विद्यार्थिनीकडे पाहून फ्लाइंग किस देण्याचा प्रताप एका तरुणाला महागात पडला आहे. मंदार जगताप (वय २७) या तरुणाला ठाण्यातील जिल्हा सत्र न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. दंड न भरल्यास त्याला पाच दिवसांसाठी तुरुंगात ठेवण्याचे आदेशही न्यायालयाने दिले आहेत. विशेष म्हणजे तब्बल सात वर्षानंतर ही शिक्षा सुनावण्यात आली.

ठाण्यातील शिवाई नगर येथे राहणाऱ्या १६ वर्षांच्या मुलीवर मंदारचे एकतर्फी प्रेम होते. २८ जून २०१० रोजी मंदारने तिचा पाठलाग केला आणि तिला फ्लाइंग किस देत तिची छेड काढली. स्थानिकांनी हा प्रकार पाहताच त्यांनी मंदारला पोलिसांच्या हवाली केले. याप्रकरणी वर्तकनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. भारतीय दंड संहितेतील कलम ५०९ अंतर्गत (महिलेचा विनयभंग करण्याच्या उद्देशाने हावभाव किंवा शब्दांचा वापर करणे) पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या प्रकरणात पोलिसांनी आरोपीविरोधात आरोपपत्र दाखल केले होते. पीडित मुलगी आणि तीन साक्षीदार यांनी न्यायालयात जबाब दिला. या आधारे न्यायालयाने मंदारला दोषी ठरवत ५ हजार रुपयांचा दंड ठोठावला. वर्तकनगर पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत भुजबळ यांनी या प्रकरणाचा तपास केला होता.