News Flash

कॉलेजच्या कट्टय़ावर : अनुभव आणि अर्थार्जनाची संधी

ठाणे परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी यंदा त्यांची सुट्टी अशाच प्रकारे सार्थकी लावली..

दोन इयत्तांमध्ये येणारी सुमारे दोन महिन्यांची उन्हाळी सुट्टी अशीच वाया घालविण्याऐवजी अनेक जण वेगवेगळे उपक्रम राबवितात. काही जण नव्या आवडीच्या गोष्टी शिकतात. अभ्यासास पूरक असणाऱ्या गोष्टींचे प्रशिक्षण घेतात. अनुभवासाठी अथवा कुटुंबाला हातभार लागावा या हेतूने अर्धवेळ नोकरीही करतात. ठाणे परिसरातील अनेक तरुण-तरुणींनी यंदा त्यांची सुट्टी अशाच प्रकारे सार्थकी लावली..

अनुभव आणि अर्थार्जनाची संधी

पाणी, ओरिगामी आणि वाचन संस्कार

कसारा आणि खर्डी गावांदरम्यान असलेला धेंगणमाळ पाडा. पाण्यासाठी गावातील महिलांना मैलोन्मैल करावी लागणारी पायपीट, विहिरीच्या पाण्याने तळ गाठलेला, पंचायत समितीचा टँकर असला तरी गावासाठी ते पाणी अतिशय अपुरे ठरते. पाण्यासाठी या आदिवासी पाडय़ावरील लोकांना कायम अशा प्रकारे संघर्ष करावा लागतो. के. एम अग्रवाल महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी त्यांचा हा संघर्ष पाहिला होता. त्यामुळेच यंदा महाविद्यालयातील ‘स्नेहबंध’ या माजी

विद्यार्थ्यांच्या संघटनेने या पाडय़ावरची समस्या दूर करण्याचे ठरवले.

सुट्टीच्या महिन्यात इतरत्र न जाता महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थ्यांनी धेंगळमाळ आदिवासी पाडा गाठला. काही माजी विद्यार्थ्यांसोबत सध्या महाविद्यालयात शिक्षण घेत असलेले विद्यार्थीही या उपक्रमात सहभागी झाले. या विद्यार्थ्यांनी एकत्रितरीत्या पाडय़ावर पाच हजार लिटरची टाकी उपलब्ध करून दिली. पाडय़ावर आधीपासून असलेल्या बोअरवेलला ही पाण्याची टाकी जोडल्याने पाण्याचा साठा होऊ लागला. याशिवाय सुट्टीच्या दिवसात पाडय़ावरील मुलांना या विद्यार्थ्यांनी ओरिगामीचे प्रशिक्षण दिले. तसेच महाविद्यालयातील ‘डिपार्टमेंट ऑफ लाइफ लाँग लर्निग एक्स्टेंशन’द्वारे विद्यार्थ्यांनी आधारवाडी कारागृहाजवळील कातकरी वस्तीमध्ये धान्यवाटप केले. सुट्टीमध्ये या वस्तीतील मुलांसाठी विद्यार्थ्यांनी ग्रंथालयाचा उपक्रम सुरू केला होता.

फ्रेंच शिकविणे मला आवडू लागले

सुट्टी पडल्यानंतर चार-पाच दिवस छान वाटते, पण त्यानंतर मात्र घरात बसूनही कंटाळा यायला लागतो. तसेच करिअरचा विचार करता असाच वेळ वाया घालविणेही चुकीचे असते. या काळात अभ्यासक्रमास पूरक ठरेल, असे एखादे काम करणे फलदायी ठरते. डोंबिवली येथे राहणाऱ्या ऋ तुजा जोशी हिने या वेळी ठाणे येथील ‘अ‍ॅक्मी एज्युकेशन’ या संस्थेमध्ये विद्यार्थ्यांना फ्रेंच शिकविले. या वेळी तिने द आर्ट वर्कशॉप हा लहान मुलांचा वर्कशॉप घेतला. या वर्कशॉपमध्ये तिने लहान मुलांना नृत्याचे धडे दिले.

