News Flash

ठाणे काँग्रेसमधील फूट चव्हाटय़ावर

आंदोलनावरून दोन गटांची परस्परविरोधी भूमिकाखास

(संग्रहित छायाचित्र)

आंदोलनावरून दोन गटांची परस्परविरोधी भूमिकाखास

ठाणे : एकीकडे शिवसेना-भाजपच्या वाढत्या वर्चस्वामुळे मरगळलेल्या अवस्थेत असलेल्या ठाणे शहर काँग्रेसला पक्षांतर्गत मतभेदांचेही ग्रहण लागले आहे. ठाणे विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढवू इच्छिणारे माजी पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे यांनी सोमवारी पत्रकार परिषद घेऊन महापालिकेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांच्या चौकशीसाठी महामोर्चा व साखळी उपोषण करण्याचे जाहीर केल्यानंतर अवघ्या काही तासांत पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांनी पत्रक काढून या आंदोलनाचा काँग्रेसशी संबंध नसल्याचे जाहीर केले. त्यामुळे निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे समोर येत आहे.

माजी पोलीस अधिकारी रवींद्र आंग्रे हे ठाणे शहर विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर निवडणूक लढण्यास इच्छुक असून त्यासाठी त्यांनी तयारीही सुरू केली आहे. या तयारीचा एक भाग म्हणून सोमवारी त्यांनी एक पत्रकार परिषद घेतली. ठाणे महापालिकेत भ्रष्टाचार केलेल्या अधिकाऱ्यांची सीआयडी आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत चौकशी करण्याच्या मागणीसाठी महामोर्चा आणि साखळी उपोषण सुरू करण्यात येणार असल्याचे ते म्हणाले. या मोर्चात राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या पत्रकार परिषदेनंतर लगेचच काँग्रेस पक्षाचे ठाणे शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यावतीने सरचिटणीस महेंद्र म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रक काढून हा मोर्चा ठाणे काँग्रेसप्रणीत नसून त्यास पाठिंबा नसल्याचे स्पष्ट केले. ‘या मोच्र्याशी ठाणे काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते यांचा दुरान्वये संबंध नसून हा पक्षीय कार्यक्रमसुद्धा नाही. त्यामुळे आंग्रे यांनी आयोजित केलेल्या मोर्चा आणि उपोषण कार्यक्रमांमध्ये कार्यकर्त्यांनी सामील होऊ नये,’ असे म्हात्रे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. त्यामुळे महापालिकेविरोधातील मोच्र्यावरून काँग्रेसमध्ये दोन गट पडल्याचे चित्र आहे.

रवींद्र आंग्रे यांनी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याविरोधात एकतर्फी निर्णय घेऊन मोर्चा आणि उपोषण कार्यक्रमाचे आयोजन केले असून त्यासाठी शहराध्यक्ष मनोज शिंदे यांना विश्वासात घेण्यात आलेले नाही.  याऐवजी गेली २५ वर्षे सत्तेत असलेल्या शिवसेना-भाजपच्या निष्क्रिय कामाकाजाविरोधात करायला हवे होते.

– काँग्रेसच्या पत्रकातील खुलासा

ठाणे महापालिकेविरोधात मोर्चा काढण्यापूर्वी प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, कोकण प्रभारी बी. एम. संदीप आणि ठाण्याचे प्रभारी राजेश शर्मा यांच्यासोबत चर्चा झाली होती. तसेच शहराध्यक्ष मनोज शिंदे यांच्यासोबतही याबाबत चार वेळा चर्चा झाली होती. 

– रवींद्र आंग्रे, काँग्रेस, ठाणे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 27, 2019 2:56 am

Web Title: thane congress divided zws 70
Next Stories
1 बेकायदा कचराभूमीप्रकरणी  उल्हासनगर महापालिकेला नोटीस
2 पुण्यतिथी विशेष: ‘ठाण्याचे बाळासाहेब ठाकरे’ अशी ओळख असणाऱ्या आनंद दिघेंबद्दलच्या खास गोष्टी
3 ठाण्यात गोंगाट घटला
Just Now!
X