नगरसेवक-प्रशासन संघर्ष

ठाणे : ठाणे महापालिका प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात गेल्या काही दिवसांपासून संघर्ष सुरू असतानाच शुक्रवारी मंत्रालयामध्ये आयोजित केलेल्या ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सभेची विषयपत्रिका आणि गोषवारे सभेच्या दिवशी दिल्याचा दावा करत नगरसेवकांनी ही सभाच तहकूब केली. तसेच स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती मिळत नसल्याबाबत नगरसेवकांनी बैठकीत उघडपणे नाराजी व्यक्त करून प्रशासनाला लक्ष्य केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. यामुळे नगरसेवक आणि प्रशासन यांच्या संघर्षांचे पडसाद आता ठाणे स्मार्ट सिटी कंपनीच्या सभेतही उमटले आहेत.

ठाणे महापालिकेच्या नुकत्याच झालेल्या सर्वसाधारण सभेत प्रशासनाकडून मांडण्यात आलेले काही वादग्रस्त प्रस्ताव नगरसेवकांनी फेटाळून लावले होते. त्यावरून प्रशासन आणि नगरसेवक यांच्यात संघर्ष सुरू असून यातूनच प्रशासन आणि नगरसेवक हे दोघे एकमेकांना कात्रीत पकडण्याचा प्रयत्न करीत आहेत. या संघर्षांचे पडसाद शुक्रवारी मंत्रालयात आयोजित केलेल्या ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीच्या सभेत उमटले. ठाणे शहरातील विविध विकासकामे स्मार्ट सिटीच्या निधीतून करण्यासाठी ठाणे स्मार्ट सिटी लिमिटेड कंपनीची स्थापना करण्यात आली. या कंपनीच्या अध्यक्षपदावर राज्याचे प्रधान सचिव मनुकुमार श्रीवास्तव तर मुख्य कार्यकारी अधिकारीपदावर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त समीर उन्हाळे हे कार्यरत आहेत. तसेच या कंपनीच्या संचालक मंडळावर एमएमआरडीएचे अतिरिक्त, ठाणे जिल्हाधिकारी, ठाणे पोलीस आयुक्त, ठाणे महापौर, सभागृह नेते, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्ष नेते या महापालिका पदाधिकाऱ्यांसह विविध पक्षांचे गटनेते कार्यरत आहेत. मात्र, संचालक मंडळाच्या यादीतून सभागृह नेते नरेश म्हस्के यांचे नाव वगळल्यामुळे शुक्रवारची सभा वादग्रस्त ठरण्याची शक्यता होती. असे असतानाच या बैठकीमध्ये महापालिका पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाच्या कारभारावर उघडपणे नाराजी व्यक्त केली.

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत कोणती कामे सुरू आहेत, किती कामे पूर्ण झाली आणि त्यावर किती निधी खर्च झाला, याची माहिती संचालकांना मिळत नसल्याचा आरोप सभागृह नेते नरेश म्हस्के यांनी सभेत केला. तसेच योजनांची माहिती द्यायची नसेल तर आम्हाला संचालक मंडळात तरी कशाला ठेवता, असा जाबही त्यांनी विचारला.  स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात कोणती कामे सुरू आहेत आणि ही कामे कोणत्या भागात सुरू आहेत; तसेच या योजनेतील कामांचे उद्घाटन होते, मात्र त्याची माहिती संचालकांना मिळत नाही, असा आरोप भाजप गटनेते नारायण पवार यांनी केला.

..म्हणून बैठक तहकूब  – महापौर

या संदर्भात ठाण्याच्या महापौर मीनाक्षी शिंदे यांच्याशी संपर्क साधला असता त्या म्हणाल्या, ‘‘कंपनीच्या यापुर्वी झालेल्या सभेत अध्यक्ष मनुकुमार श्रीवास्तव यांनी स्मार्ट सिटी योजनेंतर्गत सुरू असलेल्या कामांची माहिती देण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्या होत्या. मात्र, त्यांच्याकडून ही माहिती मिळालेली नसतानाही पुन्हा सभा आयोजित करण्यात आली होती, असे त्यांनी सांगितले. तसेच या बैठकीची विषयपत्रिका आणि गोषवारा काही संचालकांना एक दिवस आधी तर काहींना बैठकीच्या दिवशी दुपारी मिळाला. इतक्या कमी वेळेत गोषवारे वाचून त्यावर भुमिका मांडणे शक्य नव्हते. त्यामुळे ही सभा तहकूब केली.’’