आपल्यापेक्षा लहान मुलांना आपण नेहमीच काही तरी शिकवीत असतो. मात्र समवयस्क तसेच आपल्यापेक्षा मोठय़ा माणसांना मी फ्रेंचचे धडे दिले. माझ्यासाठी ही खुप महत्त्वाची गोष्ट होती. १ जून हा माझ्या कामाचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे दिवसभर हुरहुर वाटत होती. आता या या फ्रेंच क्लासची मला वर्षभर खूप आठवण येत राहील. मी केसी महाविद्यालयात शिकत असून यावर्षी टी.वाय.ला गेले आहे. परंतु यानंतरही फ्रेंच शिकणे आणि शिकविण्याचे धडे मी घेत राहीन.

– ऋतुजा जोशी, डोंबिवली.

अर्धवेळ नोकरी आणि प्रशिक्षण

सर्वसाधारणपणे एखादी उत्तम नोकरी मिळविण्यासाठी किंवा व्यवसाय सुरूकरण्यासाठी योग्य शिक्षण घ्यावे लागते. त्यासाठी मुले-मुली महाविद्यालयात प्रवेश घेतात. मात्र महाविद्यालयामध्ये शिकत असताना अभ्यासाबरोबर मज्जा, मस्ती, दंगाही सुरूच असतो. हल्ली स्पर्धेच्या युगाचा विचार करता आपल्याला सर्वाच्या एक पाऊल पुढे असणे गरजेचे आहे. त्यासाठी सुट्टीच्या काळात आपल्याला ज्या क्षेत्रात करिअर कारायचे आहे, त्या क्षेत्राशी निगडित एखाद्या संस्थेमध्ये आपण सरावासाठी का होईना काम करणे आवश्यक आहे. आपल्याला एखादा उद्योग सुरूकरायचा असल्यास त्या संदर्भात माहिती मिळवणे व भविष्यात व्यवसाय सुरू  करण्यासाठी लागणाऱ्या गोष्टींचा अभ्यास करण्यासाठी सुट्टीचा काळ हा योग्य आहे. मला सुरक्षा दलात काम करण्याची इच्छा आहे. त्यासाठी सुट्टीमध्ये मी प्रशिक्षण घेत आहे. तसेच आई-बाबांना मदत करण्यासाठी मी एका कंपनीमध्ये अर्धवेळ कामही करते. सुट्टी म्हणजे स्वत:साठी काही तरी करण्याची मिळालेली एक उत्तम संधी असते. त्याचा योग्य तो वापर आपण करणे गरजेचे आहे. या काळात केलेले काम किंवा अभ्यास हा नक्कीच आपल्या पुढच्या वाटचालीसाठी उपयोगी पडतो.

– प्रिया उत्तेकर, के. बी. कॉलेज, कोपरी.

गुरूंनी दिलेली विद्या शिष्याला देणे यासारखा दुसरा आनंद नाही

कला हा जीवनाचा अविभाज्य भाग आहे. त्यामुळे या सुट्टीत नृत्यधारा कथ्थक शिबिराचे आयोजन केले होते. या शिबिरात आमच्या गुरू मुक्ता जोशी यांच्याबरोबर मला लहानग्यांना शिकविण्याची संधी मिळाली. तसेच असा अनुभव घेणे खूप गरजेचे आहे. याचा उपयोग करिअरच्या पुढच्या पायरीवर नक्कीच होतो. मी रुईया महाविद्यालयाची विद्यार्थिनी असून आमच्या महाविद्यालयात सतत काही तरी सांस्कृतिक कार्यक्रम सुरू असतात. त्यामुळे याचा खूप फायदा होतो. कल्याण येथे मी नृत्याचे क्लास घेत आहे. माझ्या गुरूंनी दिलेली विद्या मी माझ्या शिष्याला देते, याच्यासारखा दुसरा आनंद नाही.

– दीपाली पदे, कल्याण.

