कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयात ‘काव्यामृताचा ठेवा’

मराठी भाषेच्या प्रचारासाठी कवितांचे योगदान मोलाचे ठरले आहे. कवितांच्या माध्यमातून महाविद्यालयीन तरुणांच्या मनात मराठी भाषेची आवड निर्माण व्हावी या उद्देशाने महाविद्यालयात ‘काव्यामृताचा ठेवा’ या कवितांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात संत ज्ञानेश्वर, बहिणाबाई या संताच्या काव्याचा परामर्श घेतला गेला. तसेच कवी अशोक बागवे, संदीप खरे यांच्या कवितांचे सादरीकरण विद्यार्थी, प्राध्यापकांनी केले.

विद्यार्थ्यांना अनेक कवींचा परिचय करून या वेळी करून देण्यात आला. विस्मरणात गेलेल्या मराठी म्हणींचे २७ फलक महाविद्यालयाच्या आवारात लावण्यात आले होते. मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने हस्तलिखित प्रकाशित करण्यात आले. मराठी साहित्यात मोलाचे योगदान देणाऱ्या आणि साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त साहित्यिकांचा समावेश ‘साहित्यरत्ने’ हस्तलिखितामध्ये करण्यात आला. स\दर हस्तलिखित दोन भागांमध्ये प्रकाशित करण्यात आले. मराठी विद्यार्थ्यांसोबत हिंदी भाषिक विद्यार्थ्यांनीसुद्धा या हस्तलिखितामध्ये आपले योगदान दिले. प्राचार्य संतोष गावडे आणि ग्रंथपाल नीतेश सोनावणे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हे हस्तलिखित तयार केले. संस्थेच्या विश्वस्त श्रद्धा मोरे यांच्या हस्ते हस्तलिखित प्रकाशन सोहळा पार पडला.

मातृभाषेतून मिळालेले ज्ञानबोध महत्त्वाचे!

‘जोशी-बेडेकर’मधील व्याख्यानमालेत प्रा. रंगनाथ पठारे यांचे प्रतिपादन

‘कोणत्याही भाषेत विपुल ज्ञानाचे संचित असते. भाषा कधी लहान किंवा मोठी नसते. भाषेची जपणूक महत्त्वाची असते. ज्ञान संक्रमणात परकीय भाषा एक बाधा ठरते, कारण मातृभाषेतून मिळालेले ज्ञानबोध महत्त्वाचे ठरतात. ज्ञानार्जनाचा कालावधी मातृभाषेत अल्प असतो,’ असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. रंगनाथ पठारे यांनी जोशी-बेडेकर महाविद्यालयात व्यक्त केले. मराठी भाषा दिनाचे औचित्य साधून मराठी वाङ्मय मंडळाच्या वतीने महाविद्यालयात व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी संत साहित्याचे गाढे अभ्यासक अरविंद दोडे व्याख्यानासाठी उपस्थित होते. भाषा जीवनात महत्त्वाची का आहे आणि मातृभाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या विचारांच्या माध्यमातून अनुभवण्यास मिळाले.

‘विद्यार्थ्यांनी वाचनाची आवड जोपासावी. आयुष्याच्या ज्ञानशिदोरीचे माध्यम असलेल्या ग्रंथालयाचा वापर करावा. समाज घडवताना आज फक्त कागदावर शिक्षित परंतु प्रत्यक्षात अशिक्षित असा तरुण वर्ग तयार होताना दिसतो. भाषा टिकवणे म्हणजे स्वत:चे अस्तित्व टिकवणे,’ असे मत रंगनाथ पठारे यांनी मांडले. सर्व भाषांचे मूळ संस्कृत भाषा आहे, सावरकरांनी मराठी भाषेला अनेक नवनवीन शब्द दिले, परंतु मराठी भाषेतील काही शब्द हे लिखित स्वरूपात इतिहासात नसल्याने ज्ञानभाषा होण्यासाठी अडचण निर्माण होत आहे असे मत अरविंद दोडे यांनी मांडले. साहित्याचे अनुवाद हे मराठी भाषेत आहेत. परंतु विज्ञान तंत्रज्ञानयुक्त पुस्तकांचे मराठी भाषेतील अनुवाद हे फार कमी आहेत. भाषेवर प्रत्येकाचे नितांत प्रेम असावे, अनुवादित साहित्य जास्त वाचायला हवे असे त्यांनी सांगितले. या निमित्ताने अहिराणी भाषा, हिंदी, बंगाली, उडिया, मल्ल्याळम, कन्नड, संस्कृत या भाषांचाही वेध कार्यक्रमात घेण्यात आला. तसेच महाविद्यालयात आयोजित केलेल्या ग्रंथप्रदर्शनातून ग्रंथालयातील ग्रंथसंपदा विद्यार्थ्यांना पाहायला मिळाली. निरनिराळे समांतर, कोश, ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त लेखकांचे साहित्य, वार्षिक शब्दकोश, संत साहित्यावर आधारित  खंड, वेद आणि विविध विषयांतील पुस्तके प्रदर्शनात ठेवण्यात आली होती.

