शिक्षण ही एक निरंतर सुरू राहणारी प्रक्रिया आहे. वेगवेगळ्या विषयातील उपलब्ध माहितीचे अध्ययन करीत असतानाच विद्यार्थी चिकित्सक वृत्तीने संशोधन करून त्यात भर टाकण्याचा प्रयत्न करीत असतात. विशेषत: विज्ञान शाखेचे विद्यार्थी प्रचलित वैज्ञानिक संज्ञांचा व्यावहारिक जीवनातील उपयोग दाखवून देणारे प्रकल्प तयार करीत असतात. पुस्तकी ज्ञान प्रात्यक्षिकांद्वारे पडताळून पाहण्याचा तो एक प्रयत्न असतो. महाविद्यालयात होणाऱ्या रिसर्च स्कॉलर प्रोग्राम अंतर्गत विद्यार्थ्यांकडून वेगवेगळ्या विषयावर संशोधन केले जाते. सध्या बा. ना. बांदोडकर महाविद्यालयात विज्ञान शाखेतील वेगवेगळ्या विभागाचे विद्यार्थी जीवनोपयोगी संशोधन करीत आहेत. महाविद्यालयाचे विद्यार्थी करत असलेल्या संशोधनाची थोडक्यात ओळख..

भ्रमणध्वनीवरील सूक्ष्मजीवाणूंचे संशोधन

प्रतिनिधी, ठाणे</strong>

सध्या धकाधकीच्या जीवनात पोटाची भूक भागवण्यासाठी अनेकजण फास्टफूडकडे वळत असल्याने आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यातही तरुणांमध्ये फास्टफूडचा प्रभाव मोठय़ा प्रमाणात आहे. महाविद्यालयाच्या बाहेर असलेल्या लहान-मोठय़ा दुकानांमध्ये तरुण खाण्यासाठी गर्दी करतात. याच पाश्र्वभूमीवर चैताली पाटील या वनस्पतीशास्त्र विभागाच्या द्वितीय वर्षांच्या विद्यार्थिनीने ‘फंगल कंटामिनेशन ऑन मोबाइल फोन ऑफ फूड व्हेंडर इन विसिनिटी ऑफ बी.एन.बांदोडकर’ या विषयावर संशोधन सुरू केले आहे. खाद्य बनवताना भ्रमणध्वनी जवळ बाळगल्यास सर्वात जास्त सूक्ष्मजीव भ्रमणध्वनीवर जमा होतात, असा चैतालीच्या संशोधनाचा निष्कर्ष आहे. बांदोडकर महाविद्यालयाच्या बाहेर असणाऱ्या वेगवेगळ्या खाद्यदुकानात जाऊन चैतालीने या दुकानदारांच्या भ्रमणध्वनीवरील सूक्ष्मजीवांचे परीक्षण केले. यासाठी वीस खाद्यदुकानदारांच्या भ्रमणध्वनींची निवड चैतालीने केली. महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत सलायन वॉटर बनवून या पाण्यात कापसाचे बोळे बुडवले. हे कापसाचे गोळे दुकानदारांच्या भ्रमणध्वनीवर फिरवले असता अ‍ॅस्परजेलिससारखे आरोग्यास घातक असणारे सूक्ष्मजीव मोठय़ा प्रमाणात आढळले. हे सूक्ष्मजीव टेस्ट टय़ूबमध्ये बंदिस्त करण्यात आले. या सूक्ष्मजीवामुळे त्वचेचे आजार, पोटाचे विकार बळावतात. घरात वापरत असलेले भ्रमणध्वनी आणि खाद्यदुकानात वापरले जाणारे भ्रमणध्वनी या संदर्भात तुलनात्मक संशोधन चैताली करणार असून इंटरनॅशनल जर्नल्समध्ये शोधनिबंध पत्रिका सादर करणार आहे. जागतिक विज्ञान दिनाच्या दिवशी बा.ना.बांदोडकर महाविद्यालयाच्या इ-जर्नलवर चैतालीचा शोधनिबंध प्रकाशित करण्यात आला आहे. डॉ. मैथिली शहा आणि श्रद्धा गायकवाड या प्राध्यापकांनी चैतालीच्या संशोधनासाठी मार्गदर्शन केले आहे.