युथ एक्स्चेंज प्रोग्रामसाठी भारतातर्फे निवड

युथ एक्स्चेंज प्रोग्राम कॅम्पसाठी भारतातर्फे बांदोडकर महाविद्यालयातील छात्र सेनेच्या कुणाल संघवीची निवड करण्यात आली आहे. भारताचे प्रतिनिधित्व करण्यासाठी १६ मे रोजी कुणाल कझाकिस्तान येथे रवाना झाला आहे. एनसीसीच्या महाराष्ट्र डायरेक्टोरेट येथून निवडला गेलेला कुणाल हा एकमेव विद्यार्थी आहे. संपूर्ण भारतातून १२ कॅडेटची निवड युथ एक्स्चेंज प्रोग्राम कॅम्पसाठी करण्यात येते. दिल्लीला प्रजासत्ताक दिनाच्या परेडमधून सुरूहोत असलेल्या या निवड प्रक्रियेत कुणालची प्रथम आरडीसी, प्राइम मिनिस्टर आणि रॉलसाठी निवड झाली. लेखी परीक्षा, गट चर्चा, स्कॉड हॅण्डलिंग, ड्रील आणि मुलाखत अशा चाचण्यांमधून उत्तीर्ण होत कुणालचा बारा जणांच्या कॅडेटमध्ये समावेश झाला आहे. कझाकिस्तानमध्ये कुणाल ‘अचिव्हमेंट ऑफ इंडिया’ या विषयावर सादरीकरण करणार आहे. प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी प्रभात फेरीमध्ये कुणालने फ्लॅग एरिया ब्रीफर म्हणून महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व केले होते.

भारतीय भूदलात देशाची सेवा करण्याचा

कुणालची इच्छा आहे. युथ एक्स्चेंज प्रोग्राममध्ये ठाण्याचे प्रतिनिधित्व करणारा कुणाल पहिलाच कॅडेट आहे. कुणाल महाविद्यालयाचे आणि महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणार असल्याने बांदोडकर महाविद्यालयाचे प्राचार्य, उपप्राचार्यानी कौतुक व्यक्त केले आहे.

बांदोडकर महाविद्यालयात जैवतंत्रज्ञानातील अनोखी संधी

महाविद्यालयात असणाऱ्या मूलभूत सोईसुविधांसोबत विद्यार्थ्यांच्या जिज्ञासू वृत्तीला बळकटी देणारे उपक्रम महाविद्यालयातर्फे राबविणे आवश्यक असते. बा. ना.  बांदोडकर महाविद्यालयातील जैवतंत्रज्ञान आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभाग विद्यार्थ्यांना संशोधनासाठी पोषक ठरतो. संशोधनासोबतच विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त संशोधनपूरक व्यवस्था या विभागात आहे. या विभागाच्या दोन प्रयोगशाळा असून इनक्यूबेटर, ऑटोक्लेव, लॉट एव्हर ऑव्हन, सेंटीफ्यूज, शेकर, मायक्रोफ्यूज, पीएच मीटर, कॅलरी मीटर, लॅमिनार एअर फ्लो अशा संशोधनपूरक यंत्रसामग्रीबरोबरच दोन स्वतंत्र वाचनालये, संगणक विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहे.

महाविद्यालयाचे विद्यार्थी विद्यापीठ अभ्यासक्रमाबरोबरच विविध संशोधन प्रकल्पांवर काम करून विभागातर्फे अनेक वैज्ञानिक स्पर्धा, कॉन्फरन्समध्ये स्थानिक, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण करून नामांकने प्राप्त करत आहेत. अनिकेत बागूल, आदित्य छत्रे, जुडीय तळकर, एलिझाबेथ तळकर, विनया थोरात, अंकित राज या विद्यार्थ्यांनी महाविद्यालयातील मार्गदर्शक शिक्षकांबरोबरचे रिसर्च पेपर आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक जर्नल्समध्ये प्रकाशित केले आहेत. विद्यार्थ्यांमधील सादरीकरण कौशल्य वाढवण्यासाठी नियमित जर्नल व मूव्ही क्लबचे आयोजन केले जाते. या माध्यमातून शिक्षक आणि विद्यार्थ्यांपुढे संशोधन अभ्यासपूर्ण पद्धतीने सादर केले जाते. कीयॉस्कच्या माध्यमातून विज्ञानावर आधारित खेळ, नाटके यांसारखे नावीन्यपूर्ण कार्यक्रम सादर केले जातात. लॅब अ‍ॅडमिनिस्ट्रेशन आणि मॅनेजमेंट, मॉलिक्यूलर बायोलोजिकल टेक्निक्स या कार्यशाळांना इतर महाविद्यालयांच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2016 1:44 am

Web Title: thane college event 3
Next Stories
1 खेळ मैदान : संतोष अकादमीला विजेतेपद
2 सृजनाची फॅक्टरी : विज्ञानाचा अभ्यास आणि नृत्याचा ध्यास..
3 नामवंतांचे बुकशेल्फ : पुस्तकांशी जोडले नाते
Just Now!
X