शॉपिग, सहल, मित्र-मंडळींसोबत केली जाणारी धमाल याबरोबरच अनेकजण आता दिवाळीनिमित्त वंचितांच्या जीवनात आनंद निर्माण करण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. महाविद्यालयीन तरुणही त्याला अपवाद नाहीत. यंदाच्या दिवाळीतही विविध सेवाभावी उपक्रमात सहभागी होत तरुणांनी सामाजिक भान जपण्याचा समंजसपणा दाखविला आहे. अशाच काही उपक्रमांचा हा वृत्तान्त.. 

निर्मलच्या नातवंडांची अनोखी भेट

वृद्ध आई-वडिलांची जबाबदारी घ्यायला नकार देत अनेक मुले आपल्या आई-वाडिलांना वृद्धाश्रमाची वाट दाखवतात. या वृद्धांना कुटुंबापासून वेगळे राहून वृद्धाश्रमाच्या पिंजऱ्यात एकटेपणाचे जीवन जगावे लागते. आता अनेक तरुणांचे समूह दिवाळीनिमित्त वृद्धाश्रमात जाऊन दिवाळी साजरी करू लागले आहेत. गोवेली येथील निर्मल इंग्रजी माध्यम शाळेतील विद्यार्थ्यांनी कल्याण तालुक्यातील खडवली येथील मातोश्री वृद्धाश्रमास भेट देऊन तेथील आजी-आजोबांसोबत दिवाळी साजरी केली. विद्यार्थ्यांनी वृद्धाश्रमात कंदील आणि पणत्या लावल्या. शंभर वृद्धांना फराळ म्हणून फळांचे वाटप केले. वृद्धाश्रमातील वृद्धांच्या मनोरंजनासाठी विद्यार्थ्यांनी सांस्कृतिक कार्यक्रमाचे सादरीकरण केले. याप्रसंगी आजी-आजोबांनी विद्यार्थ्यांसोबत मन मोकळेपणाने गप्पा मारल्या व गोष्टी सांगितल्या. यावेळी वृद्धांनी आपल्या भावना व्यक्त करताना ही वृद्धाश्रमे बंद व्हावीत व आम्हाला आमचे घर मिळावे ही अपेक्षा व्यक्त केली. सर्व सुख मिळूनही हे आयुष्य एखाद्या बंद पिंजऱ्याप्रमाणे आहे. मात्र दिवाळी सणाच्या मुहूर्तावर आमची नातवंडे आम्हाला भेटली, अशीही त्यांची प्रतिक्रिया होती.

(प्रशांत घोडविंदे )

 

चिमुरडय़ांची दिवाळी उत्साहात

डोंबिवली शहर आणि परिसरातील गाव-खेडय़ांत दिवाळी सण नेहमीप्रमाणे साजरा केला जातो. मात्र हातावर पोट असणाऱ्या गरीब आणि वंचितांच्या जीवनात मात्र कधीच दिवाळी येत नाही. फराळ व फटाके वाटपाच्या माध्यमातून त्यांच्या जीवनातील अंधार दूर करण्याचा प्रयत्न मंजुनाथ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी यंदा केला. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेच्या स्वयंसेवकांनी हा उपक्रम राबवला. डोंबिवलीतील मंजुनाथ महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवक दिवाळीच्या आधी ठाकुर्ली येथील महानगरपालिकेच्या शाळेत गेले. या स्वयंसेवकांनी जमलेल्या सर्व मुलांना फटाके व फराळ वाटप केले. भेटवस्तू मिळाल्यावर लहान मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद पाहून खऱ्या अर्थाने दिवाळी साजरी झाल्याचे समाधान स्वयंसेवकांना मिळाले. या कार्यक्रमाला राष्ट्रीय सेवा योजनेच्या कार्यक्रम अधिकारी नीशा देवधर, पुष्कर देशपांडे तसेच ठाकुर्ली येथील महानगरपालिकेच्या शिक्षकांसह सर्व स्वयंसेवकांनी मोलाचा हातभार लावला.

टेक्नोसॅव्हीपिढीचे सामाजिक भान

तरुणाई ही इंटरनेटच्या आहारी जात आहे, असा आरोप ज्येष्ठांकडून अनेकदा केला जातो. मात्र टेक्नॉसॅव्ही असलेली ही नवी पिढी मनात सामाजिक भानही जपते. राज निंबाळकर, प्रशांत जाधव, निखिल देसले आणि विकास घुगे या चार महाविद्यालयीन मित्रांनी घरदार नसलेल्या रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसोबत दिवाळी साजरी करून तरुणांसमोर आदर्श निर्माण केला.   राज निंबाळकर या तरुणाने या उपक्रमात पुढाकार घेतला. व्हॉटस् अ‍ॅप ग्रुप बनवून त्याने इतर मित्रांना त्याची इच्छा सांगितली.