वझे-केळकर महाविद्यालयात भाषेचे ‘मंथन’ वक्तृत्व, वादविवाद स्पर्धेतून मराठी भाषेविषयी जागृती

वि. ग. वझे महाविद्यलयात मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाने मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून यंदा प्रथमच मंथन- जागर मराठीचा या महोत्सवाचे आयोजन केले होते. दोनदिवसीय या महोत्सवात आंतरशालेय आणि आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतील विद्यार्थ्यांसाठी मंथन महोत्सवाच्या माध्यमातून कलागुणांचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले होते. ठाणे आणि  मुलुंड परिसरातील अनेक शाळा, महाविद्यालयांनी या महोत्सवात सहभाग घेतला होता. महोत्सवांतर्गत शाळा व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी वक्तृत्व, वादविवाद, प्रश्नमंजुषा, एकपात्री अभिनय, चित्रकला आणि व्यंगचित्र अशा स्पर्धामध्ये सहभागी होण्यासाठी विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात गर्दी केली होती. मराठी भाषा संवर्धनाचा उद्देश ठेवून आणि स्पर्धात्मक, मनोरंजन पद्धतीने मराठी भाषेचे विविध अंग विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावेत यासाठी मराठी भाषा आणि वाङ्मय मंडळाने या मिनी महोत्सवाचे आयोजन केले होते. या स्पर्धेतील विषयांच्या माध्यमातून मराठी भाषेच्या विविधता, मराठी संस्कृती, समाजातील घडामोडी यावर प्रकाश टाकण्यात आला.

वक्तृत्व स्पर्धेसाठी वाटचाल नाटकातून सिनेमाकडे, तंत्रयुगातील मराठी असे वक्तृत्वासाठी विषय देण्यात आले होते. वादविवाद स्पर्धेमध्ये मराठी भाषिकांचे मराठीकडे दुर्लक्ष होत आहे की नाही, हा विषय देण्यात आला होता. प्रश्नमंजुषा स्पर्धेत मराठी भाषा, साहित्य व कलेवर आधारित प्रश्न विद्यार्थ्यांना विचारण्यात आले. चित्रकला स्पर्धेत भारतीय सण आणि उत्सव, मेक इन इंडिया आणि व्यंगचित्र स्पर्धेत दहशदवाद व भ्रष्टाचार एक सामाजिक समस्या अशा विषयांवर विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. आवडीचे व त्यांच्या जीवनाशी निगडित असे विषय देण्यात आले होते.

कुसुमाग्रज आणि मंगेश पाडगावकरांच्या कवितांचे वाचन या वेळी करण्यात आले. कुसुमाग्रज यांच्या जीवनावरील लघुपट सादर करण्यात आला. या वेळी कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे स्वप्निल शिंगोटे यांनी ‘तंत्रज्ञानासाठी मराठी आणि मराठीसाठी तंत्रज्ञान’ या विषयावर व्याख्यानात सामाजिक तंत्रमाध्यमांचा मराठी भाषेत वापर कसा करावा याविषयी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी ट्विटर, फेसबुक, लिंकडिन अशा सामाजिक माध्यमांवर  मराठी भाषेत लिहावे व स्तंभलेखन करावे असे मार्गदर्शन करत मराठी भाषेचा इतिहास आणि प्रगती याबद्दल मार्गदर्शन केले.

बांदोडकर महाविद्यालयात काव्यशास्त्र मैफल

बांदोडकर विज्ञान महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने काव्यशास्त्र मैफल आयोजित करण्यात आली होती. कवी अशोक बागवे, कवी सतीश सोळांकूरकर या मैफिलीसाठी उपस्थित होते. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी ‘मला शिवाजी व्हायचंय’ या नाटकाचे स्वगत या वेळी सादर केले. डॉ. लक्ष्मण देशपांडे यांच्या ‘वऱ्हाड निघालंय लंडनला’ या एकपात्री नाटय़ाचा प्रयोग अमितेश ताम्हाणे या विद्यार्थ्यांने सादर केला.

