पश्चिमेकडे एका टोकाला खाडी किनारा आहे. या किनाऱ्याच्या दीड ते दोन किलोमीटर अंतरावर भव्य अशी निवासी संकुलउभारली गेली आहेत. अजूनही नवनवी बांधकामे उभी राहत आहेत. किनाऱ्यावरून घरी येताना मिळणारा सुखद गारवा, डोळ्याची पारणे फेडणारी निसर्गसंपदा हवीहवीशी वाटणारी आहे. त्यामुळे किनाऱ्यावरील या संकुलांकडे रहिवाशांचा ओढा वाढला आहे. १५ वर्षांपूवी येथे ५०० रुपये चौरस फूट दराने घरे मिळत होती. आता घरांचे दर दहा हजार चौरस फूट इतके वाढले आहेत. ठाण्याच्या इतर विभागांच्या तुलनेत येथे शांतता आहे. त्यामुळे अनेक नोकरदार, व्यावसायिक या भागात राहणे पसंत करू लागले आहेत. राबोडी दोन येथील आकाशगंगा हे भव्य निवासी संकुल याच भागात आहे.
ठाणे शहराच्या खाडी किनाऱ्याने सहज फेरफटका मारला असता स्थानकापासून साधारण तीन ते चार किलोमीटर अंतरावर डाव्या बाजूला आकाशगंगा निवासी संकुल आहे. साधारण ३० वर्षांपूवी आकाशगंगा परिसर दलदलीने आच्छादलेला होता. जवळच खाडी किनारा असल्याने त्याचाही परिणाम येथे जाणवत होता. अन्वर कासम या बांधकाम व्यावसायिकाने जागा विकत घेतली आणि १९८७ साली आकाशगंगा संकुल उभारणीचे काम येथे सुरू केले. १९९५ मध्ये काम पूर्णत्वास आले. दोन इमारतींनी जोडून बांधल्या गेलेल्या १३ इमारती येथे उभ्या राहिल्या. काही ४ मजली इमारती तर काही ९ ते १० मजली टॉवर्स बांधण्यात आले आहेत. जसजसे इमारतींचे बांधकाम पूर्ण होऊ लागले, तसतसे लोक राहायला येऊ लागले. संपूर्ण संकुलात ४२९ सदनिका आहेत. ३ ते ४ बंगलेही या संकुलात दिसतात.
राबोडीमध्ये मुस्लीम समाजाचे प्रमाण अधिक असले तरी राबोडी-दोनमध्ये संमिश्र लोकवस्ती आहे. आकाशगंगा हे संकुलही त्याला अपवाद नाही. या संकुलातील सर्व जाती, धर्म आणि समाजाचे लोक येथे गुण्यागोविंदाने नांदतात. उच्च मध्यमवर्गीय रहिवासी असल्याने सर्वाकडे मालकीचे वाहन आहे. त्यामुळे त्यांना वाहतूक व्यवस्थेची फार मोठी समस्या नाही. परिणामी ठाणे महापालिकेच्या बस गाडय़ांचे प्रमाणही येथे कमी आहे. ठाणे स्थानकापर्यंत जाण्यासाठी सरळ रस्ता असल्याने अगदी २० मिनिटांत स्थानक आपण गाठू शकतो.
आकाशगंगा नक्षत्रांनी बहरलेले आहे. कारण इमारतींना नक्षत्रांची नावे दिली गेली आहेत. त्यामुळे ‘आकाशगंगा’ या नावाला अधिक शोभा आली आहे. संकुल परिसर मोठय़ा प्रमाणात हिरवाईने आच्छादलेला आहे. फणस, नारळ, पेरू, अशोक, निलगिरी, जांभूळ, बदाम आदी विविध प्रकारची झाडे रहिवाशांना सावली आणि फळेही देत असतात. संकुलात मोकळी जागा असल्याने पहाटेच्या सुमारास या हिरवाईत प्रभात फेरीचा आनंद अनुभवता येतो. ज्येष्ठ नागरिकही या फेरीत सहभागी होतात. झाडे असल्याने भरपूर ऑक्सिजन मिळतो. त्यामुळे रहिवाशांचे आरोग्य सृदृढ आहे.
