कळव्यात दोन घरफोडय़ा

ठाणे – कळवा रेल्वे स्थानक भागातील इंदिरानगर परिसरातील दोन दुकाने फोडून चोरटय़ांनी किमती ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे. या दोन्ही घटना एकाच परिसरात घडल्या आहेत. इंदिरानगर भागात राहणाऱ्या ३२ वर्षीय व्यक्तीचे याच भागात दुकान आहे. या दुकानाच्या भिंतीला असलेली ग्रील उचकटून चोरटय़ांनी वेल्डिंग मशीनचे साहित्य चोरून नेले आहे. तसेच नंदकिशोर चौरसिया यांच्या दुकानाचे कुलूप तोडून चोरटय़ांनी संगणक चोरून नेला आहे. या दोन्ही घटनांप्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

२० हजारांची रोकड लंपास
ठाणे- येथील जिजामाता भाजी मार्केटजवळील सार्वजनिक शौचालयात लघुशंकेकरिता गेलेल्या एका व्यक्तीची दोन चोरटय़ांनी पिशवी चोरून नेल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. या पिशवीत सुमारे २० हजार रुपये होते. एक ५३ वर्षीय व्यक्ती शौचालयातील काऊंटरवर पिशवी ठेवून लघुशंकेकरिता गेली. त्यावेळी तिथे दोन अनोळखी व्यक्ती आल्या आणि त्यापैकी एकाने त्यांना तर दुसऱ्याने शौचालयाच्या काऊंटरवर असलेल्या व्यक्तीला बोलण्यात गुंतविले. त्यानंतर संधी मिळताच २० हजारांची रोख रक्कम असलेली पिशवी घेऊन पसार झाले. या प्रकरणी ठाणेनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

दोन अपघातात दोघांचा मृत्यू
ठाणे- शहरामध्ये वेगवेगळ्या अपघातांमध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली असून हे अपघात भरधाव कार तसेच डम्परच्या धडकेमुळे झाले आहेत. पहिल्या घटनेत आठ दिवसांपूर्वी नितीन कंपनी जंक्शन उड्डाण पुलाजवळून रस्ता ओलांडत असताना अंकुश बाबू तरे (३५) यांना एका भरधाव कारने धडक दिल्याची घटना घडली होती. यात गंभीर जखमी झाल्याने त्यांच्यावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू होते दरम्यान, उपचार सुरू असताना गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेप्रकरणी कारचालक दीपक गौरीशंकर गुप्ता यांच्याविरोधात नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.दुसऱ्या घटनेत गुरुवारी मुंबई-नाशिक महामार्गावरील लोढा कॉम्प्लेक्ससमोरील रस्ता ओलांडणाऱ्या एका ३० वर्षीय व्यक्तीला डम्परने धडक दिली. त्यात त्याचा मृत्यू झाला. या अपघातात मृत पावलेल्या व्यक्तीची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. या प्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मोटारसायकल चोरी
डोंबिवली- रक्षाबंधनानिमित्ताने बहिणीकडे राखी बांधण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीची मोटारसायकल चोरटय़ांनी डोंबिवली स्थानक परिसरातून चोरून नेल्याची घटना उघडकीस आली.

डोंबिवली पूर्व येथील टेकडी परिसरातील ४१ वर्षीय व्यक्ती रक्षाबंधनाकरिता कल्याणमध्ये राहणाऱ्या बहिणीच्या घरी गेली होती. त्यावेळी त्यांनी डोंबिवली स्थानक परिसरात उभी केलेली मोटारसायकल चोरटय़ांनी चोरून नेली.

या प्रकरणी डोंबिवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.