जोशी-बेडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन व माध्यम विभागाचा ‘क्रिसलीस’ आंतरमहाविद्यालयीन महोत्सव नुकताच झाला. शेकडो विद्यार्थ्यांच्या उपस्थितीत ‘जागरूकता’ या दैनंदिन जीवनातील संकल्पनेवर हा महोत्सव आधारलेला होता. आपल्याला नेहमीच जागरूक राहावे लागत असते, अशी या महोत्सवाची संकल्पना होती. या विषयाचा वेध घेण्याचा प्रयत्न या महोत्सवाच्या माध्यमातून करण्यात आला.  
हृदयरोगतज्ज्ञ डॉ. विजय सुराशे यांच्या अवयवदानाचे महत्त्व सांगणाऱ्या व्याख्यानाने महोत्सवाची सुरुवात झाली. तसेच विमा या विषयाबद्दल विद्यार्थ्यांना माहिती व्हावी, याकरिता ‘क्रिसइन्शुरन्स’ या स्पर्धेचे, तर tv10उत्तम व्यवस्थापन वाढीस लागावे या हेतूने ‘मॅनेजमेंट गुरू’ या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अकाऊंट आणि अर्थशास्त्र हे विषय शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ‘अकाऊंट मार्केट’ आणि माध्यम विभागाच्या विद्यार्थ्यांसाठी लघुपट, माहितीपट व जाहिरातपट याविषयांवर मार्गदर्शन करण्यात आले. ‘फोटोग्राफी’ या विषयावर मान्यवर छायाचित्रकारांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. महाविद्यालयाच्या माध्यम विभागातर्फे प्रकाशित होणाऱ्या ‘ऋत’ या वृत्तपत्राचे प्रकाशन ठाणे वाहतूक शाखेच्या पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सामाजिक कार्यकर्त्यां अ‍ॅड. जाई वैद्य यांच्या हस्ते करण्यात आले. यंदाचे ‘ऋत’ हे वृत्तपत्र ‘स्त्री सबलीकरण व स्त्री सक्षमीकरण’ या विषयावर आधारित असून यामध्ये मुंबई विद्यापीठाच्या माजी कुलगुरू स्नेहलता देशमुख, प्राचार्या डॉ. शकुंतला सिंह, वाहतूक पोलीस उपायुक्त डॉ. रश्मी करंदीकर, सुमेधा बेडेकर, मंगला नारळीकर, ज्येष्ठ समाजसेविका मेधा पाटकर, जान्हवी राऊळ आणि सरुबाई वाघमारे अशा विविध क्षेत्रांतील आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या महिलांच्या मुलाखती घेण्यात आल्या आहेत. बालकल्याण समितीच्या कार्यकर्त्यां अ‍ॅड.मनीषा तळपुळे व समतोल फाऊंडेशनचे प्रमुख विजय जाधव यांनी बाल गुन्हेगारी, बाल कामगार, लैंगिक शोषण व पुनर्वसन या विषयावर चर्चासत्राच्या माध्यमातून आपली मते मांडली. ‘सत्यामेव जयते’ या कार्यक्रमाचे संशोधन प्रमुख लेन्सी फर्नाडिस यांनीही विद्यार्थ्यांसोबत आपल्या भावना व्यक्त केल्या.   

आर्थिक क्षेत्रातील नवे कल
ठाणे : बदलत्या जगासोबत अर्थक्षेत्रातील कलही बदलत जातो. त्याकडे लक्ष वेधण्यासाठी ठाण्यातील डॉ. व्ही. एन. बेडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापकीय विभागातर्फे शनिवारी आर्थिक क्षेत्रातील कल या विषयावरील राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. ही परिषद महाविद्यालयाच्या थोरले बाजीराव पेशवे सभागृहात सकाळी ९.३० वाजता सुरू होणार आहे. सॉफ्टएक्सल कन्सल्टन्सीचे व्यवस्थापकीय संचालक अच्युत गोडबोले या परिषदेचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. भारतीय अर्थव्यवस्था, बँकेचे व्यवहार, भांडवल बाजार, कॉर्पोरेट मूल्य आणि संपत्ती व्यस्थापन या विषयामधील नवीन कलांवर या परिषदेत मार्गदर्शन केले जाईल. वाधवान ग्लोबल कॅपिटलचे मिलिंद सर्वते, ग्लोबल मार्केट बिझनेस सर्विसेसचे नित्यानंद भांगले, वेल्थ मॅनेजरचे संचालक भारत फाटक, ग्लोबल ट्रेड कन्सल्टन्सीचे किशोर प्रधान आणि बेडेकर महाविद्यालयाच्या व्यवस्थापन विभागाचे संचालक डॉ. गुरुप्रसाद मूर्ती हे या परिषदेला उपस्थित राहतील.