मराठी भाषेची नजाकत, भाषेतील गमती, भाषेची लवचीकता, मराठी भाषेतील काव्यशास्त्र विनोदाची बाजू या मुद्दय़ांवर कवी अशोक बागवे यांनी प्रकाश टाकला. एका कातकरी महिलेने ‘दख्खनची राणी आली’ हे सांगताना आपल्या मैत्रिणीला ‘डंकिण आली गं’ असा उल्लेख केला. ‘डंकिण’ हा नवीन शब्द मराठीत दाखल झाला. नवीन शब्द विद्यार्थ्यांनी शोधायला हवे, असा सल्ला त्यांनी दिला. मराठी भाषेचा उपयोग आणि उच्चार योग्यरीत्या केल्यास मराठी भाषेचे संवर्धन होईल असे त्यांनी सांगितले. मराठी भाषा लोकप्रभा आणि राजभाषा आहे मात्र ज्ञानभाषेचा दर्जा प्राप्त करून देण्यासाठी ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, संशोधन या क्षेत्रातही मराठी भाषा असायला हवी, असे मराठी भाषा विभागाचे प्रमुख प्रा. बिपिन धुमाळे यांनी सांगितले. या वेळी ग्रंथालय विभागातर्फे पुस्तक प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. कुसुमाग्रजांची पुस्तके, तसेच जर्मन, फ्रेंच, जपानी, या भाषांमधून मराठीत भाषांतरित झालेल्या पुस्तकांचा समावेश होता.

जी. व्ही. आचार्य महाविद्यालयाचा ‘सिवोल्यूशन’ महोत्सवाच्या माध्यमातून बांधकामविषयक धडे

अभियांत्रिकी महाविद्यालयात होणारे महोत्सव विद्याथ्र्र्याचे कायमच आकर्षण ठरले आहेत. शेलुच्या जी. व्ही. आचार्य इंजिनीअरिंग महाविद्यालयाच्या सिव्हिल विभागाचा ‘सिवोल्यूशन’ महोत्सवात यंदा विविध उपक्रमांची रेलचेल पाहायला मिळणार आहे. अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान विषयाचे महोत्सव अनेक महाविद्यालयात होतात. मात्र सिव्हिल विषयाच्या संदर्भातील जी. व्ही. आचार्य महाविद्यालयाचा हा एकमेव महोत्सव आहे. यंदा महोत्सवाचे चौथे वर्ष असून अभियांत्रिकी विभागाचे विद्यार्थी या महोत्सवाची तयारी करताना दिसत आहेत. महाविद्यालायात ४ आणि ५ मार्च या दिवशी होणारा हा सिवोल्यूशन महोत्सव दरवर्षी नावीन्य घेऊन येणारा असतो. सिव्हिल आणि रिवोल्यूशन या दोन शब्दांपासून सिवोल्यूशन हे महोत्सवाला नाव देण्यात आले आहे.

महोत्सवामध्ये मास्टर प्लानिंग स्पर्धा विशेष आकर्षण ठरणार आहे. विद्यार्थ्यांना या स्पर्धेत बुद्धिमत्तेचा उपयोग करून एका बांधकामाचा आराखडा बनवायचा आहे. उत्कृष्ट बांधकामाचा आराखाडा बनविलेल्या स्पर्धकास पारितोषिक देण्यात आले आहे. या महोत्सवासाठी सिव्हिल संकल्पनेला अनुसरून महाविद्यालय सजवण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांनी महोत्सव यशस्वी करण्यासाठी मेहनत घेतलेली आहे.

फ्लोटिंग स्ट्रो आणि बांधकाम प्रश्नमंजुषा

प्लोटिंग स्ट्रो या स्पर्धेच्या माध्यमातून स्पर्धकांना स्ट्रो आणि पेपरपासून पाण्यावर तरंगेल असे बांधकाम करायचे आहे. तसेच विद्यार्थ्यांचे बांधकाम क्षेत्रातील ज्ञान जाणून घेण्यासाठी प्रश्नमंजुषा स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. या महोत्सवासाठी १२ विद्यार्थ्यांचा प्रमुख संघ गेल्या दोन महिन्यांपासून कार्यरत आहे. यावर्षी विद्यार्थ्यांनी फेसबुक आणि ट्विटरच्या माध्यमातून महोत्सवाची प्रसिद्धी केली आहे.