काँग्रेसच्या आरोपानंतर चौकशीचे आदेश

दीड महिन्यावर येऊन ठेपलेल्या महापालिका निवडणुकांच्या तोंडावर काही नगरसेवकांनी आपल्या प्रभागांमध्ये सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्याचा धडाका लावला असून शहराच्या सुरक्षेच्या अंगाने अत्यंत महत्त्वाची असलेली ही यंत्रणा शासकीय व्यवस्थांच्या परवानगीशिवाय सार्वजनिक ठिकाणी उभारता येते का, असा सवाल सोमवारी स्थायी समिती सभेत उपस्थित करण्यात आला. किसननगर परिसरात शिवसेनेच्या काही नगरसेवकांनी सार्वजनिक ठिकाणी असे कॅमेरे बसविले आहेत. त्यामुळे काँग्रेसच्या नगरसेवकांनी हा मुद्दा उपस्थित करताच महापालिकेचे अधिकारीही अचंबित झाले. या प्रकरणाची सविस्तर माहिती घेऊन कार्यवाही करू, असे आश्वासन यावेळी प्रशासनाकडून देण्यात आले.

ठाणे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर इच्छुकांनी मतदारांपर्यंत पोहचण्यासाठी विविध उपक्रमांचा धडाका लावला आहे. शहरातील काही भागात विद्यमान नगरसेवकांनी सार्वजनिक ठिकाणी थेट सीसी टीव्ही कॅमेऱ्यांची उभारणी केली असून कोणत्याही शासकीय व्यवस्थेच्या परवानगीशिवाय असे कॅमेरे बसविता येतात का, असा सवाल काँग्रेसचे नगरसेवक मनोज शिंदे यांनी सोमवारी स्थायी समिती सभेत उपस्थित केला.  वागळे इस्टेट भागातील एका शिवसेना नगरसेवकाने प्रभागामध्ये अशाप्रकारे कॅमेरे बसविले

असून या कॅमेऱ्याची जोडणी त्याने स्वत:कडे ठेवली आहे. प्रभागातील रस्ते आणि पदपथांवर हे कॅमेरे बसविण्यात आले आहेत. या कॅमेऱ्यांच्या माध्यमातून प्रभागातील नागरिकांवर नजर ठेवली जाणार असून एखाद्या वसाहतीच्या आवारात असे कॅमेरे बसविणे आणि सार्वजनिक ठिकाणी ही यंत्रणा उभी करणे यात फरक असल्याचा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला. या असल्या प्रकारांमुळे नागरिकांची सुरक्षा धोक्यात येऊ शकते तसेच काही गैरप्रकार होऊ शकतात, असा मुद्दाही यावेळी उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, महापालिका प्रशासनाने अशा कॅमेऱ्यांसाठी कोणतीही परवानगी दिलेली नसल्याचे स्पष्ट केले. याप्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी शिंदे यांनी केली असता स्थायी समिती सभापती संजय वाघुले यांनी त्यासंबंधी लेखी माहिती सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.

आयुक्त आणि  महापौरांवरही नजर?

ठाणे महापालिका मुख्यालयात सुरक्षेच्या दृष्टिकोनातून सीसी टीव्ही कॅमेरे बसविण्यात आले असून त्याद्वारे पालिकेत येजा करणाऱ्यांवर लक्ष ठेवले जाते. मात्र, या कॅमेऱ्यांचा आयपी अ‍ॅड्रेस अनेकांपर्यंत पोहचला असून त्याद्वारे अनेक जण मोबाइलमध्ये सीसी टीव्ही कॅमेऱ्यातील चित्रीकरण पाहतात. विशेष म्हणजे, आयुक्त, महापौर आणि अन्य पदाधिकारी केव्हा पालिकेत येतात आणि केव्हा जातात, असे चित्रीकरणाद्वारे पाहिले जात आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून ही बाब घातक आहे, असा गौप्यस्फोट नगरसेवक मनोज शिंदे यांनी केला. या कॅमेऱ्यांचे नियोजन सुरक्षा विभागामार्फत केले जात नसून ते आयुक्त कार्यालयामार्फत केले जाते, असे उपायुक्त अशोक बुरपुल्ले यांनी स्पष्ट केले.