पुनीत शृंगी, जय मुखी, किशोर राठोड यांनी गुजरातसह परदेशांत जाळे विणल्याचा संशय
नशा करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ‘इफ्रेडीन’ पावडरच्या तस्करीचा मोठा भांडाफोड केल्यानंतर अमली पदार्थाचे जाळे गुजरातसह थेट परदेशात विणणाऱ्या तीन सूत्रधारांचा शोध ठाणे पोलिसांनी सुरू केला आहे.
पुनीत शृंगी, जय मुखी आणि किशोर राठोड अशी या तिघांची नावे असून यापैकी किशोर हा गुजरातमधील माजी आमदाराचा मुलगा असल्याचे समजते. ‘इफ्रेडीन’ तस्करीची साखळी महाराष्ट्रासह गुजरातमध्ये या तिघांनीच तयार केल्याची माहिती पोलीस तपासात पुढे आली आहे. वर्षभरात तीस वेळा आफ्रिकेतील महत्त्वाच्या देशांमध्ये परदेश दौरे करत ‘इफ्रेडीन’ आणि ‘मेथएमफेटामाइन’ या अमली पदार्थाची परदेशातही तस्करी केल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. यासंबंधीचे आणखी धागेदोरे पुढील चौकशीनंतर स्पष्ट होतील, अशी माहिती ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी दिली.
कर्करोग तसेच श्वसन विकारासंबंधीच्या औषधांमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘इफ्रेडीन’ पावडरचा वापर नशेसाठी होत असल्याची बाब ठाणे पोलिसांच्या कारवाईतून पुढे आली. या प्रकरणाच्या तपासादरम्यान पोलिसांनी पाच जणांना अटक करत सोलापूरमधील एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीत धाड टाकली होती. या धाडीदरम्यान कंपनीत मोठय़ा प्रमाणात ‘इफ्रेडीन’ पावडरचा बेकायदेशीर साठा पोलिसांना सापडला होता. तसेच पोलिसांनी अटक केलेल्या पाच आरोपींमध्ये कंपनीतील वरिष्ठ व्यवस्थापक राजेंद्र डिमरी आणि अधिकारी धानेश्वर स्वामी या दोघांचाही समावेश आहे. या पाच जणांच्या अटकेनंतर या प्रकरणातील मुख्य सूत्रधार वेगळेच असल्याचे तपासात पुढे आले आहे.
एव्हॉन लाइफ सायन्सेस लिमिटेड कंपनीमध्ये पुनीत हा अधिकृत कामगार असल्याची नोंद कुठेही सापडलेली नाही, मात्र कंपनी व्यवस्थापनाने खास ‘इफ्रेडीन’ पावडरच्या तस्करीसाठी त्याला अनधिकृतपणे नेमले होते. गुजरातमधील किशोर आणि जय हे दोघे त्याचे मित्र आहेत. त्यांच्या मदतीनेच त्याने महाराष्ट्रासह गुजरातमध्ये इफ्रेडीनच्या नशेचा व्यापार करीत आहे. काही दिवसांपूर्वी पुनीतने शंभर किलो इफ्रेडीनचा साठा कंपनीतून विक्रीसाठी नेल्याचेही पुढे आले आहे, असेही आयुक्त परमबीर सिंग यांनी सांगितले. गेल्या वर्षभरामध्ये तिघांनी तीस वेळा परदेश दौरे केले असून त्यामध्ये नायजेरिया तसेच आफ्रिकेतील देशांमध्ये सर्वाधिक दौरे केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे परदेशातील ‘इफ्रेडीन’ आणि त्यापासून तयार केला जाणाऱ्या ‘मेथएमफेटामाइन’ या अमली पदार्थाची तस्करी हे तिघेच करत असल्याचाही संशय आहे. हे तिघे फरार असून त्यांचा शोध घेण्याचे काम सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले. तसेच एॅव्हान कंपनीत सापडलेल्या इफ्रेडीनच्या बेकायदेशीर साठय़ाप्रकरणी कंपनीच्या मालकाला नोटीस पाठविण्यात आली असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. याशिवाय, कंपनी व्यवस्थापनातील आणखी कोणाचा या प्रकरणात सहभाग आहे का, याचाही तपास करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.