प्रशांत घोडविंदे (युवा वार्ताहर)

‘जागतिक पर्यावरण दिना’निमित्त जीवनदीप शिक्षण संस्थेच्या गोवेली महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागातील विद्यार्थ्यांनी शहापूर तालुक्यातील आसनगावजवळ असलेल्या माहुली किल्ल्यावर जाऊन स्वच्छता केली. ठाणे जिल्ह्य़ातील सर्वात उंच ठिकाणावर असलेला माहुली हा ऐतिहासिक किल्ला असून तरुणांना ट्रेकिंगसाठी आकर्षित करतो. विविध भागांतून नागरिक पर्यटनासाठी माहुली किल्ल्यावर गर्दी करतात. मात्र पर्यटनासाठी येणारे नागरिक आपल्याबरोबर आणलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या, पिशव्या, खाऊची पाकिटे आणि इतर वस्तू किल्ल्यावरच टाकून जातात. पर्यटकांच्या या कृत्यामुळे किल्ला आणि आजूबाजूचा परिसर प्रदूषित होतो.

गोवेली महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत माहुली किल्ला व त्याच्या सहभोवतालच्या परिसरातील कचरा गोळा करून परिसर स्वच्छ केला. माहुली किल्ल्याच्या भोवतालचे जंगल संरक्षित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले आहे. मात्र या जंगलात ओल्या पाटर्य़ा करणारे नागरिक दारूच्या बाटल्या, पिशव्या आणि इतर वस्तू जंगलस्थळी टाकून परिसर प्रदूषित करतात. या प्रदूषणामुळे तेथील वन्यजीवांच्या आरोग्यास धोका निर्माण होत आहे. शहापूर तालुक्यात पाणीटंचाईची समस्या आहे. मात्र माहुली किल्यावर आजही थंड पाण्याने भरलेला कुंड आहे. या पाण्याच्या कुंडाचे योग्य नियोजन व संवर्धन करण्याची गरज आहे.

किल्ला स्वच्छतेसोबत विद्यार्थ्यांनी रायते येथील उल्हास नदीपात्राची स्वच्छता केली. उल्हास नदीच्या पात्रात वाढलेल्या जलपर्णी वनस्पतीमुळे नदीचे पात्र प्रदूषित होत असल्यामुळे विद्यार्थ्यांनी नदी पात्रातील जलपर्णी वनस्पती काढल्या. महाविद्यालयातील प्राध्यापक आणि इतर कर्मचाऱ्यांनी महाविद्यालयाच्या परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धन व संरक्षणाचा संकल्प केला. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा विभागातील विद्यार्थ्यांनी प्रा. भाग्यश्री पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम यशस्वी केला.

ग्रीन बत्ती उपक्रमाच्या साहाय्याने गरजू विद्यार्थ्यांना शिक्षण

जतीन तावडे (युवा वार्ताहर)