त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. तीन मित्रांच्या मदतीने त्याने आपले नातेवाईक, शेजारी व ओळखीच्या लोकांकडून न वापरात असणारे असे निरनिराळे कपडे जमवले.  त्यानंतर या चार मित्रांनी आपल्या स्वत:च्या पॉकेटमनीमधून जमा केलेल्या पैशांतून पेन्सिल बॉक्स, शार्पनर, वह्य़ा यासारख्या अनेक अभ्यासासाठी उपयुक्त गोष्टी तसेच बिस्कीटचे पुडे या खरेदी केले. आपले नातेवाईक, शेजारी यांच्याकडून फराळ जमवला. सर्व कपडे ,स्टेशनरी व फराळ या सर्व वस्तू या चार मित्रांनी तीन हात नाका, नितीन कंपनी, वसंत विहार-हनुमान मंदिर यासारख्या गर्दीच्या ठिकाणी पदपथांवर राहणाऱ्या गरीब कुटुंबांना व लहान मुलांना  देऊ  केल्या. तसेच भाऊबिजेच्या दिवशी या चार मित्रांनी टुथ ब्रश ,साबण ,टॉवेल यासारख्या गरजेच्या गोष्टी या कुटुंबाला देऊ  केल्या. या मुलांनी पदपथांवर राहणाऱ्या या गरीब लहान मुलींसोबत आपली भाऊबीज साजरी केली. ‘दिवाळी सण हा प्रत्येकासाठी वेगळा असतो. मात्र हजारो रुपयांचे फटाके वाजवून प्रदूषण करून क्षणिक आनंद मिळवण्यापेक्षा या लहान लहान मुलींच्या हातून झालेली भाऊबीज ही आयुष्यभरासाठी आनंद देणारी असते’ असे मत राज या तरुणाने व्यक्त केले.

(हृषीकेश मुळे)

 

ऐन दिवाळीत परीक्षेचे ओझे

ठाणे : सर्वसाधारणपणे सहामही परीक्षा संपल्यावर दिवाळीची सुट्टी लागते. मात्र यंदा महाविद्यालीन विद्यार्थ्यांचे सहामाही परीक्षेचे काही पेपर बाकी असल्याने दिवाळीच्या आनंदावर काहीसे विरजण पडले आहे. एकीकडे दिवाळीची मजा करीत असताना त्यांच्या मनावर अभ्यासाचे ओझे कायम आहे.  मुंबई विद्यापीठाच्या सतत बदलत राहणाऱ्या परीक्षांच्या वेळापत्रकाचा फटका विद्यार्थ्यांना बसतो. दिवाळीच्या नंतर लगेचच काही अभ्यासक्रमाच्या परीक्षा तोंडावर आल्याने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची तारांबळ होताना दिसत आहे. याशिवाय यंदा प्रथम वर्षांच्या परीक्षाही विद्यापीठाच्या अंतर्गत होत असल्याने विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबतच या परीक्षांचे दडपण दिसून येत आहे. प्रथम वर्ष बीएमएस अभ्यासक्रमाच्या परीक्षा दिवाळीनंतर त्वरित होणार असल्याने या विद्यार्थ्यांकडून दिवाळी साजरी करण्याचा उत्साह कमी दिसून आला. दिवाळी म्हटल्यावर पूर्वी सुट्टीचा मनमुराद आनंद लुटायचा असे समीकरण होते. दिवाळीची मोठी सुट्टी म्हटल्यावर सहलींचा विचार पालक आणि विद्यार्थ्यांकडून व्हायचा. मात्र सुट्टीनंतर परीक्षांना सामोरे जावे लागणार असल्याने तरुणांना सुट्टीच्या बेतावर पाणी सोडावे लागले आहे. दिवाळी साजरी केली, मात्र अभ्यासाचे दडपण होते. त्यामुळे दिवाळी पहाटच्या दिवशीसुद्धा केवळ काहीजणांनी कार्यक्रमाला हजेरी लावून घरी बसून अभ्यास करणे पसंत केले, असे पूर्वा जाधव हिने सांगितले.