News Flash

कॉलेजच्या कट्टय़ावर : चित्रपट करमणुकीबरोबरच अभ्यासाचे माध्यम

या कार्यशाळेत एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता.

चित्रपट रसग्रहण कार्यशाळेत समर नखाते यांचे प्रतिपादन

शब्द ही साहित्याची, तर प्रतिमा चित्रपटांची भाषा असते, याची प्रचीती जोशी-बेडेकर महाविद्यालयात नुकत्याच पार पडलेल्या दोन दिवसीय चित्रपट रसग्रहण कार्यशाळेदरम्यान आली. महाविद्यालयातील ‘फिल्म सोसायटी’ आणि ‘फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटीज ऑफ इंडिया’ यांच्या संयुक्त विद्यमाने चित्रपटविषयक जाणिवा अधिक समृद्ध करणाऱ्या या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह, सुप्रसिद्ध चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर, बीएमएम समन्वयक प्रा. महेश पाटील यांच्या हस्ते या कार्यशाळेचे उद्घाटन करण्यात आले. या कार्यशाळेत एकूण ८० विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. त्यात प्राध्यापक वर्ग व बाहेरील अनेक व्यक्तींचा सहभाग होता. कार्यशाळेच्या पहिल्या दिवशी ज्येष्ठ चित्रपट समीक्षक सुधीर नांदगावकर यांचे श्रोत्यांना मार्गदर्शन लाभले. ‘अरायव्हिंग ट्रेन’, ‘राजा हरिश्चंद्र’ यासारख्या जुन्या, दुर्मीळ चित्रपटांच्या चित्रफिती कार्यशाळेत दाखविण्यात आल्या. तसेच स्वातंत्र्यपूर्व काळात जगातील क्रांतीचा सुरुवातीच्या काळात चित्रपटनिर्मितीवर होणारा परिणाम त्यांनी विस्तृतपणे श्रोत्यांसमोर मांडला. भारतात कॅमेराचा वापर कधीपासून सुरू झाला, काळानुरूप चित्रपटांचे आशय, विषय आणि तंत्रज्ञान कसे बदलत गेले, याचाही आढावा या वेळी घेतला गेला. सुधीर नांदगांवकर यांनी संदर्भात विस्तृत विवेचन केले. त्यानंतर ओमकार पाटकर यांनी श्रोत्यांना ‘संकलन’ अर्थात ‘एडिटिंग’ या विषयाची ओळख करून दिली. संकलनामध्ये येणारे अडथळे, त्यावर करायची मात आदी क्लृप्त्या त्यांनी या वेळी सांगितल्या. त्याचप्रमाणे दृश्य परिणाम गडद करणाऱ्या निरनिराळ्या इफेक्ट्सची माहिती करून दिली. सुप्रसिद्ध लेखक गणेश मतकरी यांनी विद्यार्थ्यांना ‘स्क्रिप्ट रायटिंग’ म्हणजे नेमकं काय, चित्रपटाचे लेखन कसे करावे याबद्दल माहिती सांगितली व त्याचसोबत जुन्या व नवीन काळातील चित्रपटांच्या काही क्लिप्स दाखवून त्यांतील संवादावर भाष्य केले. दुसऱ्या दिवशी प्रसिद्ध चित्रपट समीक्षक सतीश जकातदार यांनी ‘अयोध्येचा राजा’पासून ते सध्याच्या काळातील दादासाहेब फाळके यांच्या जीवन कारकीर्दीवर आधारित ‘हरिश्चंद्राची फॅक्टरी’पर्यंतचा चित्रपटांचा प्रवास, चित्रपटांच्या तंत्रज्ञानात होत जाणारे बदल आदी गोष्टी श्रोत्यांसमोर मांडल्या. अनेक गाजलेल्या चित्रपटांवर त्यांनी भाष्य केले.

