ठाणे जिल्हाधिकाऱ्यांचे सर्वच रुग्णालयांना आदेश

ठाणे : वर्तकनगर परिसरातील वेदांत रुग्णालयात झालेल्या रुग्णांच्या मृत्यूनंतर जिल्ह्यातील सर्वच खासगी आणि शासकीय रुग्णालयांनी करोना रुग्ण आणि नातेवाईकांचा व्हिडीओ कॉलद्वारे संवाद घडवा, असे आदेश जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी दिले आहेत. वेदांत रुग्णालय प्रशासनाने रुग्णांच्या नातेवाईकांना त्यांच्या प्रकृतीविषयी पुरेशी माहिती दिली नव्हती असे याप्रकरणी नेमण्यात आलेल्या चौकशीदरम्यान स्पष्ट झाले आहे. यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली. अशा घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने वरील आदेश दिले आहेत.

ठाणे जिल्ह्यात गेल्या वर्षी करोनाचा प्रादुर्भाव सुरू झाल्यानंतर महापालिकांनी करोना रुग्णालयांची उभारणी केली. याशिवाय, शहरातील अनेक खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालये म्हणूनही घोषित केले. येथील सामान्य कक्षामध्ये उपचार घेत असलेल्या आणि प्राणवायूची गरज नसलेले रुग्णांना स्वत:जवळ मोबाइल ठेवण्याची मुभा असते.

रुग्णांशी मोबाइल संपर्क साधून नातेवाईक त्यांच्या प्रकृतीची माहिती घेत असतात. असे असले तरी अतिदक्षता विभागात आणि प्राणवायूवर असलेल्या रुग्णांना मोबाइलद्वारे संपर्क साधून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेणे नातेवाईकांना शक्य होत नाही. त्यामुळे त्यांच्यावर काय उपचार सुरू आहेत आणि त्यांची प्रकृती कशी आहे, याविषयी नातेवाईक अनभिज्ञ असतात. त्यातच एखादा रुग्ण दगावला तर नातेवाईकांमधून संताप व्यक्त होतो आणि रुग्णालय परिसरात गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. अशीच परिस्थिती ठाण्यातील वेदांत रुग्णालयातील दुर्घटनेदरम्यान निर्माण झाल्याची बाब समोर आली आहे. त्यामुळे अशा परिस्थिती पुन्हा निर्माण होऊ नये यासाठी ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांनी जिल्ह्यातील सरकारी तसेच खासगी रुग्णालय प्रशासनांना महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यामध्ये अतिदक्षता विभागातील रुग्ण आणि त्यांचे नातेवाईक यांच्याशी व्हिडीओ कॉलद्वारे संवाद घडवून आणण्याचे आदेश दिले आहेत. तसेच व्हिडीओ कॉलद्वारे संवाद साधणे शक्य नसेल तर नातेवाईकांशी मोबाइलद्वारे सुसंवाद ठेवून त्यांना रुग्णाच्या प्रकृतीची माहिती द्यावी, असेही आदेश त्यांनी दिले आहेत.

अतिदक्षता विभागातील रुग्णाच्या प्रकृतीविषयी नातेवाईकांना माहिती मिळत नाही आणि यातूनच अनेकदा वादाचे प्रसंग निर्माण होतात. असे प्रकार टाळण्यासाठी ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्ण आणि नातेवाईकांमध्ये व्हिडीओ कॉलद्वारे सुसंवाद घडवून आणण्याचे किंवा रुग्णांच्या प्रकृतीविषयी नातेवाईकांना फोनवरून माहिती देण्याचे आदेश बैठकीत दिले होते. त्यानुसार जिल्ह्यातील सर्व महापालिकांना तशा प्रकारचे आदेश दिले आहेत. – राजेश नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी