नागरिकांच्या विरंगुळय़ासाठी उभारण्यात आलेल्या ठाणे शहरातील उद्यानांची देखभाल आणि देखरेखीअभावी वाताहत होत असल्याचे दिसून आले आहे. पुरेसा कर्मचारीवर्ग आणि निधी नसल्याने उद्यानांची दुरवस्था होत असल्याचे लक्षात आल्याने ठाणे महापालिकेने आता या कामी शहरातील महाविद्यालयांच्या वनस्पतीशास्त्राच्या विद्यार्थ्यांची मदत घेण्याचे ठरवले आहे.  यासाठी सर्वप्रथम ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयासोबत प्रायोगिक पातळीवर उपक्रम राबवण्यात येत आहे.
ठाणे शहरातील अनेक उद्यानांची देखरेखीअभावी दुरवस्था झाली आहे. उद्यानांची प्रवेशद्वारे मोडून पडणे, सुरक्षारक्षक नसणे, खेळणी तसेच बसण्याच्या साहित्याची नासधूस असे चित्र शहरातील अनेक उद्यानांमध्ये दिसते. त्यामुळे आता उद्यानांची जबाबदारी महाविद्यालयांकडे सोपविण्याचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
या उपक्रमांतर्गत शहरातील महाविद्यालयांतील वनस्पतीशास्त्र विभागांकडे उद्यानांची जबाबदारी सोपवण्यात येईल. या विभागाचे प्राध्यापक तसेच विद्यार्थी यांना वनस्पतीशास्त्राचा अभ्यास तसेच संशोधन करण्यासाठी या उद्यानांचा उपयोग होईलच, परंतु त्याचबरोबर उद्यानांतील हिरवाई समृद्ध होण्यातही मदत होईल, असा या उपक्रमामागील हेतू आहे.
या उपक्रमाची सुरुवात ठाण्यातील ज्ञानसाधना महाविद्यालयापासून झाली आहे. या महाविद्यालयाच्या बाहेरील बाजूस असलेले उद्यान संवर्धनासाठी देण्यात आले आहे. त्यानुसार महाविद्यालयातील वनस्पती विभागामध्ये आता उद्यान कक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती ज्ञानसाधना महाविद्यालयाच्या वनस्पती विभागप्रमुख सरिता हजरनीस यांनी दिली. येथील उद्यानामध्ये काही भागात औषधी वनस्पती, प्रयोग करण्यासाठी लागणाऱ्या वनस्पतींची लागवड करण्यात येणार आहे. तसेच ठाणे शहर परिसरातील शाळांच्या मुलांना लहानशी विज्ञान सहल घडविण्यात येईल, अशा प्रकारचे उद्यान भविष्यात तयार करणार असल्याचे हजरनीस यांनी सांगितले. त्याचप्रमाणे येथील काही भागात ‘फूलपाखरू उद्यान’ही तयार करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.