‘मानवाला दोन डोळे आहेत. कॅमेरा या तिसऱ्या डोळ्याने दाखवली जाणारी दुनिया आपण चित्रपटांच्या माध्यमातून पाहतो. कॅमेराचा डोळा मुक्त आहे’, असे प्रतिपादन चित्रपटांचे गाढे अभ्यासक समर नखाते यांनी केले. कार्यशाळेच्या शेवटच्या दिवशी त्यांचे अमूल्य मार्गदर्शन श्रोत्यांना लाभले. कॅमेरा अँगल्स ते एडिटिंग, लाइटिंग या घटकांची ओळख त्यांनी श्रोत्यांना त्यांच्या व्याख्यानाद्वारे करून दिली. ‘डोंबिवली फास्ट’, ‘चक दे इंडिया’सारख्या चित्रपटांचे व्हिडीओज् त्यांनी उदाहरणादाखल दाखविले. चित्रपट ही करमणुकीसोबतच एक अभ्यासपूर्ण अशी गोष्ट आहे. तसेच ‘टोरेंट’सारख्या साइटवरून चित्रपट डाऊनलोड करण्यापेक्षा थेट चित्रपटगृहात जाऊन चित्रपट पाहणे यालाच सुसंस्कृतपणाचे लक्षण म्हणता येईल, असे मत समर नखाते यांनी मांडले. या दोन दिवसांच्या कार्यशाळेत श्याम बेनेगल दिग्दर्शित स्मिता पाटील व गिरीश कर्नाड यांची प्रमुख भूमिका असणारा ‘मंथन’ हा चित्रपट दाखवण्यात आला.

चित्रपट या विषयाची व्याप्ती ही फार मोठी आहे. त्यामुळे हे माध्यम समजून घेण्यासाठी सातत्याने अशा प्रकारच्या कार्यशाळा होणे आवश्यक असल्याचे मत महाविद्यलयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह यांनी या वेळी मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. समीर पाटणकर व विद्यार्थिनी प्रज्ञा पोवळे यांनी केले. प्राध्यापक वर्ग व बीएमएम विद्यार्थ्यांच्या उत्कृष्ट आयोजनाची साथ कार्यशाळेला लाभली.

मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचे उद्घाटन

पार्ले टिळक विद्यालय असोसिएशन संचालित मुलुंड वाणिज्य महाविद्यालयाच्या मराठी वाङ्मय मंडळाचा उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला. सुप्रसिद्ध संगणक तज्ज्ञ, संगीत तज्ज्ञ आणि लेखक डॉ. अच्युत गोडबोले प्रमुख पाहुणे म्हणून या वेळी उपस्थित होते. अमेय रानडे यांनी त्यांची प्रकट मुलाखत घेतली. सोलापुरातल्या त्यांच्या बालपणापासून ते सीईओपर्यंतचा जीवनपटच त्यांनी उलगडून दाखवला. त्यांचा लेखनध्यास, विविध विषयांवर त्यांनी मिळवलेलं प्रभुत्व, अलौकिक संगीतप्रेम, वैयक्तिक आयुष्यातले कठीण प्रसंग याविषयी ते भरभरून बोलले. विद्यार्थ्यांनी केलेल्या आग्रहास्तव त्यांनी ‘मल्हार’ रागातील बंदिश सादर करून वाङ्मय मंडळाच्या या कार्यक्रमात विलक्षण रंगत आणली.

‘सीएचएम’मध्ये युथ फेस्टिव्हलची पूर्वतयारी

विद्यार्थी कलाकारांकडून युथ फेस्टिव्हलची पूर्वतयारी करून घेण्यासाठी मुंबई विद्यापीठाच्या विद्यार्थी कल्याण विभागातर्फे एका कार्यशाळेचे आयोजन केले होते.  उल्हासनगर येथील सीएचएम महाविद्यालयात २२ जुलै रोजी सकाळी १० ते सायंकाळी  ४ दरम्यान ही कार्यशाळा पार पडली. या कार्यशाळेत मुंबई विभागाचे सांस्कृतिक समन्वयक नीलेश सावे यांनी मार्गदर्शन केले. या वेळी नृत्य विभागासाठी अमोल बावकर, फाइन आर्टसाठी नितीन केणी, नाटय़ विभागासाठी विनायक दिवेकर, लेखन विभागासाठी कृष्णा भोंगणे या मान्यवरांचे मार्गदर्शन लाभल्याचे ठाणे जिल्हा सांस्कृतिक समन्वयक निशा देवधर यांनी सांगितले. ३५ महाविद्यालयांनी या कार्यशाळेत भाग घेतला. युथ फेस्टिव्हलची ठाणे जिल्हा विभागाची प्राथमिक फेरी साकेत महाविद्यालय कल्याण येथे ४ ऑगस्ट रोजी होणार असल्याचेही या वेळी त्यांनी सांगितले.

अर्थशास्त्रच्या ‘शोधनिबंध’पत्रिका सादरीकरण स्पर्धा

अर्थशास्त्र म्हणजे कंटाळवाणा विषय असा विद्यार्थ्यांचा समज असतो. शाळेत जशी गणिताची भीती वाटते, तशीच महाविद्यालयात असताना अर्थशास्त्राची. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये या विषयाची आवड निर्माण व्हावी, या हेतूने जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या अर्थशास्त्र विभागातर्फे आंतरमहाविद्यालयीन  ‘शोधनिबंध’ सादरीकरण स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत विविध महाविद्यालयांमधील विद्यार्थ्यांनी अनेक विषयाशी निगडित वेगवेगळे ‘शोधनिबंध’ सादर केले. या कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग, अर्थशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. दिलीप साबळे, डॉ. सागर ठक्कर तसेच प्रा. नीता पाठक यांचे मार्गदर्शन लाभले.

