पाचशे दिवसांवरून १८३ दिवसांवर; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तीन टक्क्यांनी घसरले

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये तीन महिन्यांपूर्वी करोना रुग्णदुपटीचा कालावधी पाचशे दिवसांवर पोहोचला होता. गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत वाढ होऊ लागल्याने रुग्णदुपटीचा कालावधी आता १८३ दिवसांवर आला आहे. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क््यांवरून ९४ टक्क्यांवर आले आले असून यामध्ये तीन टक्क््यांनी घट झाल्याचे चित्र आहे. याशिवाय आठवड्याचा रुग्णवाढीचा वेग ०.१९ टक्क््यांवरून ०.४१ टक्क््यांवर आला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत ६५ हजार ५४४ करोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी ६१ हजार ७०६ (९४.१४) रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. सद्य:स्थितीत शहरात २ हजार ४८७ रुग्ण उपचार घेत आहेत, तर १ हजार ३५१ रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला आहे. गेले तीन महिने शहरात दररोज सरासरी ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. शहरात आता दररोज सरासरी तीनशेहून अधिक रुग्ण आढळून येत आहे. रुग्णसंख्येत वाढ झाल्यामुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही घटले आहे. काही दिवसांपूर्वी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्क््यांवर होते. मात्र रुग्णसंख्येत वाढ झाल्याने ते आता ९४ टक्क््यांवर आल्याचे दिसून येत आहे, तर आठवड्याचा रुग्णवाढीचा वेग ०.१९ टक्के होता. मात्र, तो आता ०.४१ टक्क््यांवर आला आहे. ठाणे शहरामध्ये दररोज चार ते साडेचार हजार करोना चाचण्या केल्या जात असून त्यात रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ५.५९ टक्के आहे. गेले तीन महिने रुग्णसंख्या कमी होती. या कालावधीत रुग्णदुपटीचा कालावधी पाचशे दिवसांच्या पुढे गेला होता. त्यामुळे रुग्णदुपटीचा कालावधीची नोंद करणे पालिकेने बंद केले होते. मात्र, आता रुग्णसंख्या वाढू लागल्याने पालिकेने रुग्णदुपटीचा कालावधीची नोंद करण्यास सुरुवात केली आहे. त्यानुसार ७ मार्चला रुग्णदुपटीचा कालावधी २५४ दिवस होता, तर १४ मार्चला रुग्णदुपटीचा कालावधी १८३ दिवसांवर आला आहे.

ठाणे शहरातील रुग्णसंख्या

  •  ठाणे शहरातील सक्रिय रुग्ण – २,४८७
  •  लक्षणे असलेले रुग्ण – ९६५
  •  लक्षणे नसलेले रुग्ण – १३८०
  • जोखमीचे रुग्ण – १४२