तलावांच्या परिसरात मोहिमेला हरताळ; सर्वत्र कचऱ्याचे ढीग

ठाणे शहरामध्ये दीपावलीनिमित्त करण्यात येणाऱ्या फटाक्यांच्या आतषबाजीमध्ये यंदा कमी आवाजाच्या फटाक्यांचा वापर करण्यात आला असला तरी शहरात त्याचा बऱ्यापैकी कचरा साचून राहिला आहे. त्यामुळे दिवाळीपूर्वी हाती घेतलेल्या ‘स्वच्छ-सुंदर ठाणे’ मोहिमेला हरताळ फासल्याचे चित्र अनेक ठिकाणी आहे.

काही दिवसांपूर्वी ठाणे शहरात स्वच्छता मोहिमेचा ‘मेगा इव्हेंट’ पार पडला. यावेळी आपल्या धडक मोहिमांसाठी प्रसिद्ध असलेले ठाण्याचे आयुक्त संजीव जयस्वाल यांनी ठाणे स्वच्छ आणि सुंदर ठाण्यासाठी कोणकोणते प्रयत्न केले हे सांगितले. मात्र काही दिवसांतच आयुक्तांच्या या मेगा इव्हेंटचा बोजवारा उडाल्याचे चित्र ठाण्यातील तलावांच्या आसपास दिसून येते.

ठाणे शहर हे तलावांचे शहर मानले जाते. त्यामुळे दिवाळीमध्ये शहर भागातील सर्वच मंडळी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी तलावपाळी किंवा उपवन तलाव परिसरात मोठय़ा प्रमाणात जमतात. यंदाही दिवाळीत नागरिकांनी फटाक्यांची आतषबाजी करण्यासाठी उपवन तलाव परिसरात गर्दी केली होती. तलावपाळी, राममारुती रोड, उपवन तलाव या ठिकाणी मित्रमंडळींसह एकत्र येत आतषबाजी करण्यात आली.

पूर्वी मध्यरात्रीनंतरही फटाक्यांची आतषबाजी सुरू असे. मात्र आता रात्री १० नंतर ध्वनिक्षेपकाचा वापर आणि फटाके वाजविण्यावर न्यायालयाने बंदी घातल्याने हे प्रकार आता कमी झाले आहेत, मात्र दहा वाजेपर्यंत वारेमाप फटाके वाजविले गेले. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी व्यापारी मंडळीनी मोठय़ा प्रमाणात फटाक्यांची आतषबाजी केली. त्यामुळे ठाण्यातील ध्वनी-वायुप्रदूषणात तर भर पडलीच, शिवाय दुसऱ्या दिवशी सकाळी फटाक्यांचा कचरा हटवताना सफाई कामगारांचे कंबरडेच मोडले.

दिवाळीत रोज या भागांतून फटाक्यांचा सुमारे दहा ते बारा मेट्रीक टन कचरा निर्माण होतो. फटाका फुटल्यानंतर अर्धवट जळलेली सुतळ, कागदांचे कपटे, पुठ्ठा असा सुक्या कचऱ्याचा त्यात समावेश असतो. तलावपाळी आणि उपवन परिसरात मोठय़ा प्रमाणात आतषबाजी होत असल्याने सर्वाधिक कचरा या भागातून गोळा होतो. दिवाळीत केवळ उपवनमध्ये दिवसाला सरासरी दोन ते तीन टन कचरा गोळा होतो. कचऱ्याबरोबर फटाक्यांमधून निघणारा धूर आणि आवाज यामुळे वायू आणि ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत असल्याची तक्रार  रहिवासी करत आहेत.