वनविभागाकडून प्रारूप अधिसूचना जाहीर

ऋषिकेश मुळे, ठाणे</strong>

फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभायारण्य अशी ओळख मिळालेल्या ठाणे खाडीचा परिसर आता पर्यावरणदृष्टय़ा संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. राज्याच्या वन विभागाने नोव्हेंबर महिन्यात यासंबंधीचा निर्णय जाहीर केला आहे. निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी या प्रस्तावावर हरकती, सूचना मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कांदळवन क्षेत्रात झाडांची कत्तल करण्यासोबतच ध्वनी, वायू प्रदूषणासोबत बांधकाम करण्यास मज्जाव असणार आहे.

एक लाखाहून अधिक पक्ष्यांचे आश्रयस्थान असलेल्या ठाणे खाडीकिनारचा परिसर राज्य सरकारने फ्लेमिंगो अभायारण्य म्हणून चार वर्षांपूर्वी घोषित केला आहे. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानापाठोपाठ ठाणे खाडीच्या परिसरास अभयारण्याचा दर्जा मिळाला आहे. त्यानुसार ठाणे खाडी किनाऱ्याचा १६ हजार ९०५ हेक्टर इतका भूभाग फ्लेमिंगो अभयारण्य म्हणून गणण्यात आला. त्यात ठाण्यातील कोपरी, मुलुंड, विक्रोळी, भांडुप, कांजूर, तुर्भे गावाची सीमा, नाहूर, सायन-पनवेल महामार्ग या खाडीकिनाऱ्याच्या भागाचा समावेश आहे. यापैकी कांदळवनाखालील क्षेत्र ८९६ हेक्टर आणि खाडी परिसराचे क्षेत्र ७९४ हेक्टर इतके आहे. दरवर्षी या खाडीकिनाऱ्यावर लाखोंच्या संख्येने येणारे फ्लेमिंगो पक्षी लक्षात घेता खाडीकिनारच्या प्रदेशातील वाढत्या नागरीकरणासोबत फ्लेमिंगो पक्ष्यांच्या अधिवासाला धोका पोहचू नये याकरिता राज्य सरकारने आता अधिक वेगाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. वनविभागाच्या मुंबई कांदळवन संधारण विभागाने ठाणे खाडीकिनारा हा नुकताच पर्यावरण संवेदनशील क्षेत्र म्हणून घोषित केला आहे. याविषयीची प्रारूप अधिसूचना कांदळवन विभागाकडून जाहीर करण्यात आली आहे. या निर्णयानुसार ठाणे खाडीकिनारी परिसरात कोणत्याही प्रकारची उत्खननाची कामे, बांधकामे, तसेच ध्वनी प्रदषूण आणि वायू प्रदूषण होईल अशा गोष्टी करण्यास मज्जाव असणार आहे. या नियमांचा भंग करणाऱ्यांवर पर्यावरण-कांदळवन कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात येणार असल्याचे मुंबई कांदळवन विभागाचे वनाधिकारी डी. आर. पाटील यांनी सांगितले. तसेच एखाद्या शासकीय प्रकल्पाच्या बांधकामास मात्र नियमानुसार परवानगी राहणार असल्याचे कांदळवन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे.

पर्यावरणीय दृष्टिकोनातून वाढत्या नागरीकरणामुळे फ्लेमिंगो अभयारण्याला कोणत्याही प्रकारचा धोका पोहचू नये, कांदळवनाला हानी पोहचून फ्लेमिंगोंचा अधिवास नष्ट होऊ नये याकरिता ठाणे खाडी फ्लेमिंगो अभायारण्य पर्यावरण संवेदनशील क्षेत्र घोषित करण्याची प्रारूप अधिसूचना जाहीर करण्यात आली आहे. फ्लेमिंगो पक्ष्यांचे अभायारण्य असणारा ठाणे खाडीकिनारा ठाणे जिल्ह्य़ाच्या पर्यटन क्षेत्राचा एक अनमोल ठेवा आहे आणि हा ठेवा आपणच जपायला हवा.

– डी. आर. पाटील, विभागीय वनअधिकारी, मुंबई कांदळवन संधारण विभाग