आयुक्तांचा अधिकाऱ्यांना इशारा
पावसाळा तोंडावर आल्याने ठाणे महापालिकेत आपत्ती-व्यवस्थापनाची लगबग सुरू झाली असून शहरातील विविध भागांतील पूरस्थिती आणि आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी आयुक्त संजीव जयस्वाल यांनी अधिकाऱ्यांची फळी तयार केली आहे. या व्यवस्थापन समितीची जबाबदारी दोन्ही अतिरिक्त आयुक्तांवर सोपविण्यात आली असून महापालिकेतील इतर वरिष्ठ अधिकारी सतत या कामात व्यस्त राहतील, असे आदेश देण्यात आले आहे. आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना कारावासाची शिक्षाही होऊ शकते, असा इशाराही आयुक्तांना दिला असून मुसळधार पाऊस सुरू होताच एकाही अधिकाऱ्याने भ्रमणध्वनी बंद ठेवल्यास त्यावर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.
ठाणे, कळवा आणि मुंब्रा या शहरांमध्ये धोकादायक इमारतींची संख्या मोठी असून यादी जाहीर करूनही पुरेशा प्रमाणात इमारती रिकाम्या करण्यात महापालिका प्रशासनाला यश मिळालेले नाही. दर वर्षी पावसाळ्यात शहरात इमारत कोसळून एखादी तरी दुर्घटना घडते असा अनुभव आहे. त्यामुळे महापालिकेने आपत्कालीन परिस्थितीस सामोरे जाण्यासाठी युद्धपातळीवर उपाययोजना हाती घेतल्या असून संकटाचा सामना करण्यासाठी अधिकाऱ्यांची मोठी फळी तयार केली आहे. एखाद्याने कामचुकारपणा केला तर त्याला कायद्यानुसार एक वर्षांपर्यंत कारावास होऊ शकतो, असा इशारा जयस्वाल यांनी दिला आहे.
ठाणे महापालिकेतील आपत्ती-व्यवस्थापन कक्ष हा जिल्ह्य़ातील इतर महापालिकांच्या तुलनेत अधिक सक्षम मानला जातो. यंदाही हा विभाग सर्व तयारीनिशी सज्ज झाला आहे. आपत्तीचा सामना करण्यासाठी महापालिका आयुक्तांनी प्रथमच अधिकाऱ्यांची वेगवेगळ्या गटांमध्ये फळी तयार केली आहे. या गटांचे नियंत्रण अधिकारी म्हणून अतिरिक्त आयुक्त सुनील चव्हाण आणि अशोक रणखांब यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे. तसेच समन्वय अधिकारी म्हणून संजय निपाणी, संदीप माळवी, ओमप्रकाश दिवटे, मनीष जोशी, अशोक बुरपुल्ले, संजय हेरवाडे या उपायुक्तांसह, रतन अवसरमोल (नगर अभियंता), प्रदीप गोहील (सहा. नगररचनाकार), प्रकाश कोळेकर (मुख्य लेखापरिक्षक), सुधीर नाकाडी (मुख्य लेखा व वित्त अधिकारी), अनिल पाटील (अति. नगर अभियंता), सुधीर राऊ त (परिवहन व्यवस्थापक) यांसारख्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. या अधिकाऱ्यांनी एखाद्या वेळेस आपत्ती घडल्यास आपत्ती कक्षात ठरवून दिलेल्या वेळेनुसार हजर राहावे, अशा सूचना करण्यात आल्या आहेत. तसेच त्यांच्या मदतीला सहकारी अधिकारी म्हणून ठरवून दिलेल्या वेळेनुसार इतर अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. नेमून दिलेल्या दिवशी तसेच वेळेत आपत्ती-व्यवस्थापन कक्षात हजर राहणे अपेक्षित असून या आदेशाचे पालन न केल्यास संबंधित अधिकाऱ्यांच्या विरोधात आपत्ती-व्यवस्थापन कायदा – २००५ अन्वये कारवाई केली जाईल, असा इशारा आयुक्त संजीव जयस्वाल यांनी दिला आहे. या कायद्यानुसार एक वर्षांपर्यंत कारवास होऊ शकतो, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पालिकेचे आवाहन
नागरिकांनी आपत्तीच्या काळात १८००२२२१०८ या टोल फ्री क्रमांकावर अथवा २५३७१०१०, २५३९९८२८, २५३७४५७८-८२, २५३९२३२३ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहन महापालिकेच्या जनसंपर्क विभागाने केले आहे.