News Flash

कॉलेजच्या कट्टय़ावर : युथ फेस्टिवलच्या तयारीची लगबग

नृत्य, अभिनय, गायन, फाईन आर्ट, वक्तृत्व अशा विविध स्पर्धाचे आयोजन युथ महोत्सवात होत असते.

 

सभा, कार्यशाळेच्या आयोजनात विद्यार्थी व्यग्र

जुलै महिना सुरू झाल्यावर विद्यार्थ्यांना वेध लागतात ते मुंबई विद्यापीठाच्या युथ महोत्सवाचे. मुंबई विद्यापीठातर्फे घेतल्या जाणाऱ्या  या स्पर्धेत अव्वल ठरण्यासाठी विविध महाविद्यालयात चुरस असते. सध्या महाविद्यालयामध्ये युथ महोत्सवाच्या तयारीची लगबग पाहायला मिळत आहे. कोणत्या स्पर्धामध्ये सहभागी व्हायचे, विद्यार्थ्यांना स्पर्धाविषयी माहिती देणे, महाविद्यालयात नव्याने प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांना युथ महोत्सवाची ओळख करून देणे, सरावाच्या वेळा ठरवणे, प्रशिक्षक ठरवणे अशा तयारीत महाविद्यालयाचा प्राध्यापक आणि विद्यार्थी वर्ग दिसत आहे.

नृत्य, अभिनय, गायन, फाईन आर्ट, वक्तृत्व अशा विविध स्पर्धाचे आयोजन युथ महोत्सवात होत असते. यावेळी युथ महोत्सवाचे हे ४९ वे वर्ष आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा महाविद्यालयात चुरशीची स्पर्धा पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील महाविद्यालय देखील या स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. ठाण्यातील जोशी बेडेकर महाविद्यालय युथ महोत्सवात सलग चार वर्षे विभागीय पदक जिंकत आहे. तसेच सीएचएम महाविद्यालय, बिर्ला महाविद्यालय, एन.के.टी महाविद्यालय, ज्ञानसाधना महाविद्यालयात युथ महोत्सवात सहभागी होण्यासाठी विद्यार्थी आणि प्राध्यापकांच्या सभा आयोजित करण्यात येत आहेत. महाविद्यालयात युथफुल असे वातावरण आहे. महोत्सवाच्या दरम्यान विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होणार नाही याकडे सुद्धा प्राध्यापकांचे लक्ष असते. सहभागी विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली जाते. संबंधित विषयातील तज्ज्ञ व्यक्तींकडून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले जाते, जोशी बेडेकर महाविद्यालयाचे मागील वर्षीचे संयोजक शिवाजी नाईक यांनी सांगितले. यावर्षी जोशी बेडेकर महाविद्यालयाच्या युथ महोत्सवाची जबाबदारी प्रा. अर्चना प्रभुदेसाई यांच्याकडे आहे. नवीन विद्यार्थी माजी विद्यार्थ्यांकडून मार्गदर्शन घेताना दिसत आहेत.

क्रीडा विभागात जीवनदीपची चमक

कल्याण: मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा विभागात सातत्याने यश मिळविणाऱ्या जीवनदीप शिक्षण संस्थेच्या गोवेली महाविद्यालयाने २०१५-१६ या शैक्षणिक वर्षांत मुंबई विद्यापीठात १३वा क्रमांक पटकावला आहे. मुंबई विद्यापीठातील ७८५ महाविद्यालयातून गोवेली महाविद्यालयाने  हा क्रमांक पटकावला आहे तर ठाणे जिल्ह्य़ात गोवेली महाविद्यालयाने दुसरा क्रमांक पटकावला आहे. क्रीडा प्रशिक्षक सुरेश चेडे यांच्या मार्गदर्शनाखाली वर्षभरात महाविद्यालयाने सात सुवर्ण, चार रौप्य आणि चार कांस्य पदक पटकावले आहेत. तसेच आंतरविद्यापीठ स्पर्धेत महाविद्यालयाचे खेळाडू सहभागी झाले होते. मुंबई विद्यापीठाच्या आंतरमहाविद्यालयीन स्पर्धेमध्ये महाविद्यालयाने ११५ पदके प्राप्त केली  आहेत. प्रशासकीय, पोलीस, रेल्वे अशा विविध क्षेत्रात महाविद्यालयाच्या विद्यार्थी खेळाडूंना नोकरी लागली आहे. सुषमा पाटील ही खेळाडू महाराष्ट्र शासनात राजपत्रीत अधिकारी आहे.

अमृतच्या अनुषंगाने ज्येष्ठांवर चर्चा

जोशी बेडेकर महाविद्यालयात जनरेशन डायलॉग आणि फिल्म सोसायटीच्या वतीने चित्रपटविषयक परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते.  या उपक्रमात विद्यार्थ्यांना राजेश खन्ना अभिनित ‘अमृत’ हा चित्रपट दाखवण्यात आला व त्यानंतर चित्रपटाच्या अनुषंगाने ज्येष्ठ नागरिकांच्या समस्यांवर चर्चादेखील घडवून आणण्यात आली.

