पक्षितज्ज्ञ डॉ. राजू कसंबे यांची मागणी
ठाणे खाडी हे महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र असून राज्याच्या वनविभागाने हा परिसर फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून घोषित केला आहे. या क्षेत्रापैकी काही भाग राज्य सरकार तर काही खाजगी मालकीचा आहे. मात्र या प्रदेशाला अद्यापही संरक्षित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेले नाही व रामसर पाणथळ क्षेत्राचाही दर्जा मिळालेला नाही. त्यामुळे ही भूमी असुरक्षित असून त्याच्या संरक्षणासाठी या भागाला रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, असे मत पक्षितज्ज्ञ डॉ. राजू कसंबे यांनी व्यक्त केले.
ठाण्यातील फर्न संस्थेच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त एका विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात कसंबे यांचे ‘महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र’ या विषयावर व्याख्यान दिले. कसंबे मुंबईच्या बी.एन.एच.एस. येथे कार्यरत असून ‘महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र’ या ‘बर्ड लाइफ’संस्थेच्या भारतातील प्रकल्पाचे प्रमुख म्हणून काम पाहत आहेत. स्थलांतरित तसेच निवासी पक्ष्यांच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील अशा जागा, दुर्मीळ पक्ष्यांचे अधिवास अशा अनेक निकषांवर आधारित ‘पक्षिक्षेत्र’ घोषित केली जातात. यामध्ये काही प्रदेश संरक्षित म्हणून घोषित करण्यात आले आहेत तर काहींना अद्याप संरक्षित करण्यात आलेले नाही. महाराष्ट्रात एकूण २० प्रदेश महत्त्वपूर्ण पक्षिक्षेत्र म्हणून घोषित केले आहेत. यामध्ये आपल्याजवळील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान व तुंगारेश्वर, माहूल व शिवडीजवळील पाणथळ जागा, ठाणे खाडी, तानसा अभयारण्य यांचा समावेश आहे. याबद्दल ठाणेकरांना विशेष अभिमान वाटला पाहिजे. तसेच या परिसंस्थेचे संरक्षण व संवर्धनासाठी आपण विशेष प्रयत्न केले पाहिजेत, असे कसंबे यांनी सांगितले.
ठाणे खाडी पक्षिक्षेत्रामध्ये मोठय़ा ठिपक्यांचा गरुड, पाणचिरा, रंगीत करकोचा, काळ्या डोक्याचा शराटी, छोटा रोहित, युरेशिअन कोरल, काळ्या शेपटीचा पणटीवळा हे अत्यंत दुर्मीळ व संकटग्रस्त पक्षी आढळून येतात. तसेच थंडीच्या मोसमात या खाडीत एक लाखांहून अधिक पक्षी येतात अशा नोंदी आहेत.
या अत्यंत महत्त्वपूर्ण क्षेत्राला तेथे टाकला जाणारा कचरा, सांडपाणी, नवीन पूल, रस्ते, कारखाने, भराव या अनेक कामांपासून धोका आहे. खाडी किनारच्या तिवरांची जंगले अनेक कारणांमुळे नष्ट होत आहेत. पाणी प्रदूषित होत आहे. कचऱ्याच्या तसेच इतर भरावांमुळे खाडी उथळ होत आहे. त्यामुळे या परिसराला रामसर पाणथळ क्षेत्राचा दर्जा देण्यात यावा, असे कसंबे यांनी सांगितले. कसंबे यांच्या भाषणानंतर त्यांचा मुलगा वेदान्त यानेही वेगवेगळे पक्षी व त्यांचे खाद्य आणि सवयी यावर एक छोटा स्लाईड शो दाखवला.

रामसर पाणथळ क्षेत्र म्हणजे काय?
पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी इराण येथील रामसर येथे जगातील विविध देशांनी एकत्र येऊन रामसर करार केला. या कराराअंतर्गत १६८ देश एकत्र येऊन २१७७ पाणथळ जागांचे संरक्षण करत आहेत. त्यामध्ये भारतातील २७ जागांचा समावेश असून महाराष्ट्रातील अनेक पाणथळ क्षेत्र त्यामध्ये सहभाग घेण्यासाठी प्रयत्न करत आहेत. ठाणे खाडीचा त्या क्षेत्रात समावेश झाल्यास येथील पाणथळ भूमीच्या संरक्षणाला गती मिळू शकेल.

फर्न संस्थेचे कार्यक्रम
पहिला वर्धापन साजरा करणाऱ्या फर्न संस्थेने वर्षांभरामध्ये वनस्पतीशास्त्र, पक्षीशास्त्र अभ्यासक्रम, सोयरे वृक्ष, औषधी परसबाग, फुलपाखरू उद्यान, पर्यावरण व्याख्यानमाला, निसर्गायण शिबीर अशा सर्व उपक्रमांची ओळख संस्थेच्या संस्थापक सदस्या सीमा हर्डीकर यांनी करून दिली. त्यानंतर अनेक सभासदांनी फर्नच्या कुटुंबातून आपल्याला काय नवीन मिळाले, त्यातून निसर्गाप्रति आपली जाणीव कशी वाढली हे सांगितले.