25 March 2019

News Flash

शहरबात ठाणे : खाडीकिनारी जैवविविधतेचा बहर.. 

पक्ष्यांचा परतीचा काळ सुरूझाला असला तरी पुढल्या वर्षी हे पक्षी ठाणे खाडीकिनारी दाखल होतील

या पक्ष्यांचा परतीचा काळ सुरूझाला असला तरी पुढल्या वर्षी हे पक्षी ठाणे खाडीकिनारी दाखल होतील.

थंडीच्या दिवसांत ठाणे खाडी परिसरात मोठय़ा प्रमाणात दाखल होणारे परदेशी पाहुणे पक्षी आणि फ्लेमिंगोंमुळे खाडीकिनारा या काळात रंगीबेरंगी पक्ष्यांनी बहरतो. मोठय़ा संख्येने खाडीकिनारी वास्तव्य करणाऱ्या फ्लेमिंगो पक्ष्यांमुळे ठाणे खाडी किनारपट्टीला फ्लेमिंगो अभयारण्याचा दर्जा प्राप्त करून देण्यात आल्याने या परिसरातील जैवविविधता पाहण्यासाठी पर्यटक गर्दी करतात. त्यामुळे खाडी किनारपट्टीचे संवर्धन होऊन त्या परिसरात जैवविविधता बहरत आहे. वन विभाग आणि कांदळवन विभागामार्फत खाडीकिनारी सुरू असलेल्या प्रकल्पांमुळे होणारे सकारात्मक बदल निश्चितच स्वागतार्ह आहेत.

गेल्या काही वर्षांत ठाणे खाडीचे रूप झपाटय़ाने बदलले आणि ज्या खाडीकिनारी पूर्वी केवळ दुर्गंधी होती, तो खाडीकिनारा जैवविविधतेच्या सकारात्मक दिशेने पावले टाकत आहे. काही वर्षांत खाडीकिनारी बहरणाऱ्या या जैवविविधतेचा अनुभव घेण्यासाठी पर्यटक गर्दी करीत आहेत. बोटीच्या माध्यमातून खाडी सफर, दृक्श्राव्य माध्यमातून पक्षी निरीक्षण, जैवविविधतेविषयक माहिती या वेगवेगळ्या उपक्रमांतून ठाणेकर नागरिक खाडीकिनारी जोडला जात आहे. खाडीकिनारी परदेशी पाहुण्या पक्ष्यांची वाढलेली वर्दळ ही येथील निसर्गसंपदा उत्तम असल्याचे लक्षण आहे. मार्च महिन्याच्या अखेरीस हे पाहुणे पक्षी आपल्या मायदेशी परततील, पण दर वर्षी नित्यनेमाने ऑक्टोबर महिन्यात ठाणे खाडीकिनारी दाखल होण्याची त्यांची सवय पक्षिप्रेमी, पर्यटकांमध्येही परिचयाची झाली आहे. यंदाच्या वर्षी कोणता नवा पाहुणा पक्षी ठाणे खाडीकिनारी दाखल होईल का, गेल्या वर्षी दिसलेला विशिष्ट परदेशी पक्षी यंदा खाडीकिनारी का दिसला नाही, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे शोधण्यात ठाण्यातील पक्षिप्रेमी या काळात व्यग्र असतात. पर्यटकांना, पक्षिप्रेमींना खाडीकिनारीचे हे पक्षी न्याहाळण्यासाठी शासनाच्या कांदळवन विभागाच्या पुढाकाराने मासेमारी करणाऱ्या कोळी व्यावसायिकांना खाडीकिनारी रोजगार उपलब्ध करून देणारा ‘पार्टिसिपेटरी ईको टूरिझम प्लॅन रुल्स अ‍ॅण्ड रेग्युलेशन’ हा प्रकल्प निश्चितच फायदेशीर आहे. त्यात कोळ्यांना प्रशिक्षण देऊन पक्षी निरीक्षणासाठी तयार करण्यात आले असून हे स्थानिक कोळी पर्यटकांना खाडीकिनारी येणाऱ्या पक्ष्यांचे दर्शन घडवतात. हे वेगवेगळे पक्षी न्याहाळताना एखाद्या नवीन पक्ष्याच्या शोधात पक्षी अभ्यासक असतात. यंदाच्या वर्षी ठाणे खाडी परिसरात ‘ग्रे हेडेड लॅपविंग’ या पक्ष्याने हजेरी लावली आणि पक्षिप्रेमींसाठी, छायाचित्रकारांसाठी ही बाब विशेष आकर्षित करणारी ठरली. ठाणे खाडीकिनाऱ्यापासून हाकेच्या अंतरावर असणाऱ्या ऐरोली परिसरात उभे राहिलेले कोस्टल अ‍ॅण्ड मरिन डायव्हरसिटी सेंटर (किनारी आणि सागरी जैवविविधता केंद्र) यात विशेष भूमिका बजावत आहे. या केंद्राला भेट देणारे पर्यटक या काळात सुट्टीच्या दिवशी खाडीकिनारची जैवविविधता न्याहाळताना दिसतात.