शोधनिबंध सादरीकरणासाठी एकूण अकरा विषय देण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी भारतातील आर्थिक वृद्धी आणि भाववाढ, आर्थिक वृद्धीमधील सरकारची भूमिका, व्यापारी बँकांची कामगिरी, सार्वजनिक आणि खासगी अपव्यय यातील फरक यासारख्या विषयावर शोधनिबंध सादर केले. यामध्ये विद्यार्थ्यांना सांघिक पद्धतीने पेपर सादर करायचे होते. प्रत्येक संघामध्ये चार विद्यार्थ्यांचा समावेश होता. या सादरीकरणात पिल्लई महाविद्यालयास प्रथम क्रमांक, चेंबूरच्या विवेकानंद महाविद्यालयास द्वितीय आणि एस. आय. ई. एस. महाविद्यालयास तृतीय क्रमांकदेण्यात आला.

या स्पर्धेमध्ये सोळा महाविद्यालयातील २४ संघांनी भाग घेतला. यामध्ये सौमैय्या, स्वामी विवेकानंद, पिल्लई, एस.आय. ई. एस, भिवंडीचे स्वामी नारायण कॉलेज आदी सहभागी झाले होते. विजेत्यांना प्रमाणपत्र आणि सन्मानचिन्ह देण्यात आले. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांनी विजेत्यांचे अभिनंदन केले. विद्यार्थ्यांची अर्थविषयक निरीक्षणशक्ती वाढावी, या हेतूने स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. वर्षभर या स्पर्धाचे आयोजन करणार असल्याचे डॉ. दिलीप साबळे यांनी सांगितले.

विद्यार्थ्यांची विधानसभेला भेट

विद्यार्थ्यांना राज्याचे कामकाज कसे चालते, याबाबत माहिती मिळण्यासाठी जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या पत्रकारिता, राज्यशास्त्र आणि तत्त्वज्ञान विभागाच्या विद्यार्थ्यांनी नुकतीच विधानसभेला भेट दिली. महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. शकुंतला सिंग यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते. जनसंज्ञापन आणि पत्रकार विभाग प्रमुख प्रा. महेश पाटील, प्रा. विमुक्ता राजे, प्रा. संगीता दास यांच्या सहकार्याने हा उपक्रम पार पाडण्यात आला.

राज्याचे कामकाज कसे चालते, विधान परिषदेची कामे कोणती, एखादा ठराव कसा संमत केला जातो हे आपण शाळेत अभ्यासलेले आहे. अभ्यासदौऱ्याच्या निमित्ताने हे कामकाज अधिक जवळून पाहण्याची संधी विद्यार्थ्यांना मिळाली. दर वर्षी विद्यार्थ्यांसाठी विधान सभेच्या भेटीचे आयोजन केले जाते. यंदाचे हे पाचवे वर्ष आहे. विद्यार्थ्यांना अत्यंत कडेकोट बंदोबस्तात विधानपरिषदेत पाठवण्यात गेले. तिथे कामकाज सुरू होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे अत्यंत महत्त्वाच्या विषयावर आपले मत व्यक्त करत होते. विद्यार्थ्यांना विधानसभा आणि विधान परिषद ही दोन्ही दालने दाखविण्यात आली. तिथे कसे कामकाज चालते हे प्राध्यापकांनी विद्यार्थ्यांना समजून सांगितले. या वेळी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचे निरसन करण्यात आले.

यानंतर पत्रकारिता विभागाच्या विद्यार्थ्यांनी मुंबई मराठी पत्रकारसंघाला भेट दिली. पत्रकारसंघाचे अध्यक्ष देवदास मटाले यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. पत्रकारिता या पेशातील चांगल्या आणि वाईट दोन्ही बाजूंची या वेळी चर्चा झाली. पत्रकारसंघातर्फे घेतल्या जाणाऱ्या विविध अभ्यासक्रमांची माहिती या वेळी देण्यात दिली. विविध वर्तमानपत्रे, त्यांचा इतिहास विद्यार्थ्यांना या वेळी समजून घेता आला. राज्यशास्त्र विभागाच्या प्रा. प्रज्ञा राव बहादूर, तत्त्वज्ञान विभागाचे प्रा. अभिलाष वाघमारे आणि स्टुडंट्स फोरमच्या प्रा. प्रियंवदा टोकेकर यांनी मार्गदर्शन केले.