महाविद्यालयातील जनरेशन डायलॉग या विभागाच्या वतीने विद्यार्थ्यांना जुन्या आशयघन चित्रपटाची ओळख करून देण्यात येते. तांत्रिकदृष्टय़ा वेगळेपण असणारे, सामाजिक विषय हाताळलेले अनेक जुने चित्रपट विद्यार्थ्यांना या विभागातर्फे दाखवण्यात येतात. जुन्या आणि नव्या पिढीतील चित्रपट पाहण्याची मानसिकता यांचा अभ्यास या उपक्रमाच्या माध्यमातून होत असतो. यावेळी विद्यार्थ्यांना १९८६ च्या दरम्यान प्रदर्शित झालेला ‘अमृत’ हा चित्रपट दाखवण्यात आला. या चित्रपटात ज्येष्ठ नागरिकांची व्यथा मांडलेली आहे. एकीकडे जगातील सर्वात तरुण असणाऱ्या देशात तेवढेच ज्येष्ठ नागरिकही आहेत. अलीकडे मुले आई-वडिलांकडे लक्ष द्यायला वेळ नसल्यामुळे त्यांची रवानगी वृद्धाश्रमात करतात. त्यामुळे ज्येष्ठ नागरिकांची समस्या हा मुद्दा अतिशय गंभीर होत चालला आहे. चित्रपट संपल्यावर त्यावर विविध अंगाने चर्चा झाली. त्यात विद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. या कार्यक्रमास प्रा. मुग्धा केसकर, प्रा.अनिल ढवळे, फिल्म सोसायटीचे अध्यक्ष महेश पाटील यावेळी उपस्थित होते.

वेळ आणि शिस्त पाळणे आवश्यक

बा.ना. बांदोडकर विज्ञान महाविद्यालयात राबविण्यात येत असलेल्या जागर जाणिवांच्या उपक्रमाची सुरुवात यंदा महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. माधुरी पेजावर यांच्या व्याख्यानाने झाली.  डॉ. माधुरी पेजावर यांना ऑस्ट्रेलिया विद्यापीठाची शिष्यवृत्ती मिळाली होती. त्यासाठी त्या चार महिने ऑस्ट्रेलियात होत्या. तेथील विद्यापीठातील विद्यार्थी आणि व्यावसायिक संधी, भारतीय विद्यार्थी आणि त्यांची मानसिकता अशा तुलनात्मक अभ्यासाने काही निष्कर्ष प्रत आलेल्या डॉ .पेजावर यांनी विद्यार्थ्यांना उदाहरणे देत अंतर्मुख केले. लहान उद्दिष्टांपासून मोठय़ा उद्दिष्टापर्यंत पोहचणे, हे यशस्वी जीवनाचे गमक आहे. भारतात फक्त लोकांनी वेळ पाळली तरी उद्याचा भारत वेगळा दिसेल. एका भारतीयाने कचरा कुठेही टाकणार नाही किंवा फक्त महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी याची सुरुवात केली तर पाच वर्षांंनी देशाचे चित्र फारच वेगळे दिसेल. ही शिस्त आपण स्वत:हून लावून घ्यायला हवी तसेच एकदा  काय करायचे हे नक्की झाले की त्या दृष्टीने प्रयत्न होण्यास सुरुवात होते. आपले ध्येय साध्य होते,’ असे डॉ. पेजावर यांनी सांगितले.

स्वयंशक्तीच्या अनुभवानंतर वाट सुकर.

‘जोशी बेडेकर’मध्ये नीता माळी यांचे ‘निवेदना’बद्दल मार्गदर्शन

आजच्या आधुनिक काळात व्यक्ती-व्यक्तीमधील संवाद दुरावला आहे. आपले व्यक्तिमत्त्व समाजापुढे मांडताना प्रत्येकाला आपल्या वाणीवर प्रभुत्व राखता आले पाहिजे. स्वयंशक्तीचा अनुभव आल्यावर आपल्या आयुष्याची पुढील वाट सुकर होते, असे मत सुप्रसिद्ध निवेदिका नीता माळी यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयात व्यक्त केले. महाविद्यालयाच्या स्पीकर्स अकादमीतर्फे आयोजित ‘निवेदनातील संवाद’ या कार्यक्रमात त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.

