25 September 2020

News Flash

अखेर ‘ठाणे क्लब’मधील लुटमारीला लगाम

सदस्यत्वासाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारून ठाणेकरांची लूट करणाऱ्या क्लब व्यवस्थापनाला महापालिका प्रशासनाने अखेर लगाम घातला.

| April 23, 2015 04:02 am

ठाणे महापालिकेच्या मालकीच्या, तरणतलावासह अद्ययावत सुविधांनी सज्ज अशा ‘ठाणे क्लब’च्या सदस्यत्वासाठी अवाच्या सव्वा शुल्क आकारून ठाणेकरांची लूट करणाऱ्या क्लब व्यवस्थापनाला महापालिका प्रशासनाने अखेर लगाम घातला. या क्लबच्या व्यवस्थापनाने ठाणे पालिकेला धाब्यावर बसवून ६० हजार रुपये एवढे तरणतलाव सदस्यत्व शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता. त्याविरोधात ‘लोकसत्ता’ने उठविलेल्या आवाजानंतर पालिकेने शुल्कात ५० हजार रूपयांची कपात केली आहे. आता केवळ दहा हजार रुपये शुल्क आकारावे असे आदेश पालिकेने दिले आहेत.
शहरातील तीन हात नाक्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेने उभारलेल्या या क्लबच्या ठेकेदाराने पालिकेचे सर्व नियम पायदळी तुडवत आपली तुंबडी भरण्याचे उद्योग चालविले होते. त्यासाठी या ठेकेदाराने पालिकेशी केलेला करार धाब्यावर बसवून क्लबचे वार्षिक सदस्यत्व शुल्क तब्बल पाच पटीने वाढविले होते. शहरातील एका बडय़ा राजकीय नेत्याचे आशीर्वाद आणि एका बडय़ा पोलीस अधिकाऱ्याशी असलेले संबंध या जोरावर चाललेली ही मनमानी ‘लोकसत्ता’ने चव्हाटय़ावर आणताच ठाण्यातील राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. त्यानंतर या प्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी पालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांना घेराव घातला होता. सर्वसामान्य ठाणेकरांच्या पैशातून उभ्या राहिलेल्या या क्लबच्या माध्यमातून काही नेते आपली तुंबडी भरण्याचा प्रयत्न करीत असल्याने हे प्रकरण केवळ एका क्लबपुरते मर्यादीत न राहता ते ठाण्यातील राजकीय अपसंस्कृतीचे एक उदाहरण बनले होते. मात्र नागरिकांच्या दबावामुळे अखेर पालिका प्रशासनाला संबंधित ठेकेदारावर कारवाई करावीच लागली. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण यांनी बुधवारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडे ठेकेदारांना बजावण्यात आलेल्या पत्राची प्रत सुपूर्द केली.  

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2015 4:02 am

Web Title: thane club issue
Next Stories
1 बदलापूर, अंबरनाथमध्ये टक्केवारीचे अर्धशतक
2 ठाण्यात दूधकोंडी सुरूच
3 ठाणे क्लब : काय होते प्रकरण?
Just Now!
X