पदव्युत्तर शिक्षण आवश्यकच :  डॉ. पी. डी. शिंदे
ठाणे : प्रत्येक विद्यार्थ्यांने पदवी शिक्षण घेऊन न थांबता पदव्युत्तर शिक्षण घेणे गरजेचे आहे, तसेच प्रत्येक विद्यार्थ्यांने आपल्या कुटुंबात व समाजात जबाबदारीने वागले पाहिजे, असे आवाहन डॉ. पी. डी. शिंदे यांनी २ फेब्रुवारी रोजी ठाण्यातील वागळे इस्टेट येथील कर्मवीर भाऊराव पाटील वरिष्ठ महाविद्यालयाच्या प्रथम पदवीदान समारंभादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात केले. या समारंभास प्रमुख अतिथी म्हणून मुंबई विद्यापीठाचे सदस्य महादेव जगताप यांनी मुलांना स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन करत या परीक्षा देण्यासाठी प्रोत्साहित केले. शैक्षणिक वर्ष २०१३-१४ मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना पदवी वितरण करताना ते बोलत होते. विद्यार्थ्यांनी सतत नवे शिकण्याची गरज असून योग्य त्या गोष्टींसाठीच सोशल मीडियाचा वापर करावा, असे मत संस्थेचे अध्यक्ष सचिन मोरे यांनी व्यक्त केले.

आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कमतरता – गिरीश प्रभुणे
बदलापूर : आधुनिक शिक्षण पद्धतीमध्ये कमतरता असून प्राचीन भारतीय कलांचे शाश्वत स्वरूप डोळ्यापुढे ठेवून शिक्षण पद्धतीमध्ये बदल करणे आवश्यक असल्याचे मत ज्येष्ठ समाजसेवक गिरीश प्रभुणे यांनी व्यक्त केले. ते आदर्श कला व वाणिज्य महाविद्यालयातर्फे आयोजित प्राचीन भारतीय शिक्षणाचा वसा आणि वारसा या विषयावर आयोजित व्याख्यानात बोलत होते. भारतीय कलांच्या पुनरुज्जीवनाची आवश्यकता असून प्राचीन भारतीय शिक्षणव्यवस्था ही वैज्ञानिकदृष्टय़ा योग्य होती आणि या व्यवस्थेचा भारतीय संस्कृतीशी योग्य मेळ घातला गेला होता. या व्यवस्थेने भारतीयत्व जपले होते. त्यामुळे या विज्ञानावर आधारलेल्या शिक्षणव्यवस्थेकडून शिकण्यासारखे बरेच काही असून त्याचा आधुनिक शिक्षण पद्धतीने अंगीकार केला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या वेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैदेही दप्तरदार व संस्थेचे विश्वस्त आदी मान्यवर उपस्थित होते.

प्रगती महाविद्यालयात जल्लोष साजरा
डोंबिवली : विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या कलागुणांना वाव मिळावा, त्यांचा आत्मविश्वास वाढावा या उद्देशाने प्रगती महाविद्यालय माजी विद्यार्थी असोसिएशनच्या वतीने ‘जल्लोष-२०१५’चे आयोजन शनिवारी करण्यात आले होते. या कार्यक्रमात आजी व माजी विद्यार्थी मोठय़ा संख्येने सहभागी झाले होते. या वेळी पोलीस निरीक्षक मोहन खंदारे व माजी नगराध्यक्ष आबासाहेब पटवारी यांसह संघटनेचे अध्यक्ष डॉ. अशोक महाजन, उपाध्यक्ष विश्वनाथ बिवलकर, राहुल नाले आदी मान्यवर उपस्थित होते. मोहन खंदारे यांनी या वेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना तुमच्या नावातच प्रगती असून संस्थेला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवा, असे सांगितले, तर पटवारी यांनी संघटनेमार्फत तुम्ही अनेक चांगल्या सामाजिक बांधीलकी जपणाऱ्या गोष्टी करू शकता, असे सांगितले.

स्वप्ने प्रत्यक्षात आणणे गरजेचे : नरेश चंद्र
भिवंडी : ‘आपल्याकडे भरपूर क्षमता आहे. मोठी स्वप्ने बघा आणि ती प्रत्यक्षात आणा. कठोर परिश्रम करून आपला खूप विकास होईल. आपल्या महाविद्यालयाचे अस्तित्व विद्यापीठात जाणवले पाहिजे, नावलौकिक मिळविला पाहिजे आणि तो तुम्हाला नक्कीच मिळेल,’ असे मत मुबंई विद्यापीठाचे प्र-कुलगुरू नरेश चंद्र यांनी व्यक्त केले. पडघा येथील छत्रपती शिक्षण मंडळाच्या कला वाणिज्य महाविद्यालय येथे आयोजित वार्षिक पारितोषिक वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या वेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. अशोक प्रधान, संस्थेचे कार्यकारी अध्यक्ष प्रा. एन. के. फडके, प्रा. डॉ. सिन्नरकर, विद्यार्थी प्रतिनिधी नमिता शेलार आणि पडघा गावच्या सरपंच अपेक्षा महाजन उपस्थित होत्या. महाविद्यालयात रांगोळी व महाराष्ट्रातील किल्ले यांच्या माहितीपर चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी श्रद्धाळू व्हायला हरकत नाही, परंतु अंधश्रद्धाळू नको, असे आवाहन प्रा. अशोक प्रधान यांनी या कार्यक्रमाच्या दरम्यान केले. विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवायला हवी, त्याचप्रमाणे त्यांनी आत्मसात केलेले ज्ञान आचरण्यात आणण्याची गरज आहे, असे प्रधान यांनी सांगितले.