कुष्ठरुग्ण वसाहतीतील नागरिकांचे लसीकरण

ठाणे :  ठाणे शहरात कोणताही नागरिक लशीपासून वंचित राहू नये यासाठी महापालिकेच्या माध्यमातून फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्यात आले. कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण  वसाहतीतील नागरिकांना या फिरते लसीकरण केंद्राच्या माध्यमातून लसीकरण करण्यात आले. त्यास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरण केंद्रावर जाऊन लस घेणे जिकिरीचे होत असून अनेक नागरिक यापासून वंचित राहत होते. तसेच काही नागरिकांकडे ओळखपत्र उपलब्ध नसल्यामुळे त्यांच्या लसीकरणात बाधा निर्माण होत होती. ही समस्या दूर करण्यासाठी महापौर नरेश म्हस्के यांनी फिरते लसीकरण केंद्र सुरू करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. यासंबंधीचा प्रस्ताव प्रशासनाने तयार केला होता. त्यास महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी मान्यता दिली.

 

या मोहिमेअंतर्गत कोपरी येथील महात्मा गांधी कुष्ठरुग्ण वसाहतीमध्ये ६० वर्षावरील नागरिकांचे लसीकरण करण्यात आले तसेच कुष्ठरुग्णांना विशेष दिव्यांग म्हणून मान्यता असल्याने येथील ४५ वर्षांवरील नागरिकांनासुद्धा लस देण्यात आली. ही मोहीम अधिक प्रभावीपणे राबवून सर्व विभागांतील ६० वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण झाल्यास निश्चितच करोनावर अधिक जलदगतीने मात करू, असा विश्वास महापौर नरेश म्हस्के यांनी यावेळी व्यक्त केला.

पालिकेने राबविलेल्या या लसीकरण मोहिमेमध्ये ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग व्यक्ती, विशेष व्यक्तींनी सहभागी व्हावे तर काही व्याधींनी अंथरुणावर असलेल्या व्यक्तींचे त्यांच्या नातेवाईकांनी लसीकरण करून घ्यावे, असे आवाहनही महापौर यांनी यावेळी नागरिकांना केले. महापालिकेच्या वैद्यकीय अधिकारी डॉ. खुशबू टावरी या यावेळी उपस्थित होत्या.