रक्तगटाद्वारे संभाव्य आजारांचे निदान

प्रतिनिधी, ठाणे

धकाधकीच्या जीवनात आरोग्याकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नेहमीच सर्वत्र होत असतो. अशा वेळी रुग्णांना रक्ताची गरज भासते आणि त्यासाठी आजकाल ठीकठिकाणी रक्तपेढय़ाही दिसून येतात. यासंदर्भात ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील दोन विद्यार्थी कोणत्या रक्तगटाला कोणता आजार होण्याची शक्यता अधिक असते, याविषयी एक शोधप्रकल्प तयार करीत आहेत.

अनिकेत केदारे आणि आशुतोष तिवारी हे विद्यार्थी हा शोध प्रकल्प तयार करीत असून डॉ. अभय मोरजकर त्यांना मदत करत असल्याची माहिती अनिकेतने दिली. हा प्रकल्प  २०१५ च्या ऑक्टोबरमध्ये सुरू झाला असून २०१६ अखेरीस संपणार आहे. यामध्ये ३ हजार ६०० जणांचे रक्त गट गोळा केले आहेत . हे रक्तगटांचे वर्गीकरण करण्यात आले आहे. व्यक्तीच्या रक्तगटामध्ये अ‍ॅन्टी जेन आणि अ‍ॅन्टी बॉडी नावाची संप्रेरक असतात.  या संप्रेरकांवरून व्यक्तीला कोणता रोग व्यक्तीला होईल, याचा अंदाज बांधता येतो. एकाच परिसरातील व्यक्तींमध्ये कोणते विषाणू आहेत, याचा अभ्यास करून त्या परिसरातील लोकांना कोणता आजार अधिक प्रमाणात होऊ शक तो, याचा शोध घेता येणे सहज शक्य होणार आहे. या शोधप्रकल्पामध्ये निष्कर्ष निघाल्यानंतर आरोग्य क्षेत्राला त्याचा खूप फायदा होणार आहे. शिवाय हे रोग होऊ नये म्हणून कशी काळजी घ्यायची या विषयीचे मार्गदर्शनही ते करणार असून त्याविषयी जगभरातील विविध विद्यापीठांत शोधपत्रिका सादर करणार आहेत.

पेन्सिलपासून कार्बन नॅनो मटेरिअल मिळविण्याचा प्रयत्न

प्रतिनिधी, ठाणे

सध्या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना निरनिराळ्या विषयात मूलभूत स्वरूपाचे संशोधन करण्याची संधी दिली जाते. त्या माध्यमातून विज्ञान, कला, वाणिज्य, व्यवस्थापनाचे विद्यार्थी विविध प्रयोग करीत असतात. जगातील सगळ्यात मोठे अंतराळ संशोधन केंद्र अशी ओळख असलेली ‘नासा’ ही संस्था पृथ्वी ते अंतराळपर्यंतचा प्रवास सहज पार करण्यासाठी कार्बन नॅनो टय़ूबचा वापर करून ‘स्पेस एलिव्हेटर’ (अंतराळ उद्वाहक) तयार करणार आहे. त्यासाठी सध्या संशोधन सुरू आहे. ठाण्यातील बांदोडकर महाविद्यालयातील बी.एस्सीच्या शेवटच्या वर्षांत शिकणाऱ्या विक्रांत यादव या विद्यार्थ्यांने सध्या पेन्सिलमधील कार्बनचा वापर करून अशा प्रकारच्या कार्बन नॅनो टय़ूब तयार करण्याचे संशोधन सुरू केले आहे.

विक्रांतने सध्या सर्व प्रकारच्या पेन्सिलचा शोध घेत आहे. शहरातील स्टेशनरीच्या दुकानांपासून ते इंटरनेटवर उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रकारच्या पेन्सिल त्याने जमविल्या आहेत. जमवलेल्या पेन्सिलच्या टोकांची पावडर तयार करून त्यावर वेगवेगळ्या रसायनांच्या साहाय्याने त्यामधील कार्बनची पडताळणी केली जाते. त्यामधील कार्बनच्या प्रमाणांचे निरीक्षण करून त्यापासून कार्बन नॅनो मटेरिअल तयार करण्याचा त्याचा प्रयत्न सुरू आहे. तयार झालेल्या या कार्बन मटेरियलपासून सर्वाधिक ताकद असलेले आणि वजनाने हलक्या वस्तू किंवा मटेरियल तयार होऊ शकते.

उदारणार्थ-विमान वजनाने अत्यंत जड असते, परंतु जर कार्बन नॅनो मटेरियलचा वापर केला तर ते विमान आतापेक्षा कितीतरी मजबूत आणि हलके होईल.

