24 January 2020

News Flash

नोकरीच्या बहाण्याने ४० जणांना गंडा

पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांच्याकडील व्हिसा बनावट असल्याची बाब समोर आली.

(संग्रहित छायाचित्र)

ठाणे : मलेशिया आणि रशियामध्ये नोकरी मिळवून देण्याचे आमिष दाखवून ४० जणांना गंडा घालणाऱ्या दोघांना ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचने अटक केली आहे. त्यांचे आणखी दोन साथीदार परदेशात असून त्यांचाही पोलिसांकडून शोध सुरू आहे. नोकरीसंबंधीच्या चित्रफिती यूटय़ूबवर प्रसारित करून या चौघांनी ही फसवणूक केल्याची बाब पोलिसांच्या तपासात समोर आली आहे.

अनुज कुमार आणि गौरव कुमार अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे असून या दोघांनी ‘एम ग्रोथ’ या नावाने कंपनी सुरू केली होती. या कंपनीचे कार्यालय ठाण्यातील कापूरबावडी परिसरात सुरू केले होते. त्यांचे दोन साथीदार परदेशात असतात. त्यांच्यामार्फत परदेशात नोकरी देण्याचे आमिष ते तरुणाना दाखवीत होते. नोकरीसाठी इच्छुक असलेल्या तरुणांनी कंपनीशी संपर्क साधावा म्हणून त्यांनी यूटय़ूबवर एक जाहिरात प्रसारित केली होती. मुंबई येथील मालाड भागात राहणारे विक्रम भाटी यांनी ही चित्रफीत ऑक्टोबर २०१८ मध्ये पाहिली होती. या चित्रफितीमध्ये मलेशिया आणि रशियात नोकरी देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. तसेच या चित्रफितीमध्ये कंपनीचा मोबाइल क्रमांक आणि पत्ता देण्यात आला होता. त्यातील मोबाइल क्रमांकाच्या आधारे विक्रम यांनी कंपनीशी संपर्क साधला. त्यावेळी त्यांच्यासोबत गौरव कुमार हा बोलला आणि त्याने त्यांना कापूरबावडी येथील कार्यालयात येण्यास सांगितले. नोव्हेंबर २०१८ मध्ये विक्रम हे कापूरबावडी येथील कंपनीच्या कार्यालयात गेले. तिथे कंपनीच्या प्रतिनिधीने मलेशियात नोकरी लावून देतो असे सांगून विमानाचे तिकीट आणि व्हिसासाठी त्यांच्याकडून ५५ हजार रुपये घेतले. १२ जानेवारीला विक्रम हे मलेशियात पोहचल्यानंतर पोलिसांनी त्यांना विमानतळावरच अडविले. पोलिसांच्या चौकशीदरम्यान त्यांच्याकडील व्हिसा बनावट असल्याची बाब समोर आली. त्यानंतर दोन दिवस मलेशिया पोलिसांनी त्याला ताब्यात ठेवून पुन्हा भारतात पाठविले. भारतात परतल्यानंतर त्यांनी ‘एम ग्रोथ’ कंपनीचे कार्यालय गाठले आणि घडलेल्या प्रकाराबाबत त्यांनी अनुज आणि गौरव याच्याकडे विचारणा केली. त्यावेळी दोघांनी त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. तसेच रशियात नोकरीचे आमिष दाखवून दोघांनी त्यांना ३ लाख रुपये भरण्यास सांगितले. त्यानंतर त्यांनी पुन्हा दोन लाख पाच हजार रुपये दोघांच्या खात्यात पाठविले. मात्र, पैसे भरूनही त्यांना नोकरी मिळाली नाही.

आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पोलीस ठाणे गाठले. या प्रकरणी त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून चितळसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्य़ाचा समांतर तपास करून ठाणे गुन्हे अन्वेषण शाखेच्या युनिट पाचचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयदीप रणवरे यांच्या पथकाने दोघांना अटक केली. या दोघांनी ४० जणांची अशाच प्रकारे फसवणूक केल्याची बाब तपासात समोर आली असून हा आकडा वाढण्याची शक्यता असल्याची माहिती साहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत पवार यांनी दिली.

First Published on April 24, 2019 2:49 am

Web Title: thane crime arrested 2 man for cheated 40 people in the name of job
Next Stories
1 डान्सबारमध्ये काम करणाऱ्या महिलेची हत्या
2 मॉडेलिंगसाठी इच्छुक तरुणीवर प्रियकरानेच केला बलात्कार, भाईंदरमधील घटना
3 ना प्रचाराचा पत्ता, ना उमेदवारांची माहिती!
Just Now!
X