पी. डी. कारखानीस महाविद्यालयात करिअर मार्गदर्शन कार्यशाळा

अंबरनाथ येथील पी. डी. कारखानीस महाविद्यालयातील कॉमर्स असोसिएशन संचालित मंडळाचा उद्घाटन समारंभ नुकताच आयोजित करण्यात आला. त्यानिमित्ताने टी.आय.एम.ई. इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंटचे प्रा. रमेश मिश्रा यांनी विद्यार्थ्यांना ‘करिअर इन बँकिंग’ या विषयावर मार्गदर्शन केले. यामध्ये त्यांनी विद्यार्थ्यांना आय.बी.पी.एस. आणि इतर विषयांची तयारी कशी करावी, याबाबतीत मार्गदर्शन केले. तसेच इंग्रजी, गणित, लॉजिकल रिजनिंग व सामान्य ज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले. तसेच त्यांनी मुलाखतीच्या वेळी कोणत्या गोष्टींचे भान बाळगावे, याबाबतीत काही सूचना केल्या. विद्यार्थ्यांच्या दृष्टीने या वेळी झालेली चर्चा फारच उद्बोधक ठरली. या कार्यशाळेस विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते. रमेश मिश्रा व तुषार महाजन यांनी कॉमर्स असोसिएशन या मंडळाच्या गेल्या वर्षांतील विविध कार्यक्रमांची छायाचित्रे असलेल्या संग्रहाचे याप्रसंगी प्रकाशन केले. आज बँकिंग क्षेत्रांत खूप रोजगाराच्या संधी निर्माण होत आहेत. कॉमर्स असोसिएशनला या संधीचा पुरेपूर फायदा घेता यावा म्हणून असे मार्गदर्शनपर व्याख्यान आयोजित करण्यात आल्याचे मंडळाच्या प्रमुख प्रा. शुभांगी केदारे यांनी सांगितले.

खर्डी महाविद्यालयात युवा महोत्सवाची विभागीय फेरी

विद्यार्थी कल्याण विभाग मुंबई विद्यापीठ आणि जीवनदीप महाविद्यालय, खर्डी यांच्या संयुक्त विद्यमाने ४९व्या आंतर महाविद्यालयीन युवा महोत्सवाच्या विभागीय फेरीचे आयोजन खर्डी महाविद्यालयात करण्यात आले आहे. ठाणे आदिवासी विभाग क्रमांक नऊमधील २१ महाविद्यालयांतील विद्यार्थी या युवा महोत्सवात सहभागी होणार असून ३ ऑगस्ट रोजी खर्डी महाविद्यालयात हा महोत्सव पार पडणार आहे.

मुंबई विद्यापीठाच्या ठाणे आदिवासी विभागाच्या अंतर्गत युवा महोत्सवात भारतीय शास्त्रीय नृत्य, वादविवाद स्पर्धा, मूक अभिनय, एकपात्री अभिनय, प्रश्नमंजूषा व वत्कृत्व स्पर्धाचा समावेश आहे. खर्डीसारख्या आदिवासी भागातील महाविद्यालयात प्रथमच अशा विद्यापीठीय महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

एसएसटी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांची आकाशवाणी केंद्राला भेट

अभ्यासक्रमात शिकत असलेल्या माहितीचा खजिना प्रत्यक्षात विद्यार्थ्यांना अनुभवता यावा, आकाशवाणी केंद्रावर काम कसे चालते याची माहिती विद्यार्थ्यांना कळावी यासाठी उल्हासनगरच्या एस.एस.टी. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी आकाशवाणी केंद्र भेटीचे आयोजन करण्यात आले होते. आकाशवाणीमधील स्टुडिओ, रेकॉर्डिग कसे चालते, याबाबत विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली. जनसंज्ञापन आणि पत्रकारिता विभागाचे प्रा. प्रमोद गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली या भेटीचे आयोजन करण्यात आले होते.

(युवा वार्ताहर: मानसी जोशी, हृषिकेश मुळे, प्रशांत घोडविंदे)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 28, 2016 2:16 am

Web Title: thane college event 8
Next Stories
1  खेळ मैदान : बास्केटबॉल स्पर्धेत विद्यानिकेतन शाळा अव्वल
2 ऑन दी स्पॉट
3 लोकलमध्ये विद्यार्थिनीला महिलांकडून बेदम मारहाण