संकुलाचे मानीव अभिहस्तांतरण (कन्व्हेयन्स डीड) होण्यासाठी मोठय़ा प्रमाणात प्रयत्न सुरू होते. बांधकाम व्यावसायिकाचा सकारात्मक प्रतिसाद असतानाही काही रहिवाशांच्या नाकर्तेपणामुळे ते काम रेंगाळले होते. परंतु फेडरेशनचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी कन्व्हेयन्स डीडचे महत्त्व आणि ते न केल्यास निर्माण होणाऱ्या अडचणींबाबत मोलाचे मार्गदर्शन केल्यामुळे हे कन्व्हेयन्स डीडचे काम पार पडले. ‘आकाशगंगा’ पूर्णपणे रहिवाशांच्या मालकीची झाली याबद्दल खजिनदार सुभाष पेडणेकर यांच्यासह रहिवाशांनीही समाधान व्यक्त केले आहे.
मोरेश्वर मंदिर
संकुलात राहणारे रहिवासी धार्मिक असल्याने त्यांच्या सोयीसाठी २००३ मध्ये श्री मोरेश्वराचे मंदिर उभारण्यात आले आहे. संगमरवरी असलेल्या या मंदिराचा वर्धापनदिन मोठय़ा उत्साहात आणि भक्तिभावात दरवषीं साजरा होत असतो. या दिवशी महाप्रसाद ठेवण्यात येतो. या वर्धापनदिनाला परिसरातील भाविकही मोठय़ा संख्येने उपस्थित राहून मोरेश्वराचे दर्शन घेतात. वर्धापनदिनासाठी कोणतीही वर्गणी घेतली जात नाही. स्वेच्छेने जे देतील ते स्वीकारले जाते. स्वेच्छेने देणाऱ्या भक्तांचे प्रमाणही दरवर्षी वाढत असल्याचे फेडरेशनचे अध्यक्ष इम्रान शेख आणि सचिव दयानंद मिरजकर यांनी सांगितले.
महिला, युवा उत्साही, वायफाय फ्री
वसाहतीत वर्षभर विविध सांस्कृतिक उपक्रम राबविले जातात. त्यात संकुलातील महिला, तरुण मंडळी मोठय़ा उत्साहाने सहभागी होत असतात. प्रजासत्ताक दिन, स्वातंत्र्य, कोजागिरी, आनंद मेळा, तुळशी विवाह, दहीहंडी, सहल, सत्यनारायणाची पूजा आदी कार्यक्रमात सर्वच रहिवासी उत्साहाने सहभागी होत असतात. क्रिकेट, किल्ला, नृत्य स्पर्धामधून नवोदितांच्या कलेला वाव देण्याचा प्रयत्न केला जातो. संकुलाचा वर्धापनदिनी विविध कार्यक्रमांची रेलचेल असते. वाद्यवृंदाचा विशेष कार्यक्रमही येथे आयोजित केला जातो. नवरात्रीत शेवटच्या तीन रात्री गरबा रंगतो. कर्तृत्ववान व्यक्ती किंवा ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते ध्वजारोहण केले जाते. तरुणांसह सर्वांनीच माहितीपूर्ण व्हावे यासाठी वायफाय सुविधाही अगदी मोफत देण्यात आली आहे. त्याचा पुरेपूर वापर सर्वच जण करीत आहेत.
