वाहतूक कोंडीचे चक्रव्यूह भेदण्याचा उपाय; दुपारी १२ ते ४ वाहतुकीस मुभा

ठाणे शहराला वाहतूक कोंडीच्या चक्रव्यूहातून सोडविण्यासाठी वाहतूक पोलिसांनी आता सकाळ-संध्याकाळी शहरात अवजड वाहनांना बंदी केली आहे.

ठाणे शहर वाहतूक कोंडीच्या विळख्यात सापडले असतानाच त्यात मुंबई, नवी मुंबई, नाशिक या शहरातून येणाऱ्या अवजड वाहनांची कोंडीत भर पडू लागली आहे. या पाश्र्वभूमीवर ठाणे वाहतूकपोलिसांनी अवजड वाहतुकीला शहरात बुधवारपासून प्रवेश बंदी केली आहे. सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळात ही अवजड वाहतूक शहराच्या सीमेबाहेर रोखण्यात येणार आहे. ठाणे शहर वाहतुक विभागाचे पोलीस उपायुक्त संदीप पालवे यांनी ही अधिसूचना घोषित केली असून पुढील ३० दिवस प्रायोगिक तत्त्वावर ती लागू राहील.

ठाणे शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना २४ तास मुक्त वावर असल्यामुळे शहरात दाखल होणाऱ्या वाहनांची संख्या मोठी आहे. शहराबाहेरून येणाऱ्या वाहनांचा शहरातील वाहतूक व्यवस्थेवर मोठा ताण निर्माण होऊन शहरात वाहतुक कोंडी निर्माण होत आहे. रिक्षा वाहतूक, सार्वजनिक बस, शाळेच्या गाडय़ा आणि खासगी वाहनांच्या गर्दीत आणि त्यात इतर शहरांतून येणाऱ्या अवजड वाहनांची पडणारी भर यामुळे शहर वाहतुक कोंडीच्या विळख्यात सापडले आहे. वाहतुकीची ही कोंडी सोडवण्यासाठी शहराबाहेरून येणाऱ्या अवजड वाहनांना (सहापेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांना) गर्दीच्या काळात शहराबाहेर रोखण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय ठाणे वाहतुक पोलिसांनी बुधवारी घेतला. त्यामुळे नवी मुंबई, मुंबई, नाशिक आणि भिवंडी या शहरांतून ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना सकाळी ८ ते १२ आणि सायंकाळी ४ ते रात्री १० या वेळेत शहरांच्या सीमेबाहेर रोखण्यात येणार आहे. संबंधित अधिसूचनेवर नागरिकांकडून हरकती व सूचना मागविण्यात आल्या आहेत.

वाहतूक बदल असे..

  • जे.एन.पी.टी., नवी मुंबई या दिशेने कळंबोली मार्गे ठाण्यात येणाऱ्या सहापेक्षा जास्त चाके असणाऱ्या वाहनांना (मल्टिएक्सेल व्हेइकल्स्ना) दहिसर मोरी येथपासून पुढे ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीबाहेर प्रवेश बंदी
  • मुंबईकडून घोडबंदर रोड मार्गे ठाण्यात येणाऱ्या अवजड वाहनांना ठाणे शहरात प्रवेश बंद
  • नाशिक मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीनवरून येणाऱ्या व वडपे-वंजारपट्टी मार्गे, राजनोली-शांतिनगर मार्गे तसेच मानकोली-अंजूरफाटा मागे भिवंडी शहर परिसरात प्रवेश करण्यासाठी येणाऱ्या अवजड वाहनांना भिवंडीत प्रवेश बंद
  • भिवंडी शहर परिसरातून सर्व प्रकारच्या अवजड वाहनांना अंजूरफाटा- काल्हेर-कशेळी मार्गे घोडबंदर रोडवर प्रवेश बंद
  • अजूरफाटा-मानकोली मार्गे राष्ट्रीय महामार्ग क्र. तीनवर अंजूरफाटा-भिवंडी शहरातील कल्याण नाका मार्गे राजनोली येथे तसेच अंजूरफाटा-वंजारपट्टी मार्गे वडपे येथील राष्ट्रीय महामार्ग तीनवर वाहतूक करण्यास मनाई.