उत्तरेकडील थंडीपासून स्वत:चे रक्षण करण्यासाठी ऑक्टोबर महिन्याच्या सुमारास हजारो किलोमीटर हवाई प्रवास करून अनेक पक्षी मुंबई-ठाण्याच्या खाडीकिनारी दाखल होतात. ठाणे खाडीकिनारी, येऊरच्या जंगलात मुक्त विहार करणारे हे पाहुणे पक्षी मार्चमधील उन्हाच्या झळा लागण्यास सुरुवात होताच आपल्या मूळ अधिवासांकडे प्रयाण करतात. खाडीकिनाऱ्याप्रमाणेच येऊरचे जंगलही या पाहुण्या पक्ष्यांना आपलेसे वाटते. एशियन पॅराडाईज फ्लायकॅचर, वर्डिटर फ्लॅयकॅचर, ब्ल्यू कॅप रॉक थ्रश, इजिप्तशियन वल्चर, एशियन ब्राऊन फ्लायकॅचर, रेड ब्रेस्टेड फ्लॅयकॅचर, अल्ट्रा मरिन फ्लॅयकॅचर, इंडियन पिटा असे पक्षी उत्तराखंड, हिमाचल प्रदेश या भागांतून दर वर्षी येऊरच्या जंगलात स्थलांतर करून येतात आणि मार्च महिन्याच्या अखेरीस येऊरच्या जंगलातून मायदेशी परततात. तसेच सायबेरिया, चायना, मंगोलिया, जपान अशा युरोपियन देशांतून ठाणे खाडीकिनारी कॉमन सँडपायपर, वूड सँडपायपर, सरलिव्ह सँडपायपर, ब्लॅक टेल्ड गोल्डविट, युरेशियन करलू, नॉर्दन शॉवेलर, गार्गेनी, कॉमन टील, नॉर्दन पिनटेल असे काही पक्षी दाखल होत असतात. ठाणे खाडीकिनारा फ्लेमिंगो पक्ष्यांसाठी तर हक्काचे ठिकाण. हजारोंच्या संख्येने दाखल होणारे पक्षी दुर्बिणीतून न्याहाळणे हे पक्षिप्रेमींसाठी या काळात नेत्रसुखद असते. या वर्षी लाँग बिल्ड डोविचर या उत्तर अमेरिका खंडातील पक्ष्याने ठाणे खाडीकिनारी नुकतीच हजेरी लावली आणि या पक्ष्याच्या आगमनाने पक्षी अभ्यासक सुखावले. महाराष्ट्रात या पक्ष्याची दुसरी नोंद असल्याचे पक्षी अभ्यासकांकडून सांगण्यात येत आहे. खाडीकिनारी, येऊरच्या जंगलात मोठय़ा संख्येने दाखल होणारे हे पक्षी या ठिकाणचे जैवविविधतेचे वैभव जपत आहेत. ठाणे शहराच्या दृष्टीने हे निश्चितच कौतुकास्पद आहे.

आता या पक्ष्यांचा परतीचा काळ सुरूझाला असला तरी पुढल्या वर्षी हे पक्षी ठाणे खाडीकिनारी दाखल होतील. आगमन होणाऱ्या या पक्ष्यांमध्ये काही नव्या जातीचे पक्षी असतील तर काही नेहमीच्या प्रजाती. पण या परदेशी पाहुण्या पक्ष्यांना ठाणे खाडीकिनारी, येऊरच्या जंगलात पुन्हा यावेसे वाटेल यासाठी हा खाडीकिनारा, जंगल सर्वागीणदृष्टय़ा जपणे हे एक नागरिक म्हणून आपले कर्तव्य आहे.

First Published on March 13, 2018 2:59 am

Web Title: thane creek status of flamingo wildlife sanctuary