनादरम्यान मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मृत पावलेल्या २१ जणांना श्रद्घांजली वाहण्यात आली. त्याचबरोबर शहीद मेजर कौस्तुभ राणे यांनाही समाजाने या वेळी श्रद्धांजली अर्पण केली. या आंदोलनानंतर आता पुढील आंदोलनाची दिशा लवकरच ठरविण्यात येणार असल्याचे समितीच्या वतीने पत्रकारांना सांगण्यात आले.

कडेकोट बंदोबस्त..

ठाण्यातील मराठा क्रांती मोर्चा समितीने बंदमधून माघार घेतली असली तरी गेल्या महिन्यात झालेल्या हिंसक आंदोलनाच्या पाश्र्वभूमीवर ठाणे पोलिसांनी गुरुवारी संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात केला होता. एक दिवस आधी शहरातील रस्त्यांवर संचलन केले होते. त्यात ठाणे पोलीस दलातील अधिकारी-कर्मचारी, राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा आणि विशेष पथकाचा समावेश होता. आंदोलनाला हिंसक वळण देणाऱ्या समाजकंटाकांवर नजर राहावी यासाठी पोलिसांनी शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी ड्रोनचा वापर केला. त्यामुळे शहरात कुठेही अनुचित प्रकार घडलेला नसल्याचे वृत्त आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 3:18 am

Web Title: thane city was closed after the maharashtra bandh called by the maratha kranti morcha committee
Next Stories
1 उत्पन्नवाढीसाठी कडोंमपाचे ‘मनोरे’
2 बंदमुळे सर्वसामान्यांचे हाल
3 ‘किकी चॅलेंज’ महागात पडले!
Just Now!
X