इंटरनेट आणि सोशल मीडियाच्या युगात आपला समाजाशी, कुटुंबातील व्यक्ती, मित्र परिवार यांच्याशी असणारा सुसंवाद दुरावला जातो. त्यामुळे काही अघटित अशा घटना घडतात, असे मत  माळी यांनी व्यक्त केले. संवाद साधणे याविषयी सांगताना बोलणे हे विमान चालविण्यासारखे तर लेखन हे वाहन चालविण्यासारखे असते असे त्यांनी सांगितले. आपली लेखनात चूक झाली तर ती पुन्हा दुरुस्त करता येते. ज्याप्रमाणे वाहनातील बिघाड रस्त्याच्या बाजूला थांबवून पाहता येते तशा प्रकारचे लेखन असते. संवाद साधणे हे विमानासारखे असते. विमान प्रवासादरम्यान झालेला बिघाड हा जसा दुरुस्त करता येत नाही, त्याचप्रमाणे प्रत्येकाचे बोलणे हे विचारपूर्वक, सुनियोजित, अस्खलित आणि प्रभुत्वसंपन्न असावे, असे संवादाविषयी त्यांनी सांगितले. विद्यार्थी देशाच्या उज्ज्वल भविष्याचे शिल्पकार आहेत, असे विद्यार्थ्यांविषयी बोलताना त्यांनी सांगितले. निवेदकाने नेहमी लवचिक असावे, प्रसंगानुरूप त्याने आपले निवेदन सादर करावे, निवेदनाच्या विविध अंगांचा, पायऱ्यांचा क्रम लक्षात घ्यावा. निवेदन कला अवगत करताना नेहमी आपले वेगळेपण निवेदकाला सिद्ध करावे लागते. कार्यक्रमाच्या दडपणाने निवेदक आपले निवेदन चांगले करू शकतो, असे मत नीता माळी यांनी निवेदनाच्या बाबतीत व्यक्त केले. वाचनापेक्षाही जास्त अनुभव व ज्ञान आपल्याला एखाद्या चांगल्या व्याख्यानातून मिळते, असे सांगत त्यांनी विद्यार्थ्यांना ज्ञानसंपादनाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. विमुक्त राजे यांनी केले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी आपले मनोगत व्यक्त करताना आपले शब्द, बोलणे हे थेट असावे. आपले शब्द श्रोत्यांपर्यंत बाणासारखे अचूक आणि वेगाने गेले पाहिजेत. व्यक्तिमत्त्व विकसित करण्यावर भर द्यावा, असे सांगितले.

डायमेन्शन्सच्या आविष्कारांना प्रारंभ

वझे केळकर महाविद्यालयात कॉमिक बुक महोत्सव

मुलुंड: वझे-केळकर महाविद्यालयात दरवर्षी मोठय़ा स्तरावर आयोजित केल्या जाणाऱ्या डायमेन्शन्स महोत्सवाचा एक भाग म्हणून महाविद्यालयात कॉमिक बुक आठवडा साजरा करण्यात आला. केवळ आय.आय.टी, मुंबई आणि वझे-केळकर महाविद्यालयात कॉमिक बुक (हास्य पुस्तिका ) बनविण्याच्या कार्यशाळा घेण्यात आल्या.

डायमेन्शन महोत्सव २०१६ च्या अंतर्गत हा कॉमिक बुक सोहळा साजरा केला गेला. कॉमिक बुक म्हणजेच हास्य पुस्तिकेचा प्रचार व प्रसार करण्याचे मुख्य उद्दिष्ट या संकल्पनेच्यामागे होते. सॅव्हिओ मस्केरेनस हे या सोहळ्याचे मार्गदर्शक होते. २२ वर्षांपासून टिंक्वलचे कलादिग्दर्शक आणि शिकारी शंभूच्या निर्मात्यांनी विद्यार्थ्यांना कॉमिक बुक बनवण्याची प्रक्रिया आणि प्रकाशनाबद्दल मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांची कार्यशाळा घेतली. कॉमिक या प्रकारची प्रगती रेखाटताना त्यांनी अमरचित्र कथाच्या प्रथम कलाकृती कृष्णा पासून ते अलीकडच्या परमवीर चक्पर्यंतच्या प्रगतीची चित्रफीत दाखविली. चित्रांच्या मागून हास्याची लकेर का उमलते याची प्रात्यक्षिके त्यांनी केली. समारंभात त्यांनी विद्यार्थ्यांशी संवादही साधला. विद्यार्थ्यांना प्रश्न विचारून अचूक उत्तर देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी पारितोषकेही दिली. या उपक्रमाच्या अंतर्गत विद्यार्थ्यांना कॉमिक या विषयावर आकर्षित करण्यासाठी त्यावर आधारित टी शर्ट, बॅग, पुस्तिका, गुड्डीज वाटण्यात आल्या. या सोहळ्याला तब्बल तीनशे विद्यार्थी उपस्थित होते. वेगवेगळ्या प्रकारच्या वेशभूषा करून मुलांनी या सोहळ्याचा आनंद लुटला.

(युवा वार्ताहर: हृषिकेश मुळे, सौरव आंबवणे, प्रशांत घोडविंदे, मानसी जोशी, प्रशांत कापडी)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 2:00 am

Web Title: thane college event 7
Next Stories
1 खेळ मैदान : घोडबंदर मॅरेथॉनमध्ये यश, संयुरी विजेते
2 ऑन दी स्पॉट
3 बेकायदा नळजोडणी आता गुन्हा
Just Now!
X