ठाण्यातील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयाने विद्यार्थ्यांना अर्थ व वित्तव्यवस्थेच्या पुस्तकी ज्ञानाबरोबर प्रात्यक्षिक ज्ञान पुरविण्यासाठी रोटरी क्लब ऑफ ठाणे मिडटाऊनच्या मदतीने प्रोजेक्ट ग्रीन बत्ती हाती घेतल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रा. संतोष गावडे यांनी दिली. ग्रीन बत्ती प्रोजेक्टअंतर्गत महाविद्यालयातील आर्थिकदृष्टय़ा अविकसित/मागासलेल्या अशा १५० विद्यार्थ्यांची निवड केली जाणार आहे. या विद्यार्थ्यांना संभाषण, मुलाखत व समूह चर्चा याद्वारे अर्थ, गणित व मार्केट जवळून शिकवण्यात येणार असून प्रत्येकी एका विद्यार्थ्यांला एक तज्ज्ञ अशा प्रकारे अर्थ व वित्त क्षेत्रातील १५० तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहेत. ऑगस्ट ते फेब्रुवारी अशा ७ महिन्यांच्या कालावधीत हा प्रकल्प राबविण्यात येणार असून त्यामध्ये दर आठवडय़ाला शिक्षक सार्वजनिकरीत्या विद्यार्थ्यांशी अर्थ व वित्तविषयक संवाद साधणार आहेत. दर आठवडय़ाला मार्केटमध्ये काय बदल झाले व सध्या मार्केटचे दर काय आहेत अशा मार्केटसंबंधीच्या विविध गोष्टी समजावून सांगणार आहेत. याबरोबरच दर महिन्याला या सगळ्या विद्यार्थ्यांची तज्ज्ञांसोबत एक समूह चर्चा होईल ज्यामुळे विविध तज्ज्ञांचे विचार प्रत्येक विद्यार्थ्यांला कळण्यास मदत होणार आहे. सहा महिन्यांचा हा प्रकल्प पूर्ण झाल्यावर या सगळ्या विद्यार्थ्यांना प्रशस्तिपत्रक देऊन गौरवण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे विद्यार्थ्यांना विविध क्षेत्रांतील नामवंतांचे मार्गदर्शन मिळणार असून दररोजच्या अभ्यासात व जीवनातही या प्रकल्पामुळे खूप फायदा होणार आहे.

‘आरएफआयडी’ कार्डची विद्यार्थ्यांवर करडी नजर

जतीन तावडे (युवा वार्ताहर)

केळकर एजुकेशन ट्रस्टच्या विनायक गणेश वझे महाविद्यालयात विद्यार्थी आणि शिक्षकांच्या उपस्थितीसंदर्भात चोख, परिपूर्ण माहिती मिळवण्यासाठी, विद्यार्थ्यांची महाविद्यालयातील संपूर्ण माहिती झटकन मिळवण्यासाठी ‘आरएफआयडी’ कार्डची सोय करण्यात येणार आहे. सर्व शाखांच्या प्रथम वर्षांतील विद्यार्थ्यांना, सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आर.एफ.आय.डी. कार्ड म्हणजेच रेडिओ फ्रीक्वेन्सी ओळखपत्र देऊ  करण्यात येणार आहे, अशी माहिती महाविद्यालयाच्या उपप्राचार्या डॉ. शुभांगी भावे यांनी दिली. भारतात सुरू असलेल्या डिजिटल इंडिया धोरणांतर्गत मुंबई-ठाण्यातील महाविद्यालये दैनंदिन कारभारात विविध प्रकारे तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसून येत आहे. रेडिओ फ्रीक्वेन्सी आणि त्याच्यासोबत मिळणाऱ्या मोफत मोबाइल अ‍ॅपच्या माध्यमातून वझे महाविद्यालयाने डिजिटल महाविद्यालयाच्या दिशेने आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. आर.एफ.आय.डी. कार्ड ही एक स्वतंत्र सेवा आहे. या कार्डमध्ये एक चिप बसवलेली असते. या चिपमध्ये शिक्षक व विद्यार्थ्यांबद्दलची सगळी इत्थंभूत माहिती भरली जाते. कार्ड रीडरच्या माध्यमातून दर तासाला शिक्षकाने कार्ड रीडरवर आपले ओळखपत्र स्कॅन करून त्यात शिकवत असलेल्या विषयाचे नाव व तारीख टाकून ते प्रत्येक विद्यार्थ्यांकडे त्याचे कार्ड  स्कॅन करण्यासाठी देण्यात येते. अशा प्रकारे अवघ्या तीन ते चार मिनिटांमध्ये संपूर्ण वर्गाची उपस्थिती घेतली जाते.