वाहनतळासाठी नियोजनाचा प्रयत्न
संकुलात मोकळी जागा मोठय़ा प्रमाणात असल्यामुळे वाहनतळाची समस्या काही उद्भवत नाही. मात्र, प्रत्येकाला आपले वाहन आपल्या दारात असावे असे वाटत असते. त्यानुसार ती उभी केली जात असल्याने थोडी शिस्त बिघडली आहे. त्यामुळे एखाद्या वेळी आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली तर अग्निशमन दलाच्या गाडय़ा किंवा रुग्णवाहिका या अत्यावश्यक सेवेला संकुलात इच्छित स्थळी पोहोचण्यात अडथळा होऊ शकतो. याचे भान किंवा मानसिकता काही रहिवाशांमध्ये नसल्याने त्यावर उपाय म्हणून एक रजिस्टर प्रवेशद्वारावर ठेवण्यात आले आहे. त्यात वाहनमालकाचा दूरध्वनी क्रमांक त्याच्या नावासह नोंद केली जाते. जर तशी परिस्थिती घडली तर दूरध्वनी करून अडथळा ठरणाऱ्या वाहनास हटविण्यासाठी मालकाला दूरध्वनी करावा लागतो. काही मालक अडचण होऊ नये म्हणून वाहनाची चावी प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षकाकडेही जमा करतात. परंतु घरापासून वाहन दूर ठेवण्यास मात्र ते तयार नाहीत. त्याला शिस्त असावी यासाठी वाहनतळासाठी जागा करण्याचे नियोजन असल्याची माहिती फेडरेशनचे अध्यक्ष इम्रान शेख यांनी दिली. त्यासाठी वाहनमालकांची मानसिकता बदलण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
उद्यानासाठी पाण्याची कमतरता
संकुलात उद्यानासाठी जागा आहे. परंतु पाण्याची कमतरता असल्याने उद्यानात बाग फुलवण्याची इच्छा अपूर्ण राहिली आहे. कूपनलिकेद्वारे जमिनीतील पाणी या उद्यानासाठी व शेजारील झाडासाठी वापर करण्याचे प्रयोजन करण्यात आले आहे. त्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे याच पाण्याचा वापर शौचालयासाठी करण्याचे तसेच पिण्याव्यतिरिक्त इतर कामासाठी करण्याचे योजिले असल्याचे फेडरेशनमार्फत ठरविण्यात आहे, असे शेख यांनी सांगितले. त्याचप्रमाणे भविष्यात संकुलातील वीज एलईडीमार्फत प्रकाशमान करून तसेच मोकळ्या जागेत सहजतेने फिरता यावे, यासाठी काँक्रीटीकरण करण्याचे प्रयत्नही फेडरेशनतर्फे सुरू आहेत.
संकुलासाठी बससेवा
सर्वांकडे जरी वाहने असली तरी ती सर्वांना चालवणे शक्य नसल्याने भविष्यात संकुलासाठी बससेवा उपलब्ध करून देण्याचा फेडरेशनचा विचार आहे. ती सुरू झाल्यास संकुल ते ठाणे स्थानक असा प्रवास करणे कुटुंबातील अनेक सदस्यांना सोयीस्कर होईल, त्यादृष्टीनेही प्रयत्न सुरू आहेत. संकुलाच्या सुरक्षेसाठी ८ सुरक्षारक्षक असून सीसीटीव्ही यंत्रणाही बसविण्यात आली आहे. शेजारी सरस्वती विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय असल्याने शैक्षणिक समस्या नाही. राबोडी हेच बाजारपेठेचे ठिकाण असल्याने सर्व जीवनावश्यक वस्तू येथे मिळतात. वाहतुकीचे साधन म्हणून ठाणे महापालिकेची बस, रिक्षा हे पर्याय असले तरी प्रत्येकाकडे वाहन असल्याने त्याची फारशी आवश्यकता भासत नाही. वैद्यकीय सुविधाही चांगली आहे. जवळच असलेल्या कळव्यावरून जाताना महामार्ग लागत असल्याने पुणे, नवी मुंबई, मुंबई, मुंब्रा, दिवा, कल्याण, डोंबिवली आदी ठिकाणी जाता येते. त्याचप्रमाणे हास्य क्लब, वाचनालय, योग वर्ग, तसेच ज्येष्ठांसाठी कट्टा आदी सुविधाही संकुलात असल्याने रहिवाशी समाधानी आहेत.
संकुलातील एकता अबाधित
२००९ मध्ये येथे जेव्हा हिंदू-मुस्लिमांमध्ये दंगल उसळली. त्याचा कोणताही परिणाम आकाशगंगा संकुलावर झाला नाही. येथे सलोख्याचे वातावरण अबाधित होते. अध्यक्ष इम्रान शेख यांनी रहिवाशांच्या काळजीसाठी सतर्क होते. शेख यांनाही काही होऊ नये यासाठी रहिवाशांनी विशेष काळजी घेतली होती. शेख यांच्या मातोश्री ‘हज’ला गेल्या असता तेथे आणीबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यांच्या काळजीने रहिवाशांचा जीव व्याकूळ झाला होता. सतत दूरध्वनी, प्रत्यक्ष विचारपूस सातत्याने त्यावेळी सुरू होती. ज्यावेळी त्या हजयात्रा करून त्या संकुलात सुखरूप परत आल्या, त्यावेळी महिलांनी आनंदाच्या भरात मिठी मारून त्यांचे स्वागत केले. त्यावेळचा अनुभव सांगताना शेख यांना भावना अनावर झाल्या होत्या.