03 August 2020

News Flash

ठाण्याच्या कोर्टनाका चौकात ३५ वर्षांनंतर अशोकस्तंभ

हा स्तंभ सुमारे ३५ फूट उंचीचा आहे

ठाणे येथील कोर्टनाका भागात एका ट्रकच्या धडकेत उद्ध्वस्त झालेला अशोकस्तंभ तब्बल ३५ वर्षांनंतर महापालिकेने त्याच ठिकाणी उभारला असून अनंत चतुर्दशीचा मुहूर्त साधून तो बुधवारी ठाणेकरांसाठी खुला करण्यात आला. यामुळे या चौकाला पुन्हा जुनी ओळख प्राप्त झाली आहे.

ठाणे जिल्हाधिकारी कार्यालय आणि कोर्टनाका परिसरातील रस्त्यावर एक चौक असून त्या ठिकाणी १९५२ मध्ये स्वातंत्र्यसैनिक दत्ताजी ताम्हाणे यांच्या पुढाकाराने अशोकस्तंभ उभारण्यात आला होता. या स्तंभाच्या उभारणीसाठी ठाण्याचे तत्कालीन नगराध्यक्ष तारापोरवाला यांनी मान्यता दिली होती. तसेच तत्कालीन मंत्री डॉ. हिरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे या चौकाला अशोकस्तंभाच्या नावाने ओळख प्राप्त झाली होती. मात्र, १९८३ मध्ये कळव्याहून ठाण्याच्या दिशेने येणाऱ्या एका ट्रकची धडक बसून हा स्तंभ उद्ध्वस्त झाला होता. त्यानंतर मात्र त्याची उभारणी झाली नव्हती. मध्यंतरी त्या ठिकाणी सुशोभीकरण करण्यात आले होते. मात्र, त्यावेळेसही स्तंभ उभारण्यात आला नव्हता. स्वातंत्र्याची ही स्मृती चिरंतन रहावी यासाठी ठाणे शहराचे आमदार संजय केळकर यांनी महापालिकेकडे पाठपुरावा केला होता. त्यानंतर आमदार केळकर आणि महापालिकेच्या निधीतून पुन्हा त्याच ठिकाणी अशोक स्तंभ उभारण्यात आला आहे.

निळकंठ खानविलकर यांनी विधान भवनातील अशोकस्तंभ १९८० मध्ये साकारले. त्यांचा मुलगा श्रेयस खानविलकर यांनी हा अशोकस्तंभ साकारला आहे.

स्मारक कसे आहे?

या स्मारकात तिरंगा ध्वज हातात घेतलेले जवान आणि भारतीय संविधानाची प्रतिमा साकारण्यात आली आहे. हा स्तंभ सुमारे ३५ फूट उंचीचा आहे. त्यामध्ये ३ शिल्पांचा समावेश आहे. घटनेचे उद्दिष्ट असलेल्या कोनशीलेचा समावेश असून एफ. आर. पी. तंत्रज्ञानात हे शिल्प साकारण्यात आले आहे.

ठाणे शहर एकीकडे स्मार्ट सिटी होत असताना भावी पिढीला आपला ऐतिहासिक वारसा कळावा, यासाठी या अशोकस्तंभ आणि स्मारक उभारण्याची गरज होती. तसेच स्वातंत्र्यलढय़ातील आठवणींचे प्रतीक असलेले हे स्मारक उभे राहावे, अशी अनेक ठाणेकरांची इच्छा होती. त्यामुळे हा स्तंभ पुन्हा उभारण्यात आला आहे. – संजय केळकर, आमदार.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 14, 2019 3:29 am

Web Title: thane court naka chowk ashokstamb akp 94
Next Stories
1 भटक्या श्वानांच्या निर्बीजीकरणाकडे दुर्लक्ष
2 ठाण्यात महानगर गॅसची वाहिनी फुटली
3 ठाणेकरांना परवडणाऱ्या दरात आरोग्य सुविधा
Just Now!
X