एन.के.टी. महाविद्यालयात चर्चासत्र

ठाणे : सुशासन दिन साजरा करून सुशासनाविषयी जनजागृती करता येते, मात्र सुशासन निर्माण करणे आणि ते अबाधित राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. या उद्देशाने ठाण्याच्या सेठ नानजीभाई खिमजीभाई ठक्कर ठाणावाला महाविद्यालयात २५ डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्मदिवस सुशासन दिवस म्हणून साजरा करण्यात आला. या दिवसाचे औचित्य साधून प्रा. आरती सामंत आणि प्राचार्य डॉ. कारखेले यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयात शासन ते सुशासन या चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

सुशासन म्हणजे नक्की काय, सुशासनाचे लोकशाहीतील महत्त्व, सुशासनाचा पाया अधिक भक्कम करताना येणारी आव्हाने, सुशासनात लोकसहभागाचे अनन्यसाधारण महत्त्व, सुशासनाविषयी लोकांमध्ये असणारा संभ्रम या मुद्दय़ांवर विद्यार्थ्यांनी आयोजित केलेल्या शासन ते सुशासन या चर्चासत्रात मार्गदर्शक चर्चा केली गेली. या चर्चासत्रामुळे विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक जाणीव व राजकीय सतर्कता अधिक बळकट होण्यास मदत होते असा विश्वास प्रा. आरती सामंत यांनी चर्चासत्रात व्यक्त केला. चर्चासत्रात विद्यार्थ्यांमध्ये देशाच्या सामाजिक, राजकीय आणि आर्थिक परिस्थितीविषयी असणारी उदासीनता व त्यामुळे भविष्याविषयी निर्माण झालेली संभ्रमता यावर मार्ग शोधून काढण्यासाठी विद्यार्थ्यांकडून विविध उपाय सुचवले गेले.

महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे गट

चर्चासत्रात विद्यार्थ्यांनी संभाषणातून प्रेरणा घेऊन सहभागी झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने सुशासन आणण्यासाठी विद्यार्थ्यांची भूमिका आणि योगदान या दृष्टीने विविध गट महाविद्यालयात स्थापन केलेले आहेत. विद्यार्थ्यांची वर्गातील उपस्थिती व शिस्त वाढविण्यासाठी अमलात आणावयाचे उपाय शोधण्यासाठी व त्या दृष्टीने त्वरित कार्य करण्यासाठी महाविद्यालयात विद्यार्थ्यांचे हे गट कार्यरत असणार आहेत.

ज्ञानसाधना महाविद्यालयात ‘युतोपिया’ साजरा

चैताली शिंदे, युवा वार्ताहर

ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयाचे आकर्षण असणारा ‘युतोपिया २०१५-१६’ हा महोत्सव नुकताच पार पडला. दरवर्षी विविध संकल्पनांच्या साहाय्याने साकारणाऱ्या या महोत्सवाची यंदाची संकल्पना ‘डॅझलिंग स्टार’ म्हणजेच ‘चमकणारे तारे’ ही होती. महोत्सवाचा प्रारंभ प्राध्यापक आणि माजी विद्यार्थी यांच्या हस्ते आकाशात फुगे सोडून झाला. ‘वाद्यवृंद’ (ऑकेस्ट्रा) हा यंदाच्या महोत्सवाचे प्रमुख आकर्षण ठरला. सिंड्रेला चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक  किरण नाकती तसेच ‘ही पोरी साजूक तुपातली’ या गाण्याचे वाजंत्री यावेळी उपस्थित होते.

महाविद्यालयाचे डॅझलिंग स्टार म्हणजेच विद्यार्थी या महोत्सवात सहभागी झाले होते. विद्यार्थ्यांनी ७०-८० च्या दशकातील गाण्यांचे सादरीकरण केले. महाराष्ट्राची लोकधारा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या लावण्याही यावेळी सादर करण्यात आल्या. भारत हा वैविध्यपूर्ण देश असून अनेक जाती-धर्माचे लोक देशात राहतात. महोत्सवातील ‘मेड इन इंडिया’ या संकल्पनेवर आधारित फॅशन शोच्या निमित्ताने वैविध्यतेचा संदेश विद्यार्थ्यांनी दिला. महोत्सवात पारंपरिक नृत्य प्रकारापासून ते पाश्चिमात्त्य नृत्यप्रकारापर्यंत विविध नृत्याविष्कार सादर करण्यात आले. महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांतर्फे सादर करण्यात आलेल्या सतार आणि तबल्याच्या जुगलबंदीने महोत्सव कलामय होऊन गेला.