‘मॉडेल’च्या विद्यार्थ्यांचा स्वखर्चाने पाणीपुरवठा

प्रतिनिधी, डोंबिवली

सध्या सर्वत्र भीषण पाणीटंचाई आहे. काही भागात एक हंडा पाणी मिळविण्यासाठीही नागरिकांना अनेक ठिकाणी हेलपाटे मारावे लागत आहेत. दिवा शहरात तर पाण्याने लोकांना पुरते जेरीस आणले आहे. कपडे-भांडी धुण्यासाठी नागरिक तलावातील पाणी वापरतात तर पिण्याच्या पाण्यासाठी त्यांना टँकरच्या पाण्यावर अवलबूंन रहावे लागत आहे. अशा नागरिकांना आपल्या परीने एक दिवस का होईना परंतु मदत करावी अशी कल्पना मॉडेल महाविद्यालयाच्या यंगस्टर्स ग्रुपच्या मुलांना सुचली आणि त्यांनी दिवा शहराला एक दिवस पाणीपुरवठा करण्याचे ठरविले आहे.

यंगस्टर्स ग्रुपमध्ये एकूण १५ विद्यार्थी असून प्रत्येकाने शंभर-दोनशे रुपये स्वत:च्या पॉकीटमनीतून दिले आहेत. त्यातून त्यांच्याकडे दीड ते दोन हजार रुपये जमा झाले असून आणखी पैसे ते गोळा करीत आहेत. या पैशातून ते दिवा शहरासाठी दोन टँकर पाणीपुरवठा करणार आहेत. दिवा पश्चिमेतील रेन्बो शाळेत या पाण्याचे वाटप करण्यात येणार असल्याचे रवी पांडे या विद्यार्थ्यांने सांगितले. रवी म्हणाला, ग्रामीण भागात आठवडय़ातून एक दिवस पाणी येत आहे. त्यामुळे पाणी घरात नसेल तर काय परिस्थिती ओढवते, याचा अनुभव आम्ही आमच्याच घरातून घेत आहोत. त्यातूनच पाण्याची कमतरता असणाऱ्या नागरिकांना आपण मदत करावी अशी कल्पना आमचा मित्र प्रथमेश पालेकर याला सुचली. त्याला सर्वानी दुजोरा देत आम्ही पॉकीटमनीमधून पैसे गोळा केले आहेत. दिवा गावात पाण्याची टंचाई मोठय़ा प्रमाणात असल्याने तेथे एक दिवस तरी पाणी पुरवावे असे वाटले म्हणून आम्ही हा उपक्रम राबवत असल्याचेही त्याने सांगितले. सागर विरा, निष्मिता पुजारी, शिखा पांडे, दीपिका पांडे, अजित यादव, श्वेता, हर्षिता, कल्याणी देशपांडे आदी सर्व विद्यार्थ्यांचा या ग्रुपमध्ये समावेश आहे.

सीएचएम महाविद्यालयात रोजगार मेळावा

नवोदितांपासून अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वाना नोकरीची संधी

प्रतिनिधी, अंबरनाथ

नुकत्याच सर्व विषयांच्या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या परीक्षा आटोपल्याने जवळपास सर्वच विद्यार्थी नोकरीच्या शोधात आहेत. अशा विद्यार्थ्यांसाठी उल्हासनगरच्या सीएचएम महाविद्यालयात एक रोजगार मेळावा आयोजित करण्यात आला आहे. एच अ‍ॅण्ड जीएचएम महाविद्यालय मुंबई, यांच्या वतीने सीएचएम महाविद्यालयात  बुधवारी २५ मे रोजी ८ ते ३ या वेळेत इच्छुक विद्यार्थ्यांच्या मुलाखती मेळाव्यात घेण्यात येतील, असे आयोजकांनी सांगितले आहे.

या मेळाव्यात व्यापार, कॉमर्स, बँक, मार्केटिंग, व्यवस्थापन, इंटरनेट आणि वैद्यकीय क्षेत्रासह विविध क्षेत्रांतील अग्रगण्य कंपन्या सहभागी होणार आहेत. एकाच छताखाली अनेक नामवंत कंपन्या मेळाव्यात येणार असल्याने विद्यार्थ्यांना नोकरीच्या अनेक संधी एकाच वेळी मिळणार आहेत. यावेळी नवोदितांपासून ते अनुभवी उमेदवारांपर्यंत सर्वाना नोकरीची संधी मिळणार आहे.  वयोमर्यादा २९ असून कोणत्याही शाखेतील पदवीधर, पदव्युत्तर पदवी आणि पदविकाधारक मेळाव्यात सहभागी होऊ शकतील. या रोजगार मेळाव्याला विद्यार्थ्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहून संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.