ओळखपत्राच्या साहाय्याने हजेरी

आर.एफ.आय.डी. कार्डबरोबर मिळणाऱ्या मोबाइल अ‍ॅपमुळे विद्यार्थी आणि पालकांना मोबाइलवर गैरहजेरीची माहिती, विद्यार्थी अनुपस्थित असल्याचे नोटिफिकेशन, तासिका रद्द झाल्याचे नोटिफिकेशन, महाविद्यालयाच्या सगळ्या सूचना आणि सोबत प्राध्यापकांचा अहवालसुद्धा उपलब्ध होणार आहे. या मोबाइल अ‍ॅपवर महाविद्यालयाला विद्यार्थ्यांकडून शिक्षक, कार्यालय, कॅन्टीन, जिमखाना, प्रयोगशाळासंबंधीचा आढावा घेणेही शक्य होणार आहे.

‘गबाळय़ा’ गणवेशाला कॉपरेरेट लुक

अतिपरिचयात अवज्ञा असते. शाळेतील गणवेशाविषयी विद्यार्थ्यांच्या मनात काहीशी अशीच भावना असते. इयत्तेनुसार अभ्यास, वहय़ा-पुस्तके, शिक्षक बदलतात. गणवेश मात्र तसाच राहतो. त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांना गणवेश म्हणजे त्यांच्या स्वातंत्र्याची गळचेपी वाटत असते. काहींना तर त्याविषयी तिरस्कार वाटतो. शाळेत असतानाही ते गणवेश न घालण्याची कारणे शोधत असतात. त्यामुळे कधी एकदा दहावी होते आणि कॉलेजमध्ये जाऊन गणवेशापासून सुटका होते, असे मुलांना वाटत असते. मात्र आपल्याकडे जागतिकीकरणानंतर अवतरलेल्या कॉर्पोरेट युगात गणवेश हा स्टेट्स सिम्बॉल होऊ लागला आहे.

मोठमोठय़ा कंपन्यांमधील विविध पदांवरील कर्मचारी एकसारख्या वेशात दिसू लागले आहेत. गणवेश ही त्यांची ओळख असते. हल्ली महाविद्यालयीन विश्वातही व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम शिकत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी गणवेश सक्तीचा केलेला आहे. काही विद्यार्थ्यांमध्ये या गणवेश सक्तीबद्दल नाराजी व्यक्त केली जाते, तर काही विद्यार्थ्यांना या गणवेशाचे आकर्षण असते. अर्थात व्यवस्थापन क्षेत्राशी निगडित अभ्यासक्रम असल्यामुळे या गणवेशाचे जुने, गबाळे स्वरूप बदलून त्यात काळानुरूप टापटीपपणा आला आहे. त्यामुळे विद्यार्थी गणवेश आवडीने घालू लागले आहेत. पांढरा शर्ट, काळी किंवा गडद निळी पँट, त्यावर कोट आणि टाय अशा प्रकारचा कॉर्पोरेट लुक देणारा गणवेश घालून विद्यार्थी महाविद्यालयात रुबाबात वावरताना दिसतात. बीएमएम, बीएमएस, अकाऊंटिंग अँड फायनान्स, एमबीए, कायदा अशा अभ्यासक्रमांत प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना किमान आठवडय़ातून दोन दिवस हा गणवेश परिधान करण्याची सक्ती काही महाविद्यालयांत केली आहे. महाविद्यालयातील शिस्त हा या गणवेश सक्तीमागचा उद्देश असला तरी अलीकडे विद्यार्थी फॅशन म्हणून हा गणवेश आवडीने परिधान करतात. व्यवस्थापन क्षेत्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना विविध चर्चासत्रे, मुलाखती, प्रकल्पात सहभागी व्हावे लागते. या उपक्रमात विद्यार्थी अशा गणवेशात सहभागी झाल्याने महाविद्यालयाचे प्रतिनिधित्व करताना शिस्तीचे पालन होते.

महाविद्यालयीन गणवेशात काळानुरूप बदल केल्याने छान वाटते. आत्मविश्वास वाढतो. महाविद्यालयात असतानाच प्रोफेशनल राहणीमानाची सवय होते. त्यामुळे आवडीने हा गणवेश परिधान करते, असे जोशी बेडेकर महाविद्यालयात पत्रकारितेचे शिक्षण घेणाऱ्या हर्षदा सिनकर हिने सांगितले.