ठाणे शहरातील जलतरणपटूंच्या स्वीकारलेल्या सदस्य शुल्काचा धनादेश ‘ठाणे क्लब’ व्यवस्थापनाने गेल्या आठवडय़ात रजिस्टर पोस्टाने परत पाठवून दिल्याने पालकांमध्ये पुन्हा एकदा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. ‘ठाणे क्लब’च्या शुल्कावरून वाद निर्माण झाल्यानंतर महापालिका प्रशासनाने हस्तक्षेप करत शुल्कनिश्चिती झाली नसल्याने दहा हजार रुपये इतके सदस्य शुल्क आकारावे, असे पत्र क्लब प्रशासनाला दिले आहे. या पत्राच्या आधारे ठाण्यातील ४२ स्पर्धात्मक जलतरण करणाऱ्या खेळाडू आणि हौशी जलतरणपटूंनी दहा हजारांचे शुल्कांचे धनादेश क्लबचे जुने व्यवस्थापक असलेल्या ‘द अ‍ॅक्वाटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर’ यांच्याकडे सुपूर्द केले होते.   
ठाणे क्लबच्या शुल्कवाढीविरोधात जलतरणपटू आणि पालकांनी घेतलेल्या आंदोलनाच्या पवित्र्यानंतर ठाणे महापालिकेने हस्तक्षेप करत प्रवेश शुल्क निश्चित होईपर्यंत १० हजार रुपये आणि कर अशी रक्कम आकारावी, अशी सूचना क्लब व्यवस्थापनाला केली होती. मात्र, महिनाभर क्लबकडून यावर कोणत्याही प्रकारची माहिती मिळत नव्हती. अखेर ४३ जलतरणपटूंनी पत्राची प्रत आणि प्रवेश शुल्काचे धनादेश या तरणतलावाचे जुने व्यवस्थापक ‘द अ‍ॅक्वाटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर’चे सॅव्ही नायर यांच्याकडे सुपूर्द केले होते. सदस्य शुल्क स्वीकारल्यामुळे ‘ठाणे क्लब’चा कारभार रुळावर आल्याची चर्चा होती. मात्र थोडय़ाच दिवसांमध्ये हे धनादेश रजिस्टर पोस्टाने परत सदस्यांना देण्यात आले. त्यामुळे या जलतरणपटूंमध्ये पुन्हा गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. या संदर्भात ‘द अ‍ॅक्वाटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर’चे सॅव्ही नायर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांचा भ्रमणध्वनी बंद होता.

न्यायालयालयाच्या निर्णयानंतर पुढील कार्यवाही
‘ठाणे क्लब’ व्यवस्थापक दीपक जैन यांच्याशी संपर्क केला असता क्लब सदस्य नोंदणी सुरू असली तरी जलतरणपटूंचे धनादेश आमच्याकडे आले नसून ते ज्यांच्याकडे दिले होते, त्यांच्याकडे याविषयी विचारणा करा. हे प्रकरण न्यायप्रविष्ट असून त्यावर येणाऱ्या निर्णयानंतर कार्यवाही केली जाईल, असे जैन यांनी सांगितले.   
सदस्यांशिवाय प्रवेश नाही?
प्रवेश शुल्क नाकारल्यानंतर ‘ठाणे क्लब’ व्यवस्थापन अधिक आक्रमक झाले असून जलतरणपटूंशिवाय अन्य हौशी जलतरणपटूंना प्रवेश नाकारण्यात आलेला आहे. यामध्ये काही ज्येष्ठ नागरिक जलतरणपटूंचा समावेश आहे. सदस्यांशिवाय कोणीही क्लब तरणतलाव परिसरात येऊ नये, अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत.