19 October 2019

News Flash

दोन महिन्यांच्या बाळाची सुटका

अपहरण करणाऱ्या महिलेला नाशिक येथून अटक

अपहरण करणाऱ्या महिलेला नाशिक येथून अटक

ठाणे : सीएसएमटी रेल्वे स्थानकातून एका दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण करणाऱ्या महिलेला रविवारी ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकने नाशिक येथून अटक केली. नीलम बोरा (३५) असे अटकेत असलेल्या महिलेचे नाव असून तिने बाळाचे अपहरण का केले होते, याचा तपास पोलीस करत असल्याची माहिती गुन्हे अन्वेषण शाखेचे उपायुक्त दीपक देवराज यांनी दिली.

सीएसएमटी रेल्वे स्थानकातून २९ मार्चला दोन महिन्यांच्या बाळाचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी सीएसएमटी रेल्वे स्थानक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन ठाणे गुन्हे अन्वेषण शाखा युनिट एकनेही या प्रकरणाचा समांतर तपास सुरू केला. गुन्हे अन्वेषण शाखा युनीट एकचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीन ठाकरे यांच्या पथकाने सीएसएमटी रेल्वे स्थानकातील सीसीटीव्ही चित्रीकरण रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे पोलिसांच्या मदतीने तपासले. तसेच सीसीटीव्ही चित्रीकरण समाजमाध्यमांवर प्रसारित केले होते. तपासादरम्यान ही महिला नाशिक शहरात असल्याची माहिती युनिट एकला मिळाली. यानंतर पोलिसांनी नाशिक येथील पंचवटी भागात सापळा रचून तिला रविवारी अटक केली. तसेच तिच्याकडून अपहरण केलेले दोन महिन्यांच्या बाळाची सुखरूप सुटका करून ते बाळ रेल्वे पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले आहे. या महिलेने आधीही मुलांचे अपहरण केले आहे का, याची चौकशी पोलीस करत आहेत.

१९१ बालकांचा शोध घेण्यात यश

गुन्हे अन्वेषण शाखेच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक विभाग आणि चाईल्ड प्रोटेक्शन युनिटने १ जानेवारी २०१८ ते १ एप्रिल २०१९ या कालावधीत अपहरण झालेल्या आणि हरविलेल्या १३८ बालक आणि ५३ बालिकांची सुखरूप सुटका केली आहे. तर १८ वर्षांवरील ११४ व्यक्तींची त्यांच्या घरात सुखरूप रवानगी केली आहे.

First Published on April 16, 2019 2:51 am

Web Title: thane crime branch nabs nashik woman for kidnapping two month old boy